There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
बर्नार्ड किविया. टांझानियामधील एक तरुण. त्याचे वडील मेकॅनिक (mechanic) होते, जुन्या गाड्यांचे सुटे भाग विकायचे, आणि आई शिवणकाम (tailor) करायची. घरात नेहमी 'काहीतरी बनवण्याची' प्रक्रिया सुरू असायची—एकजण धातूच्या वस्तूंशी झगडत तर दुसरी कपड्यांना आकार देत असे. कदाचित यामुळेच त्याला लहानपणापासूनच काहीतरी तयार करण्याची प्रेरणा मिळाली.
तो प्राथमिक शाळेत असताना त्याचे शिक्षक विद्यार्थ्यांना एका बिस्किट कंपनीच्या कारखान्यात घेऊन गेले होते. बिस्किटे कशी बनतात, यंत्रे कशी चालतात, पीठ मिसळण्यापासून ते कापून पॅकिंग करण्यापर्यंत—ती सर्व हलणारी यंत्रसामग्री (moving parts) पाहताना त्याला खूप उत्सुकता वाटली. तेव्हापासून तो विचार करू लागला, "अशी यंत्रे लोक नेमकी कशी बनवतात?"तेव्हापासून त्याला यंत्रांबरोबर खेळण्याचं वेड लागलं.
२००५ मध्ये, त्याला 'ग्लोबल सायकल सोल्युशन' नावाच्या एका संस्थेकडून काम मिळाले. सायकल दुरुस्त कशी करायची, हे तरुणांना शिकवण्याचे काम त्याच्याकडे होते, जेणेकरून ते शेतकऱ्यांच्या सायकलींची दुरुस्ती करून आपापल्या गावात रोजगार मिळवू शकतील.
याच कामादरम्यान त्याने त्याचे पहिले मशीन तयार केले : पॅडलवर चालणारा एअर कंप्रेसर. विज उपलब्ध नसणे हा नेहमीचाच प्रश्न. त्यावर उपाय शोधण्यासाठी त्याने सायकलच्या तुटलेल्या भागांपासून एक एअर कॉम्प्रेसर बनवला जो सायकलच्या चाकांमध्ये हवा भरण्यासाठी वापरला जाऊ शकेल. त्याने बनवलेले हे मशीन तो मस्तीखोर मुलांना शिक्षा देण्यासाठी वापरायचा ! त्यांनी काही चूक केल्यास, १० मिनिटे पॅडल मारून हवा साठवायची, जी सायकलच्या टायरमध्ये भरण्यासाठी वापरली जाई. सगळ्यांना ते मशीन खूप आवडले!
त्या संस्थेतील सिनिअर सहकारी समंथा हिला बर्नार्ड मधील हे वेगळेपण जाणवले. तिने बर्नार्डला D-LAB च्या एका संमेलनाला जाण्यासाठी सुचवले. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मध्ये डी-लॅब (D-Lab) नावाचा एक प्रोग्रॅम आहे. या लॅबमधील मुख्य कोर्स, 'क्रिएटिव्ह कॅपॅसिटी बिल्डिंग', हा जागतिक गरिबीवर (global poverty) व्यावहारिक उपाय (practical solutions) शोधण्यावरकाम करतो. या कार्यशाळेत जगभरातील अशा सर्जनशील व्यक्तीना बोलावले जाते जे गरिबीवर मात करण्यासाठी प्रॅक्टिकल उपाय शोधतात.
बर्नार्डला धड इंग्लिश बोलता येत नव्हते. पुरेसे पैसेही नव्हते. अमेरिकेतील मोठ्या विद्यापीठांतील लोकांमध्ये मी कसा फिट बसणार?" या विचाराने तो आधी नाही म्हंटला. पण तिने बर्नार्डला समजावले, हा जागतिक स्तरावरचा कार्यक्रम आहे. तू जा, काहीतरी शिकशील आणि नव्या लोकांशी भेटशील. तिनेच सर्व कागदपत्रे आणि जाण्यायेण्याची सोयही करून दिली.
तिथे जगभरातून सुमारे ७० लोक तिथे आले होते. प्रत्येकजण त्यांचे शोध (inventions) दाखवत होता. तिथे ग्वाटेमालाचा एक माणूस, कार्लोस, पॅडलवर चालणारा ज्युसर घेऊन आला होता. सायकलच्या भागांशी काम करणाऱ्या बर्नार्डच्या मनात लगेच विचार आला: "हे तर मी माझ्या गावी परत बनवू शकतो!"
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/Ip4ab5E7gGU52GQS3uC7pq
येथे क्लिक करा.
================
तो घरी परतला आणि पहिले काम केले, ते म्हणजे कार्लोसच्या तंत्रज्ञानाची नक्कल (copy) करणे. जुने धातूचे भाग एकत्र केले आणि एका तुटलेल्या इलेक्ट्रिकल ज्युसरचा जग (jug) वापरला. पॅडलवर चालणारा फ्रूट ज्युसर तयार झाला!
लोकांना ते खूप आवडले. येथूनच त्याचा 'जुने भाग वापरून नवीन वस्तू बनवण्याचा' प्रवास सुरू झाला.
प्रत्येक प्रश्नाकडे तो सायकलच्या माध्यमातून हा प्रश्न कसा सोडवू शकतो या दृष्टीने बघतो. कारण तेवढंच त्याला येतं.
टांझानियामध्ये भंगार धातू (scrap metal) जमा करून ते वितळवले जातात आणि त्यातून नवीन धातू बनवतात, पण तो मात्र पुनर्निर्मिती (recycling) करतो. सायकलचे भंगार भाग वापरून त्याने साऱ्या वस्तू तयार केल्या.
खुर्च्या आणि फर्निचर तयार केले.
सायकल चार्जर: सायकलला मोबाईल फोन चार्जर जोडला, ज्यामुळे प्रवासात फोन चार्ज होतो.
पॅडल पंप: नळाचे पाणी येत नाही. म्हणून सायकलच्या भागांपासून एक पंप बनवला. फक्त पॅडल मारायचे आणि विहिरीतून पाणी थेट घरात येते!
सौर वॉटर हिटर: पुनर्वापर केलेल्या साहित्यातून (recycled materials) हिटर बनवला. हा हिटर ७५°C पर्यंत पाणी गरम करू शकतो!
असे अनेक जुगाड करून त्याने मशीन्स बनवल्या आहेत. ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य हेच की आपल्याकडे जे आहे त्यातूनच प्रश्न सोडविणे ही खरी क्रिएटिव्हीटी. शिक्षण, पैसा, साधनसामग्री याची मदत होतेच पण क्रिएटिव्हीटी त्याहून अधिक काहीतरी मागते.....वेगळा विचार !!
अशा अनेक जुगाड इनोव्हेशनच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील. भारतातही अशा इनोव्हेटर्सची कमी नाही. पण मी बर्नार्डची कथा मुद्दाम निवडली कारण त्याने केवळ मशीन्स कॉपी केल्या नाही तर इनोव्हेशन मॉडेल पण कॉपी केले.
त्याने केवळ स्वतःपुरता विचार केला नाही. त्याच्या या प्रॅक्टिकल शोधांचा फायदा इतरांनाही व्हावा म्हणून त्याने स्वतःच एमआयटीच्या धर्तीवर एक छोटा डी-लॅब सुरू केला आहे. शाळेतील (Standard 5 ते 7) विद्यार्थ्यांना सर्जनशील बनण्यास तो मदत करत आहे.
त्याच्या प्रेरणेतून अनेक गावकऱ्यांनी समस्यांवर स्थानिक आणि सोपे तोडगे शोधले:
फ्रँक मोलेलने हातगाडीतून खत आणि शेण अधिक कार्यक्षमतेने पसरवणारी 'फर्ट कार्ट' बनवली.
जेसी किकलांगेने घरगुती एव्होकॅडो तेल काढण्याचे मशीन बनवले, ज्यामुळे जास्त पिकलेली फळे वाया न जाता तेलात रूपांतरित झाली.
मॅग्रेथ ओमारीने साबण कापण्याचे मशीन बनवून एक छोटी फॅक्टरी सुरू केली आहे, ज्यात अनेक स्थानिक महिलांना रोजगार मिळाला आहे.
इतर शोधांमध्ये एका तासात १०० किलो मका सोलणारे मशीन, प्लास्टिकच्या कचऱ्यापासून मधमाशांची पोळी आणि फळे वाया जाऊ नयेत म्हणून बनवलेला मेकॅनिकल ज्युसर यांचा समावेश आहे.
आजपर्यंत, सुमारे ८०० स्थानिक शोधकांना या 'Practical Creativity' चा फायदा झाला आहे.
देणाऱ्याने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे ...घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचा हात घ्यावा ! ही उक्ती त्याने प्रत्यक्षात उतरवली.
प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत एडवर्ड डी बोनो म्हणतात ते अगदी खरे आहे: “जी कल्पना प्रत्यक्षात आणली जाऊ शकते, ती केवळ सिद्धांतात असलेल्या कल्पनेपेक्षा खूप जास्त मौल्यवान असते.”
रचनात्मकता ही प्रयोगशाळेत नाही, ती आपल्या दारात असलेल्या साध्या समस्येमध्ये दडलेली आहे.
- बर्नार्डच्या (Bernard Kiwia) कामावर BBC ने एक छोटी डॉक्युमेंटरी केली होती. ती युट्युबवर अवश्य पहा. वर दिलेल्या मशीन्स व्हिडिओ मध्ये पाहता येतील.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !