"पैशांचा पाऊस की प्रामाणिकपणाची परीक्षा?"

समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्यातून पैशांच्या गोणी बाहेर पडल्या. गोणी फुटून त्यातील नोटा इतस्ततः विखुरल्या. ड्रॉयव्हरला हे लगेच कळले नाही आणि गाडी तशीच भरधाव पुढे निघून गेली.

या परिस्थितीत तुम्ही काय कराल ?

१ . फ्री पैसे मिळत आहेत म्हणून रस्त्यावर विखुरलेले पैसे जमा करायला सुरुवात कराल

२ . ते पैसे आपले नाहीत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मार्गावर पुढे चालत राहाल

३ . त्या गाडीचे नुकसान होऊ नये म्हणून पोलिसांना फोन करून झाल्या प्रकाराची माहिती द्याल

नीट विचार करून स्वतःलाच अत्यंत प्रामाणिकपणे आपण या परिस्थितीत काय केले असते याचे उत्तर द्या. उत्तर दिल्यानंतरच पुढे वाचा.

२०२१ मध्ये कॅलिफोर्नियात प्रत्यक्षात ही घटना घडली होती. भर महामार्गावर अचानक पैशांचा पाऊस पडू लागला. एका गाडीतून एक डॉलर आणि वीस डॉलरच्या नोटांनी भरलेली पोती जात होती, तेव्हा गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि ही पोती खाली पडली. पोती फुटली आणि भरधाव वेगामुळे सगळ्या नोटा हवेत उडाल्या, जणूकाही आकाशातून पैशांचा पाऊस पडत आहे.

हे दृश्य बघून सगळेच अवाक झाले. महामार्गावर ७० मैल प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाड्यांचे ड्रायव्हर्स अचानक जागेवरच थांबले. त्यांनी गाड्या सोडून धावपळ सुरू केली. हवेत उडणाऱ्या, रस्त्यावर पडलेल्या नोटा गोळा करण्यासाठी सगळेच वेड्यासारखे धावत होते, ओरडत होते.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2

येथे क्लिक करा.

================

काही क्षणात महामार्गावर गाड्यांची मोठी रांग लागली. पैसे जमा करण्यात मग्न असलेल्यांना कशाचंच भान नव्हतं. सुदैवाने, या विचित्र घटनेत कुणीही जखमी झालं नाही.

खरं तर, पैसा कुणाला आवडत नाही? पहिल्यांदा मनात फ्री मिळणारा पैसा जमा करण्याचा विचारच बरोबर वाटतो. पण नीट विचार केला तर याचे संभाव्य धोके लक्षात येतील.

भर महामार्गावर मध्येच सोडून दिलेल्या गाडीला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली, तर होणारं रस्त्यावर मिळालेल्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त असेल. शिवाय, रस्त्यात थांबून पैसे गोळा करणाऱ्याच्या गाडीमुळे जर अपघात झाला आणि कुणाचा जीव गेला, किंवा पैसे गोळा करताना त्या व्यक्तीलाच ट्रकने उडवलं, तर काय होईल?

पैसा ही जादूई गोष्ट आहे. त्यामुळे पैसा दिसला की दुसरे काहीच विचार लोकांच्या मनात येत नाही. ज्यांनी गाडी रस्त्यावरच बंद करून पैसे गोळा करायला धाव घेतली, त्यांना पोलिसांनी अटक केली आणि गाड्या टो करून नेल्या. त्यांना बसलेला दंड, गोळा केलेल्या पैशांपेक्षा खूप जास्त होता.

पोलिसांनी टीव्हीवर सांगितलं की हा ‘फ्री पैसा’ नाहीये, ही चोरी आहे. नंतर पोलिसांनी सांगितलं की त्यांच्याकडे गाड्यांच्या नंबर प्लेट्स आणि पैसे घेणाऱ्यांचे चेहरे CCTV मध्ये रेकॉर्ड झाले आहेत. जर ४८ तासांत पैसे परत केले नाहीत, तर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यानंतर लोकांनी पैसे परत केले.

वर दिलेल्या तीन पर्यायांपैकी ज्यांनी पहिला पर्याय निवडला ते स्वार्थी आणि चोर आहेत, दुसरा पर्याय निवडला ते प्रामाणिक आहेत आणि तिसरा पर्याय निवडला ते आहेत ते प्रामाणिक आणि आदर्श नागरिक आहेत. आता आपण यापैकी कोण आहोत ते तुमचं तुम्हाला तपासून पाहता आले असेल. आणि आपण मिळूनच आपला देश बनतो हेही लक्षात आलं असेल.

आणखी एक महत्वाचा मुद्दा. आपल्याला नेहमी वाटतं की पैसा हेच अंतिम ध्येय आहे. पण केवळ पैशाच्या मागे धावणं योग्य नाही. जर आपण चांगलं काम केलं, तर पैसा आपोआप येतो. त्यामुळे कामाच्या मागे धावणं जास्त महत्त्वाचं आहे. पण काही लोक पैशाच्या मागे लागतात.

जर तुम्ही चांगलं काम करत राहिलात, तर तुमचं काम बोलतं. पण जर तुम्ही फक्त जास्त पैसा कमावण्याच्या मागे लागलात तर ते काम तुमच्याकडून निघून जायला वेळ लागणार नाही. पैसा ही यशाची अंतिम पायरी नाही, तर ती एक उपलब्धी आहे.

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !