10 उत्तम सवयी ज्याने होईल तुमची आर्थिक भरभराट - (भाग 2) (#Finance_Tuesday)

गेल्या भागात आपण पाहिलं की अनेक अशा सवयी ज्या जर कायमस्वरूपी अंगी बाणण्यात आपण यशस्वी झालो तर निश्चितच आपण आपली आर्थिकदृष्ट्या प्रगती करू शकू, त्यापैकी एक म्हणजे आपली जीवनाची उद्दीष्ट ठरवा आणि दुसरं म्हणजे आर्थिक बाबतीत अंथरूण पाहून पाय पसरा.. या दोन सवयींबरोबरच आणखीही अशा अनेक चांगल्या आर्थिक सवयी आहे, ज्यामुळे आपला आर्थिक उत्कर्ष आपण साधू शकतो. आज जाणून घेऊया अशा आणखीन सवयींविषयी -

3. नेहमी जवळ पुरेशी कॅश असू द्यावी -

समजा, तुम्ही कोणत्याही अडचणीत सापडलात तर तुमच्या खिशात पुरेशी कॅश.. नगद असली पाहिजे. आपण हल्ली ऑनलाईन पेमेंटवर विसंबून निर्धास्त असतो. क्रेडीट कार्डचा सपोर्टही आपल्याला असतो त्यामुळे अगदीच पैसे कमी पडले तर आपण क्रेडीट कार्डनेही खर्च करू शकतो असा आपल्याला मनोमनी विश्वास असतो. पण अनेकदा, अनेक परिस्थिती अशा येतात, जेव्हा नगदी रक्कम जवळ असेल तर काम चटकन होऊन जातं. उदाहरणार्थ, समजा तुम्ही सकाळी लवकर उठून ऑफीसला जायला निघालात आणि वाटेत तुमची कार बंद पडली.. किंवा दुचाकी सुरूच झाली नाही तर तुम्हाला त्या गाडीला दुरुस्त करून घेण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. कधी गॅरेजपर्यंत पोचण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टही वापरावं लागू शकेल, अशावेळी आपल्याजवळ जर अजिबात कॅश नसेल तर आपल्यावर फारच अडचणीचा प्रसंग ओढवू शकतो. म्हणूनच, अशा कोणत्याही आपत्कालीन प्रसंगाला निभावून नेण्यासाठी जवळ नेहमी पुरेशी कॅश बाळगायची सवय स्वतःला लावा.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

4. कर्जाचा नीट वापर करायला शिका -

अनेक आर्थिक सल्लागार नेहमी सांगतात, की शक्यतो कर्ज घेऊच नका, मात्र, सगळीच कर्ज वाईट नसतात. उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कर्ज काढून कार घेतलीत किंवा घर घेतलंत तर हे तर तुम्ही चांगलंच केलंत नं.. ? म्हणूनच, क्रेडीट कार्ड अर्थात .. तुम्हाला मिळालेलं क्रेडीट हे जबाबदारीने व योग्य ठिकाणी वापरायची सवय लावा. शिक्षणासाठी, उद्योग व्यवसायासाठी अशा चांगल्या कारणांकरता कर्जाऊ घेतलेली रक्कम वापरा. ती उधळू नका.

5. नियोजनबद्ध गुंतवणूक करा -

तुम्हाला मिळणाऱ्या नियमीत पगाराचा किंवा तुम्ही जी रक्कम दरमहा किंवा वर्षाकाठी तुमच्या मेहनतीने जमा करता, त्या सगळ्या रकमेचं नीट नियोजन करून त्यानुरुप गुंतवणुक करण्याची सवय लावा. सर्वात महत्वाचं म्हणजे, ही सवय अगदी कमवायला सुरुवात केल्यापासूनच अंगिकारायला हवी. आपल्याकडे बरेचवेळा हीच चूक घरोघरी होते, ती म्हणजे, गुंतवणूक करायला आपण उशीरा सुरुवात करतो. अनेक घरांमधून आईवडीलसुद्धा आपल्या तरूण कमावत्या मुलांबाबत, तो किंवा ती गुंतवणुकीबाबत विचार कऱण्यासाठी अजून खूप लहान आहेत असाच विचार करतात, व त्यांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्याऐवजी त्यात मोडता घालतात. या सवयीचे फार मोठे दुष्परिणाम भविष्यात दिसतात तोवर वेळ निघून गेलेली असते.

भविष्याचा पूर्ण अंदाज घेऊन, त्यानुरुप गुंतवणुकीला आजच सुरुवात करा. घरगुती खर्चाबरोबरच, अचानक येणाऱ्या वैद्यकीय समस्या, अपघात, निवृत्ती योजना या सगळ्याचे आर्थिक नियोजन आधीच करून ठेवलेले बरे..

विविध प्रकारच्या गुंतवणूक योजनांची नीट माहिती करून व आपल्या स्वतःच्या दीर्घकालीन व अल्पकालीन गुंतवणुकीचे नियोजन करून त्यानुरूप पैसे गुंतवण्याची उत्तम सवय आजच अंगी बाणा.

6. स्वस्तात मस्त हा विचार करायला शिका -

अनेकांना खरंतर फार महाग गोष्टी घेण्याची सवय असते, जे महाग तेच उत्तम अशी एक धारणा त्यांच्या मनात असते.. पण अनेक गोष्टी, अनेक वस्तू अशा असतात की ज्या अकारणच महाग विकल्या जातात. बाजारात गेल्यावर तुलनात्मक फरक अशा वस्तूंमध्ये फारसा आढळून येत नाही. केवळ ब्रँडचा टॅग लावूनही अनेक वस्तूंच्या किंमती बाजारात फुगवून दिलेल्या तुम्ही सुद्धा अनेकवेळा पाहिल्या असतील. म्हणूनच, स्वस्तात मस्त हा फंडा खर्चाच्या बाबतीत लागू पडतो. आपल्याला जी वस्तू घ्यायचीये ती खरंच तितकी महाग घेणं गरजेचं आहे का हा विचार करा. तसंच आपण जी महाग वस्तू खरेदी करतोय त्याला कमी किमतीतला उत्तम पर्याय उपलब्ध आहे का तेही एकदा शोधा आणि मग खर्च करा.. म्हणजे तुमचे पैसे वाचतील आणि अकारण वायाही जाणार नाहीत.

7. तुमचे कर्मचारी लाभ उपभोगा -

जर तुम्ही स्वतःच मालक असाल तर मग हे तुमच्यासाठी नाही.. मात्र जे नोकरदार मंडळी आहेत त्यांना मात्र त्यांच्या कंपनीकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यायला हरकत नाही. तुमच्या कंपनीने तुमच्यासाठी म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या निरनिराळ्या योजना लागू केलेल्या असतात त्यांचा फायदा घ्या. जसं की रिटायरमेंट मॅच, लाईफ ऑर डिसेबिलीटी इन्शुरन्स, हेल्थ सेव्हींग्स अकाऊंट, एम्प्लॉयी स्टॉक पर्चेस प्लॅन्स, लीगल सर्व्हीसेस .. वगैरे.

आणखीही काही उत्तम आर्थिक सवयींबाबत वाचा पुढल्या मंगळवारी याच लेखाच्या पुढल्या भागात.. !

( या लेखाचा 1 ला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा - https://learn.netbhet.com/blog/10-habits-that-will-help-you-to-become-Rich-finance-tuesday )

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com