"ऑटोमॅटिक मशीन, पण माणूस मॅन्युअल!"

मी २००३ ते २००५ साली गॉडफ्रे फिलिप्स या कंपनीत काम करत होतो. कंपनी सिगारेट्स बनवते. फोरस्क्वेअर हा त्यांचाच ब्रँड.

मी त्यांच्या नवीन सुरु होणाऱ्या बेव्हरेज बिझनेस मध्ये होतो. त्यांनी जपान वरून मोठ्या ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशिन्स आणल्या होत्या. पूर्णपणे ऑटोमॅटिक असलेल्या त्या मशीन्समधून साधारण ५० वेगवेगळे ड्रिंक्स घेता यायचे. या मशिन्सची खासियत म्हणजे यात कोणतेही ड्रिंक्स साठवून ठेवलेले (Premix) नसायचे तर ग्राहकाने बटण दाबल्यानंतर फ्रेश तयार व्हायचे. उदाहरणार्थ चहापावडर पासून चहा उकळून , फिल्टर होऊन यायचा, कॉफी बियांपासून कॉफी तयार व्हायची आणि सिरप मध्ये सोडा मिक्स होऊन कार्बोनेटेड ड्रिंक यायचे.

तीन माणसं आत राहू शकतील एवढी मोठी मशीन होती ती. अत्यंत किचकट आणि संपूर्णपणे ऑटोमॅटिक.

जपान मध्ये अशा व्हेंडिंग मशीन्सचा वापर खूप असतो. ड्रिंक्स, चोकोलेट्स, सिगारेट्स, नूडल्स, छत्र्या अगदी स्टेटशनरी वस्तूंच्या पण व्हेंडिंग मशीन्स तिथे असतात. त्याच धर्तीवर भारतात जागोजागी अशा मशीन्स लावण्याचा कंपनीचा प्लॅन होता. पहिले मशीन आम्ही लावले होते अंधेरीतील शॉपर्स स्टॉप च्या बाहेर. ते बाहेरून अत्यंत आकर्षक दिसणारे मशीन पाहून लोक यायचे. प्रयोग म्हणून एखादे ड्रिंक घेऊन बघायचे. अगदी फ्रेश नुकताच तयार झालेले पेय घेतल्यानंतर त्यांना जो आनंद व्हायचा तो अवर्णनीयच असायचा.

आम्ही दूर उभे राहून याचे निरीक्षण करत असू. लोक ऑटोमॅटिक मशीनबरोबर कसा व्यवहार करतात, कोणते ड्रिंक जास्त चालते ? कोणते प्रॉब्लेम्स येतात ? याचा अभ्यास करायचो. भारतीय वातावरणात हा व्यवसाय चालण्यासाठी मशीनमध्ये आवश्यक ते बदल करण्याची जबाबदारी माझी होती.

एक टिपिकल भारतीय प्रॉब्लेम तिथे आला. तो म्हणजे प्रचंड गर्दी आणि बेशिस्तीचा ! आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी दोन जपानी इंजिनीअर्स आले होते. ते तर इतकी गर्दी बघून वेडेच झाले.

तेव्हा UPI हा प्रकार नव्हता त्यामुळे लोकांना कॅश पैसे देऊन ड्रिंक घ्यावे लागत होते. कागदी नोटा मशीन मध्ये सरकावायच्या, आपले प्येय निवडायचे, सुट्टे पैसे आणि पावती परत घ्यायची आणि मग पेय घ्यायचे अशी साधारण १ मिनिटांची प्रोसेस होती. पण प्रचंड गर्दी मुळे धक्काबुक्की व्हायची, मशीनमधून आलेले ड्रिंक घेऊन मागे वळताना धक्का लागून ते गरम किंवा थंड ड्रिंक हातावर , कपड्यांवर सांडायचे. मशीन मधील एखाद्या पेयांची सामग्री संपली तर SOLD OUT असा मेसेज दिसायचा. पण अगदी शिकलेले लोकदेखील त्यांना हवे असलेले ड्रिंक SOLD OUT असले तरी ते बटण आणखी जोराने दाबत किंवा मशिनला थपडा तरी मारत. काही महाभाग लाथाही मारत.

शनिवार आणि रविवार म्हणजे मशीनची खरी परीक्षा असायची. दिवसभरात १००० पेक्षा जास्त पेयं विकली जायची. किमान चार पाच वेळा मशीन उघडून त्यात पुन्हा सामग्री भरावी लागायची. कोल्ड ड्रिंक्सचा खप इतका होता की त्यासाठी मशीन मध्ये तयार असलेला तीन किलो बर्फ लगेच संपून जायचा. पुन्हा बर्फ बनेपर्यंत वेळ लागायचा म्हणून आणखी एक रेफ्रिजरेशन युनिट बाहेरून लावावे लागले. त्यामुळे अतिरिक्त जागा आणि वीजखर्च होऊ लागला.

आणखी मोठा प्रॉब्लेम आला मशीनला दिल्या जाणाऱ्या पाण्याचा. जपानमध्ये कधी त्यांना फिल्टर वापरायची गरज लागली नव्हती. आम्हाला RO / UV फिल्टर लावावे लागले. मग तो फिल्टर सुरक्षित राहावा म्हणून त्यासाठी कॅबिनेट बनवावे लागले.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2

येथे क्लिक करा.

================

काही लोकांनी तर त्या मशीनला सुट्टे पैसे देण्याची मशीन म्हणूनच वापरायला सुरुवात केली. त्यामुळे मशीन मध्ये ठेवलेले सुट्टे पैसे लगेच संपून जात. काही महाभागांनी खोट्या नोटा , खोटी नाणी पण सरकवली. त्यामुळे ड्रिंक्स तर दिले गेले नाही पण मशीन मधील कॉईन बॉक्स भरून जायचा.

आम्ही पुढे विविध ठिकाणी ५० मशीन्स लावल्या असतील. या दरम्यान मशीनची काच फोडणे. ड्रिंक्सच्या बटनांवर काळे फासणे, मशीनवर आपली नवे लिहिणे/कोरणे , "भलत्याच" जाहिरातींची पोस्टर्स चिकटवणे, मशीनच्या चावीच्या होलमध्ये एम - सील भरणे असे अनेक भयानक प्रकार लोकांनी मशीन्सबरोबर केले.

शेवटी आम्ही प्रत्येक मशीनसाठी एक ऑपरेटर ठेवायचा निर्णय घेतला. तो ग्राहकांकडून पैसे घेऊन मग त्यांना हवे ते ड्रिंक द्यायचा.

ते जपानी इंजिनिअर या प्रत्येक बदलावर प्रचंड नाराज होते. सगळ्यात जास्त नाराज झाले ऑपरेटर ठेवण्याच्या निर्णयावर. "ऑटोमॅटिक मशीनला चालविणारा ऑपरेटर" हा विरोधाभास त्यांना सहनच होत नव्हता. तो त्यांना मशीनचा अपमानच वाटला. पण "हा भारत आहे, इथे हे असेच चालते" हे त्यांना समजवावे लागले.

आणि हे सगळे कमी म्हणून की काय. "स्मार्ट भारतीयांचा" एक आणखी मोठा प्रॉब्लेम उघड झाला. ऑपरेटर्स फोन करून मशीन खराब झाल्याचे खोटेच सांगत. इंजिनिअर पोहोचेपर्यंत जेवढे ड्रिंक्स विकले त्याचे पैसे स्वतः कडे ठेवत आणि इंजिनीअर पोहोचल्यानंतर मशीन आपोआप चालू झाले असे सांगत. आणि मशीनमध्ये सामग्री भरणारे लोक अर्धे पॅकेट मशीनमध्ये भरून उरलेले अर्धे घरी घेऊन जात. कुंपणच शेत खात होते.

एवढे नुकसान आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाढलेल्या खर्चामुळे "ऑटोमॅटिक मशीन्सचे" बिझनेस मॉडेल चालेनासे झाले. या पायलट प्रोजेक्ट मुळे भारतात हा व्यवसाय चालणार नाही हे कळून चुकले. आणि तो व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक व्यवसाय जो हजारो लोकांना नोकऱ्या देऊ शकला असता तो काही मूर्ख आणि स्वार्थी लोकांमुळे बंद करावा लागला.

एक जपानी इंजिनीअर जो जवळपास वर्षभर आमच्यासोबत होता त्याचे नाव होते "याकुवा केकी". त्याचं माझ्याबरोबर बऱ्यापैकी जमायचं. सोबत आमची दुभाषी अजिता बरोबर पण मैत्री होती. व्यवसाय बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर तो खूप निराश झाला होता.

त्यानंतर एकदा दुभाषी अजिताच्या मदतीने याकुवा मला म्हणाला ...सलिल, कोणताही व्यवसाय चालण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात. three M म्हणजे मशीन, मटेरियल आणि मॅन !

भारताची समस्या मशीन किंवा मटेरियलची नाही , भारताची समस्या आहे "मॅन" (अर्थात लोकसंख्या आणि भारतीय माणसाची मानसिकता !). मशीन आपलं काम करतं, मटेरियल आपलं काम करतं पण माणसं आपली कामं करत नाहीत तेव्हा गडबड होते. तो मनाला लागणारं बोलला ...पण दुर्दैवाने ते खरं होतं.

तो जेव्हा भारतातून परत जात होता तेव्हा त्याला भेटायला गेलो होतो. त्याला म्हंटल पुन्हा भेटूया. तर मला म्हणाला तू जपानला ये कधीतरी. मी आता भारतात कधीही परत येणार नाही....!

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !