There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
शिकागोच्या 'लेक मिशिगन' सरोवराच्या बर्फाळ पृष्ठभागावरून हाडं गोठवून टाकणारा थंड वारा वाहत होता. हा वारा बांधकाम सुरू असलेल्या जागेतून सुसाट वेगाने येत होता आणि यामुळे एलियाच्या चेहऱ्यावरची वेदना गोठून एक भयाण, निश्चल भाव निर्माण झाला होता.
पडेल ती कामे करणाऱ्या एलीया वर कामाचा बोजा आधीच प्रचंड होता, त्यात आणखी एक काम वाढले होते. जॅक्सन पार्कमध्ये नुकत्याच बसवलेल्या शेकडो फायर हायड्रंट पम्पना गोठण्यापासून वाचवण्याचे काम एलिया करत होता. हे काम तो प्रत्येक हायड्रंटवर गरम गरम घोड्याचे शेण टाकून करत होता. हे काम त्याच्या मूळ कामाचा भाग नव्हते, पण एलियाला त्याची पर्वा नव्हती. त्याला फक्त इतकेच माहीत होते की 'शिकागो वर्ल्ड्स फेअर'च्या बांधकामातील हे योगदान त्याला त्याच्या स्वप्नातील नोकरीच्या एक पाऊल जवळ घेऊन जाईल.
https://www.facebook.com/share/p/1CYtoQp4ma/
त्याचे स्वप्न होते, 'मेन स्ट्रीट, यूएसए'वर स्वतःच्या नावाचा फलक असलेला एक छोटासा ठेकेदार (Contractor) होणे. प्रत्येक मजुराला कॉन्ट्रॅक्टर बनण्याचं स्वप्न असतं तसंच ! कितीतरी वर्षांपासून त्याने आपल्या नावाचा फलक एका लहानशा शहराच्या मध्यभागी असलेल्या साध्या दुकानावर लावण्याचे स्वप्न पाहिले होते. एका अशा जागेचं स्वप्न ज्याला कॅनडातून स्थलांतरित झालेला मजूर आपलं "स्वतःच" ठिकाण म्हणू शकतो.
म्हणूनच, एलियाने आपले लक्ष त्या स्वप्नावर केंद्रित केले होते. त्याने मनाला सुन्न करून टाकणारी थंडी आणि शेणाच्या घाणेरड्या वासाकडे दुर्लक्ष केले. त्याचप्रमाणे, प्रत्येक दहा तासांच्या शिफ्टनंतर येणाऱ्या थकव्याकडे आणि जीर्ण झोपडीकडे जाणाऱ्या लांबच्या परतीच्या वाटेकडेही त्याने दुर्लक्ष केले. तो १८९३ सालचा हिवाळा होता, आणि अमेरिका तिच्या पहिल्या महामंदीच्या (ग्रेट डिप्रेशन) विळख्यात होती. बाहेर कामं मिळत नव्हती. त्यामुळे एलिया घोड्याच्या शेणाचा थर फायर हायड्रंट्सवर टाकायलाही आनंदी होता. तसेच, त्याला खंदक खोदणे, सिमेंट ओतणे आणि गोठलेल्या हवेत जाड धुराचे लोट सोडणाऱ्या कोळशाच्या धगधगणाऱ्या भट्ट्या सांभाळायलाही आनंद होत होता.
जी काही कामे उपलब्ध होती, ती सर्व करताना, एलियाने टीनर्सकडून (पत्रा जुळवणाऱ्या) प्रशिक्षण घेतले. तो कित्येक तास धातूचे पत्रे वाकवत असे. त्याने इलेक्ट्रिशियन्सना मदत केली, ज्यांनी त्याला हजारो लाईट बल्बमध्ये प्रवाह वाहून नेणाऱ्या लांब काळ्या तारा कशा जोडायच्या, हे शिकवले. त्याने सुतारकाम शिकले, ज्यामुळे त्याने संपूर्ण परिसरात उभे असलेले मोठे सेट्स तयार केले. त्याने प्लंबर्ससोबत पाईप फिटिंग व स्टीम फिटिंग करून या जागेच्या भूमिगत पायाभूत सुविधा बांधण्यास मदत केली. त्याने वेल्डिंग शिकले, तसेच प्लास्टर करण्याचे कामही शिकले. तो पेंटर्ससोबत काम करत होता आणि नंतर प्रत्येक इमारतीला पांढरा रंग देण्यास मदत करत होता, ज्यामुळे संपूर्ण जॅक्सन पार्क सरोवराच्या काठी एक चमकदार 'श्वेत नगरी' (व्हाईट सिटी) म्हणून उभी राहिली. ही व्हाईट सिटी शिकागो वर्ल्ड फेअरचा भाग म्हणून उभारण्यात येत होती. (१८९३ मध्ये शिकागो येथे आयोजित केलेला हा एक मोठा आंतरराष्ट्रीय मेळा होता. हा अमेरिकेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक आणि औद्योगिक कार्यक्रम मानला जातो.)
थोडक्यात, एलियाने 'शिकागो वर्ल्ड्स फेअर'च्या बांधकामासाठी भरपूर काम केले. त्याने शक्य असलेली प्रत्येक घाणेरडी नोकरी केली आणि त्यासोबतच अनेक उपयुक्त कौशल्ये आत्मसात केली, ज्यामुळे तो त्याच्या पत्नी आणि पाच मुलांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकला. पण त्याला त्याच्या जीवनकाळात कधीही त्याचे स्वप्न पूर्ण आले नाही. त्याला कधीही 'मेन स्ट्रीट'वरील त्या साध्या दुकानावर आपला फलक लावता आला नाही.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
याचा अर्थ असा नाही की त्याचे स्वप्न पूर्ण झालेच नाही. कारण, एलियाकडे दुसरे एक कौशल्य होते—जे त्याच्या रोजच्या कामातून मिळवलेल्या कौशल्यांइतकेच मौल्यवान होते. त्याला आपण 'कल्पनाशक्ती' म्हणूया. दररोज रात्री, सहसा जेवणानंतर, एलिया आपल्या पाच मुलांना 'शिकागो वर्ल्ड्स फेअर'च्या गोष्टी सांगायचा. तो मिस्टर फेरिसच्या त्या प्रचंड चाकाच्या भव्यतेबद्दल, आधुनिक तंत्रज्ञानाच्या चमत्कारांबद्दल, आणि या जादुई साम्राज्याचा प्रत्येक कोनाकोपरा शोधणाऱ्या हजारो पर्यटकांच्या चेहऱ्यावरच्या आश्चर्याबद्दल बोलायचा. तो चमकदार मंडपांबद्दल सांगायचा, जे विदेशी प्रदर्शनांनी भरलेले होते आणि फ्रेंच क्रेप्स, जर्मन सॉसेजेस आणि क्रॅकर जॅक नावाच्या एका नवीन स्वादिष्ट पदार्थांच्या मेजवानीचे तोंडात पाणी आणणारे वर्णन करायचा. खरंतर यातल्या कशाचाही त्याने उपभोग घेतला नव्हता. पण तो मुलांना त्या सगळ्याची इतकी रसभरीत वर्णनं करायचा की मुलांना वाटायचं की बाबा कामावर असताना या सगळ्याचा यथेच्छ आनंद घेत असतात.
त्याची मुले हे सर्व उत्सुकतेने ऐकायची, पण त्याचा सर्वात लहान मुलगा मात्र यात खास रस दाखवत असे. तो अक्षरशः या जत्रेच्या गोष्टींसाठी भुकेला होता. त्याला स्वतःला ते तांत्रिक चमत्कार पाहायचे होते, जगाच्या चवींचा अनुभव घ्यायचा होता, आणि आकाशात चमकणाऱ्या फटाक्यांचे आवाज त्याला फक्त कल्पना करण्याऐवजी प्रत्यक्ष पाहायचे आणि ऐकायचे होते.
एलियाने त्या मुलाच्या लहान केसांवरून हात फिरवला. "अरे, तुला ते खूप आवडले असते, बाळा. असं म्हणून तो फक्त मुलाची समजूत काढायचा. पण मुलांना तिथे नेणे त्याला परवडणारे नव्हते.
आज शंभर वर्षांनंतर अधिक काळ उलटून गेला आहे. या दरम्यान असं काहीतरी घडलं की लोक आजही एलियाच्या श्रमाचा आनंद घेण्यासाठी दररोज रांगेत उभे राहतात—'शिकागो वर्ल्ड्स फेअर'चे एक नवीन स्वरूप, जिथे जगभरातील पर्यटक तासन्तास थांबून महाकाय राईड्स आणि असंख्य आकर्षणांचा अनुभव घेतात.
पण तिथे पोहोचण्यासाठी, लोकांना आधी 'मेन स्ट्रीट, यूएसए'वरून फिरावे लागते. हा फेरा प्रत्येक पर्यटकाला थोड्या कल्पनाशक्तीने आणि भरपूर कष्टाने काय साध्य करता येते, याची आठवण करून देतो. या रस्त्यांवर अमेरिकेतील जुन्या दुकानांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. तेथे तुम्हाला एक दंतवैद्य , कपड्यांचे दुकान, एक वकील आणि एक नाव्ह्याचे दुकान दिसेल. आणि तिथेच, एका दुकानावर, तुम्हाला एक फलक दिसेल त्यावर लिहिलेले आहे, 'एलीया डिझनी, ठेकेदार'. (Elias Disney Contractor)
तो फलक तिथेच आहे, 'मेन स्ट्रीट, यूएसए'च्या अगदी मध्यभागी, जिथे त्याने स्वतःच्या दुकानाचे स्वप्न पाहिले होते—एका मेहनती वडिलांना, 'एलीया'ला, एका मेहनती मुलाने, 'वॉल्ट'ने दिलेली एक साधी श्रद्धांजली.
(अतिरिक्त संदर्भ -
एलीया डिझनी (Elias Disney): वॉल्ट डिझनीचे वडील.
वॉल्ट डिझनी (Walt Disney): जगप्रसिद्ध अॅनिमेटर, उद्योजक, मिकी माऊसचा निर्माता आणि 'वॉल्ट डिझनी कंपनी'चा संस्थापक.
मेन स्ट्रीट, यूएसए (Main Street, USA): जगातील अनेक 'डिझनी' थीम पार्क्समध्ये प्रवेश केल्यावर सर्वात पहिले दिसणारा रस्ता. हा अमेरिकन शहरांच्या सुरुवातीच्या शतकातील मुख्य रस्त्यांची प्रतिकृती आहे. वॉल्ट डिझनीच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित ही रचना आहे.)
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !