There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
कल्पना करा की तुम्ही एका दुकानात घड्याळ खरेदी करत आहात. तुम्हाला त्याचा ब्रँड आणि डिझाइन दोन्ही आवडले आणि ₹999 ही किंमत तुमच्या बजेटमध्ये बसते. तुम्ही ते घेण्याचा निर्णय घेता, पण पैसे देणार इतक्यात तुमची एका जिवलग मित्राशी अचानक गाठ पडते. त्याचे लक्ष त्या घड्याळाकडे जाते आणि तो तुम्हाला सांगतो की त्याने तेच घड्याळ रस्त्याच्या पलीकडच्या दुकानात बघितले आहे - आणि तिथे त्याची किंमत ₹899 आहे. तब्बल शंभर रुपयांनी कमी!
तुम्ही काय कराल? मला वाटतं, आपल्यापैकी बहुतेकजण रस्त्याच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या दुकानात जातील आणि शंभर रुपये वाचवतील. जेव्हा तेच घड्याळ ₹899 मध्ये मिळत आहे, तेव्हा ₹999 का खर्च करायचे?
https://www.facebook.com/share/p/1M9US4LFe8/
आता दुसऱ्या परिस्थितीची कल्पना करा. तुम्ही एका दुकानात एक महागडं स्विस घड्याळ खरेदी करत आहात. तुम्हाला त्याचा ब्रँड आणि डिझाइन आवडले आहे. त्याची किंमत तब्बल ₹2,50,000 आहे. आणि तुम्ही ते खरेदी करण्याचा निर्णय घेता. पैसे देणार इतक्यात तुमचा तोच जिवलग मित्र तिथे भेटतो. तो तुम्हाला सांगतो की हेच घड्याळ रस्त्याच्या पलीकडच्या दुकानात ₹2,49,900 ला उपलब्ध आहे. बरोबर शंभर रुपयांनी कमी!
आता तुम्ही काय कराल? बहुतेक लोकांप्रमाणे, तुम्ही कदाचित तिथेच थांबाल आणि त्याच दुकानातून ते खरेदी कराल. अखेर, जिथे तुम्ही अडीच लाख रुपये खर्च करत आहात, तिथे शंभर रुपयांची काय किंमत?
खरं तर हे खूप विचित्र आहे, नाही का ? एका व्यक्तीसाठी शंभर रुपयांचे मूल्य हे सारखेच असते - आणि सारखेच असायला हवे - मग तुम्ही त्या क्षणी ₹999 खर्च करत असाल किंवा ₹2,50,000.
पण आपण एका असंबंधित (तिसऱ्याच) गोष्टीमुळे भरकटून जातो. आपण त्या क्षणी किती खर्च करत आहोत, यावर आपली बचत करण्याच्या पैशाकडे पाहण्याची दृष्टी अवलंबून असते. जर शंभर रुपये वाचवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल, तर ते तुम्ही हजार रुपये खर्च करत असाल किंवा लाख रुपये, तरीही महत्त्वाचे असायला हवे. पण आपण किती खर्च करत आहोत त्याच्या तुलनेत किती बचत करत आहोत ते पाहतो.
हा 'विचित्र' फरक बिहेविअरल फायनान्स या विषयात स्पष्ट केला जातो आणि याला 'फ्रेमिंग इफेक्ट' असे म्हणतात. आपण पैशाकडे निरपेक्ष (Absolute) स्वरूपात न पाहता, त्या व्यवहाराच्या एकूण खर्चाच्या तुलनेत (Relative) पाहतो.
₹999 च्या संदर्भात (Frame): ₹100 ही बचत मोठी (10%) वाटते.
₹2,47,900 च्या संदर्भात (Frame): ₹100 ही बचत अगदी नगण्य (0.04%) वाटते.
आपण एका असंबंधित गोष्टीमुळे (वस्तूची एकूण किंमत) भरकटून जातो आणि बचत करण्याची आपली वृत्ती बदलून जाते. हाच फ्रेमिंग (माहिती कोणत्या चौकटीतून/संदर्भातून सादर केली जाते) चा प्रभाव आहे.
'फ्रेमिंग' हा प्रभाव केवळ खरेदी-विक्रीतच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील अनेक आर्थिक आणि आरोग्यविषयक निर्णयांमध्ये दिसतो.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
जेव्हा एखादा डॉक्टर म्हणतो: "या शस्त्रक्रियेनंतर 90% रुग्ण वाचतात." (सकारात्मक फ्रेम)
आणि दुसरा डॉक्टर म्हणतो: "या शस्त्रक्रियेत 10% रुग्णांना मृत्यूचा धोका असतो." (नकारात्मक फ्रेम)
तेव्हा माहिती समान असूनही, सकारात्मक फ्रेममुळे पहिल्या डॉक्टरच्या उपचारांना रुग्ण जास्त सहजपणे स्वीकारतात.
या फ्रेमिंगचा वापर प्रॉडक्ट मार्केटिंग मध्ये पण भरपूर केला जातो. एका बिस्किटाच्या पॅकेटवर लिहिले आहे: "95% Fat Free" (चरबीमुक्त)
दुसऱ्या पॅकेटवर लिहिले आहे: "5% Fat" (5% चरबी)
पहिले लेबल सकारात्मक फ्रेममध्ये असल्यामुळे लोक ते अधिक आरोग्यदायी मानतात आणि तेच खरेदी करतात, जरी दोन्ही उत्पादनांमध्ये चरबीचे प्रमाण समान आहे.
आर्थिक निर्णयांमध्ये पण "फ्रेमिंग इफेक्ट" लुडबुड करतो –
समजा तुम्ही एका क्रेडिट कार्डचे ₹10,000 कर्ज भरत आहात, ज्यावर 24% व्याज आहे.
दुसऱ्या एका दुचाकी कर्जाचे ₹1,00,000 बाकी आहेत, ज्यावर 10% व्याज आहे.
तार्किकदृष्ट्या, तुम्ही जास्त व्याज असलेल्या ₹10,000 च्या कर्जाची परतफेड (फ्रेम) प्रथम करायला हवी, पण अनेक लोक 'मोठ्या' कर्जाला (₹1,00,000) महत्त्व देऊन ते लवकर फेडण्याचा प्रयत्न करतात, कारण त्याची रक्कम मोठी वाटते.
जेव्हा करप्रणाली मध्ये केलेल्या बदलाला सरकार तर्फे "टॅक्स रिलीफ" किंवा "टॅक्स गिफ्ट" असे म्हंटले जाते तेव्हा ते एक फ्रेमिंगच असते.
किंवा जेव्हा एखाद्या गुन्ह्याला धर्माच्या रंगाने ओळखले जाते तेही एक फ्रेमिंग असते.
जेव्हा एखादा नेता आपल्या कामाऐवजी आपल्या घराण्याची, धर्माची, हलाखीच्या दिवसांची कहाणी सांगत असतो तेव्हा तो फ्रेमिंगच करत असतो.
जेव्हा एखादी कंपनी आमची उत्पादने तुम्हाला तंदुरुस्त करतील असे म्हणण्याऐवजी इतरांची उत्पादने तुमच्या आरोग्यास हानीकारक आहेत असे म्हणते तेव्हा ते देखील फ्रेमिंगचं असते.
आपण नेहमी तर्कशुद्ध (Rational) नसतो. आपण 'सापेक्ष' (Relative) दृष्टीकोन वापरतो. आपल्याला माहिती कशा प्रकारे सादर केली जाते, याचा आपल्या निर्णयांवर प्रभाव पडतो.
म्हणून, पुढील वेळी जेव्हा तुम्ही कोणताही निर्णय घ्याल, तेव्हा स्वतःला विचारा: 'मी कोणत्या संदर्भातून (फ्रेममधून) या माहितीकडे पाहतो आहे'. आता फ्रेमिंग इफेक्टची माहिती झाल्यामुळे तुम्ही अधिक जागरूक ग्राहक आणि नागरिक बनू शकता. आता तुमच्याकडे ती शक्ती आहे की तुम्ही माहितीच्या 'पॅकेजिंग'मधून खरे तथ्य काढून घेऊ शकता."
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !