There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
माझ्या मुलाला रात्री झोपवताना गोष्ट सांगत होतो. मला माहीत असलेल्या सगळ्याच गोष्टी सांगून झाल्या होत्या म्हणून जुनीच गोष्ट पुन्हा सांगायला सुरुवात केली.
लाकूडतोड्याची गोष्ट सांगत होतो. एका गावात एक लाकूडतोड्या होता. तो झाडावर चढून लाकूड तोडत होता तेव्हा त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली.
आता मी झाड कसं तोडणार….माझा उदरनिर्वाह कसा चालणार….या चिंतेत तो रडायला लागला.
पण बाबा, झाडं तोडणं चूक आहे ना ? झाडाना पण जीव असतो. लाकूडतोड्याला दुसरं काही तरी काम करायला पाहिजे…..चिरंजीवांचा प्रश्न!
मला काही उत्तर सुचलं नाही. माझं उद्दिष्ट त्याला झोपवायच होतं म्हणून मी गोष्ट पुढे दामटवली.
लाकुडतोड्याचं रडणं ऐकून पाण्यातून एक देवी प्रकट झाली.
तिने लाकूडतोड्याला विचारलं का रडतोयस ?
एव्हाना त्याला आठवलं की ही गोष्ट आपण ऐकलेली आहे. तो म्हणाला आता देवी सोन्याची कुऱ्हाड देणार ना ?
मी हो म्हंटल…..पुढे काय प्रश्न येणार आहे त्याचा अंदाज लागत नव्हता.
पण लाकूडतोड्याने दुसरी कुऱ्हाड का विकत घेतली नाही?
मी म्हंटल अरे तो गरीब होता. त्याला परवडली नसती.
मग देवीने कुऱ्हाडीची कॉस्ट कमी का नाही केली ?
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================
यावर काय उत्तर देणार याचा विचार करत असताना पुढचा प्रश्न आला.
लाकूड़तोड्याकडे सेव्हिंग्ज नव्हती का? एवढे दिवस काम करून त्याने "इमर्जन्सी फंड" जमा केला नाही?
माझ्या लक्षात आलं. दोनच दिवसांपूर्वी मी त्याला इमर्जन्सी फंड बद्दल सांगितले होते. त्या ज्ञानाचा वापर त्याने लगेच केला होता.
मला हसू आलं. आता पुढे ही गोष्ट सांगण्यात काही अर्थ नव्हता. मी गोष्टीला ट्विस्ट दिला. म्हणालो, "तुझं अगदी बरोबर आहे. इमर्जन्सी फंड, सेव्हिंग्ज आणि झाडं न तोडणं... हे सगळं आजच्या जगात खूप महत्त्वाचं आहे. पण तेव्हा ते लाकूडतोड्याला माहित नव्हतं"
ही गोष्ट खूप जुनी आहे. त्या काळात त्या लाकूडतोड्याला इमर्जन्सी फंडाबद्दल किंवा दुसरं काम करण्याबद्दल कुणी सांगितलं नव्हतं. त्याला फक्त माहित होतं की त्याला लाकूड तोडूनच पोट भरायचं आहे."
देवीने त्याला सोन्याची किंवा चांदीची कुऱ्हाड दिली नाही. कारण देवीलाही वाटलं की त्याने दुसऱ्यावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभं राहावं. देवी म्हणाली की मी तुला थेट मदत करणार नाही. पण तुझी कुऱ्हाड हरवली आहे याकडे समस्या म्हणून नव्हे तर संधी म्हणून बघ.
वर्षानुवर्षे तू लाकडं तोडून बाजारात जाऊन विकणे हेच काम करतोयस म्हणून तुझं लक्ष दुसरीकडे जात नाही. आजूबाजूला नीट बघ. या जंगलात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला उदरनिर्वाहासाठी मदत करतील. तुझ्याकडून कधीही हरवणार नाही असं काहीतरी काम शोध. एवढं बोलून देवी अंतर्धान पावली.
लाकूडतोड्याला काय करावे ते कळत नव्हते. देवीच्या बोलण्याचा अर्थ लावत असतानाच त्याला सुचलं की मी झाडं तोडण्यापेक्षा झाडांवरची फळं तोडतो आणि फळं बाजारात जाऊन विकतो. त्याने तोच व्यवसाय सुरु केला. इतकी वर्षे जंगलात आल्यामुळे त्याला जंगलाची बरीच माहिती होती. पुढे पुढे त्याने जंगलातून मध, औषधी वनस्पती आणि कंदमूळं देखील मिळवून विकायला सुरुवात केली.
तिथेच न थांबता त्याने जंगलातील दुर्मिळ वनस्पतींमधून औषधे स्वतः तयार करायला सुरुवात केली. आता तो त्याच्या माहिती , ज्ञान आणि कौशल्याच्या आधारे पैसे कमवत होता. त्याला कुऱ्हाड हरवण्याची चिंता नव्हती. कारण कुऱ्हाड हरवू शकते. पण ज्ञान आणि कौशल्य कोणीच आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. या नव्या दृष्टिकोनाबद्दल लाकूडतोड्या दररोज देवीचे आभार मानत असे.
गोष्ट ऐकताना बाळ कधी झोपी गेलं ते कळलेच नाही. माझी झोप उडाली होती. कितीतरी कॉर्पोरेट लाकूडतोड्यांच्या कुऱ्हाडी AI नामक विहिरीमध्ये रोज पडताना दिसत होत्या !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !