"जिंकूनही हरलो – पर्ल हार्बरची शिकवण"

अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात सहभागी व्हायचं नव्हतं. जर्मनीच्या हवाई आणि समुद्री हल्ल्यांपुढे इंग्लंडचे पारडे कमजोर पडत होतं. विन्स्टन चर्चील अमेरिकेने युद्धात त्यांच्याबाजूने उतरावं म्हणून शर्थीचे प्रयत्न करत होते. अमेरिका इंगलंडच्या बाजूने असली तरी प्रत्यक्ष युद्धात उतरत नव्हती. केवळ साधनसामग्रीची मदत अमेरिका पोहोचवत होती.

त्याचवेळी जपानच्या महत्वाकांक्षा वाढत होत्या. जपानला "ग्रेटर ईस्ट आशिया को-प्रॉस्पेरिटी स्फीअर" नावाचा स्वतःचा आर्थिक आणि राजकीय गट तयार करायचा होता. या विस्तारामुळे त्यांनी चीन आणि फ्रेंच इंडोचायनासारख्या नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेल्या भागांवर आक्रमण केले.

अमेरिकेने या आक्रमणाला धोका मानून आर्थिक निर्बंध आणि व्यापारबंदी लागू केली, विशेषतः तेल आणि स्टीलवर. हे दोन्ही जपानच्या सैन्यासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. अमेरिकेने जपानी मालमत्ताही गोठवल्या, ज्यामुळे त्यांच्या युद्धाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला होता. पॅसिफिक समुद्रामध्ये जपानी युद्धनौकांना अमेरिकन नौदलामुळे मुक्त संचार करता येत नव्हता.

यावर उपाय म्हणून जपानसमोर दोनच पर्याय होते: एकतर शांत बसणे किंवा त्यांना आवश्यक संसाधने मिळवण्यासाठी असलेला अमेरिकेचा अडसर दूर करणे. जपानने दुसरा पर्याय निवडला. त्यांनी कुणालाही कल्पना नसेल असा पर्ल हार्बरचा थेट अमेरिकेवर हल्ला करण्याचा प्लॅन केला.

त्यांना वाटले की पर्ल हार्बर येथील अमेरिकेच्या नौदलावर अचानक आणि निर्णायक हल्ला केल्यास अमेरिकेचे नौदल काही काळासाठी कमकुवत होईल. यामुळे त्यांना आग्नेय आशियावर नियंत्रण मिळवून पॅसिफिकमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करता येईल. जपानला आशा होती की या मोठ्या धक्क्यामुळे अमेरिका त्यांच्या मार्गातील अडथळा बनणार नाही.

अमेरिकेकडे तेव्हा १७ युद्धनौका होत्या. त्यापैकी काही ६ युद्धनौका अटलांटिक सागरात होत्या आणि ११ युद्धनौका पैसेफिक समुद्रात. जपानने पर्ल हार्बर वर हल्ला केला तेव्हा या ११ पैकी ८ युद्धनौका पर्ल हार्बरमध्ये होत्या. या आठही युंद्धनौका जपानने निकामी केल्या. त्यासोबत १८८ विमानं नष्ट केली आणि २४०० अमेरिकन सैनिकांना यामध्ये जीव गमवावा लागला.

जपानी सैन्याने हा विजय दणक्यात साजरा केला. अमेरिकेन नौदलाची अर्ध्यापेक्षा जास्त ताकद त्यांनी एका दिवसात नष्ट केली होती. त्यांना वाटले की त्यांनी पॅसिफिकमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

पण त्यांना हे कळले नाही की, या विजयाच्या क्षणी त्यांनी स्वतःच्याच पराभवाची तयारी केली होती. त्यांनी अमेरिकेला युद्धात उतरण्यास भाग पाडले होते. अमेरिकेच्या युद्धनौका नष्ट झाल्यामुळे त्यांना पारंपरिक युद्धनौकांऐवजी आधुनिक हवाई युद्धतंत्राचा वापर करावा लागला.

विशेष म्हणजे, अमेरिकेची तीन विमानवाहू जहाजे त्या दिवशी पर्ल हार्बरमध्ये नव्हती. ती समुद्रात असल्यामुळे हल्ल्यातून वाचली. युद्धनौका निकामी झाल्यामुळे अमेरिकेला आपले पारंपरिक नौदल धोरण बाजूला ठेवून विमानवाहू जहाजांच्या आणि हवाई सामर्थ्याच्या आधारावर लक्ष केंद्रित करावे लागले.

हे नवे युद्धतंत्र पूर्णपणे वेगळे होते. विरोधी जहाजांना एकमेकांसमोर येण्याची गरजच नव्हती. विमानवाहू जहाजांवरून उड्डाण घेणारी विमाने शेकडो मैल दूरवरून हल्ला करू शकत होती, ज्यामुळे युद्धनौका निरुपयोगी ठरल्या.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी

https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2

येथे क्लिक करा.

================

या नव्या रणनीतीमुळे अमेरिकेला प्रचंड यश मिळाले. अमेरिकेच्या उरलेल्या विमानवाहू जहाजांवरील विमानांनी जपानची तीन विमानवाहू जहाजे बुडवली आणि ६०० जपानी विमाने पाडली. त्यानंतर, निर्णायक मिडवेच्या युद्धात, त्यांनी आणखी चार जपानी विमानवाहू जहाजे बुडवली आणि ३०० हून अधिक विमाने पाडली. जगातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली युद्धनौका असलेली, जपानची यामातो (Yamato) सुद्धा अमेरिकेच्या विमानवाहू जहाजांवरील विमानांनी बुडवली.

पर्ल हार्बरवरील हल्ला हा अमेरिकेला एका क्षणात पराभूत करण्यासाठी होता, पण त्याने अमेरिकेला युद्धात ओढलं. जपानने लढाई जिंकली पण युद्ध हरण्याची तयारी केली. पुढे अमेरिकेने अणुबॉम्ब टाकून संपूर्ण युद्धाचाच शेवट केला. आणि अणुबॉम्बच्या रूपाने एका नव्या भस्मासुराचा उदय झाला.

अमिताभच्या सरकार चित्रपटातील एक डायलॉग मला नेहमी आठवतो..."नजदिकका फायदा देखनेसे पहले, दूरका नुकसान देखना चाहिये । ". आपणही आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात जपानसारखे शॉर्ट-टर्म निर्णय घेत असतो. तात्पुरते आपल्याला ते विजय वाटतात पण प्रत्यक्षात तेच निर्णय आत्मघातकी ठरतात. मी बऱ्याच लोकांना बघितलं आहे ज्यांना कुणी काही बोललं, अपमान केला तर त्याच्याशी कायमचं शत्रूत्व पत्करतात. आणि त्यावर कुरघोडी करण्यासाठी जीवाचं रान करतात. यामुळे स्वतःच्या मुख्य उद्देशापासून दूर जातात आणि नकळत आपल्याच मार्गात अडथळे निर्माण करतात.

माझ्या २५ वर्षांच्या करिअरमध्ये मी दोन गोष्टी नीट शिकलोय –

१ . झोपलेल्या राक्षसाला उठवायचं नाही !

२ . लढाई जिंकण्याच्या प्रयत्नात युद्ध हरू द्यायचं नाही !

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !