"टेनिस सम्राट आणि त्याचा गुरू"

रॉजर फेडरर हा टेनिस जगातील सम्राट आहे. एक महान टेनिस खेळाडू म्हणून त्याने नाव तर कमावलं आहेच पण त्यासोबत तो एक चांगला माणूसही आहे ....आणि म्हणूनच बहुदा त्याचे चाहते जगभर आहेत. रॉजरच्या त्याच्या गुरुप्रती असलेल्या प्रेमाचे एक उदाहरण नुकतंच वाचनात आलं ते नेटभेटच्या वाचकांसोबत शेअर करतोय.

फेडररचे टेनिस स्किल्स लहानपणीच दिसू लागले होते. पण त्याच्यातील क्षमता ओळखून फेडररला तांत्रिक आणि मानसिक पातळीवर जगज्जेता खेळाडू बनविण्याचे काम केले कोच पीटर कार्टर यांनी. पीटर कार्टर हे ऑस्ट्रेलियन खेळाडू होते. सततच्या दुखापतींमुळे त्यांचे टेनिस करिअर रुळावर येत नव्हते. थोडे पैसे कमावून पुन्हा प्रोफेशनल टेनिस कडे वळावे या उद्देशाने त्यांनी स्वित्झर्लंड मध्ये एक तीन महिन्यांची कोचिंग असाइनमेंट स्वीकारली. याच वेळी त्यांना फेडरर सापडला आणि पुढे इतिहास घडला.

तीन महिन्यांसाठी सुरु केलेले कोचिंग करिअर हेच पुढे पीटर कार्टर यांचे मुख्य करिअर बनले. रॉजर फेडररला त्याचा प्रसिद्ध बॅकहॅन्ड शिकविण्यात पीटर कार्टर यांचा प्रमुख सहभाग होता. खेळात चांगला असला तरी रॉजर फेडरर एक गरम डोक्याचा खेळाडू होता. लगेच रागवायचा आणि रागाच्या भरात गेमवरील फोकस आणि नियंत्रण दोनीही हरवून बसायचा. पीटर कार्टर त्याला नेहमी मानसिक पातळीवर तयार करण्यासाठी प्रयत्न करत. जर तू स्वतःमध्ये हा बदल केला नाहीस तर तुझे करिअर अपेक्षित उंचीवर न पोहोचता अचानक संपून जाईल असे ते त्याला नेहमी सांगत.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी

https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2

येथे क्लिक करा.

================

२००२ साली टोरोंटो मध्ये खेळत असताना रॉजरच्या कानावर एक बातमी आली, जिने रॉजर फेडररचे आयुष्य कायमचे बदलून गेले. दक्षिण आफ्रिकेमध्ये एका कार अपघातात कोच कार्टर यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रॉजर फेडरर ने गंभीरपणे आपल्या खेळाकडे बघायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये कमालीचा बदल झाला.

पुढच्याच वर्षी २००३ मध्ये रॉजर फेडरर पहिल्यांदाच विम्बल्डन मध्ये ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकला. आणि पुढे जिंकतच गेला.

पीटर कार्टरचे आई-वडील ऑस्ट्रेलिया मध्ये राहतात. जेव्हा जेव्हा फेडरर ऑस्ट्रेलिया मध्ये खेळला तेव्हा तेव्हा त्याने आपल्या प्रशिक्षकाच्या आईवडिलांना आवर्जून सामन्याची तिकिटे पाठवली. सोबत विमानप्रवासाची तिकिटे, हॉटेल बुकिंग आणि जाण्यायेण्यासाठी कारची देखील सोय केली. कार्टरचे आई वडील मात्र केवळ फायनल असेल तरच जात असत .... आणि ते देखील फेडरर फायनल मध्ये खेळत असला तरच !

जेव्हा जेव्हा फेडरर ऑस्ट्रेलियात जिंकला आहे तेव्हा तेव्हा कार्टरचे आईवडील विशेष पाहुण्यांच्या गॅलरीत बसून सामना पाहात होते. अगदी फेडररच्या निवृत्ती पर्यंत !

आपल्याकडे कितीही कौशल्य असलं तरी गुरु, मार्गदर्शक आणि शिस्त यांचं महत्त्व प्रचंड आहे. फेडररसारखा दिग्गज खेळाडूही आपल्या गुरुंच्या आठवणीने नम्र राहतो आणि त्यांचे ऋण फेडतो.

आपणही आपल्या जीवनात असे प्रश्न विचारायला हवे –

"माझ्या जीवनात कोण मला मार्गदर्शन करतो आहे?"

"माझ्या यशात मला कोणाकोणाची मदत झाली आहे ?"

"मी त्यांच्या प्रती ऋणी आहे का ?"

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट इलर्निग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !