5 Seconds Rule

#Saturday_Bookclub

मेल रोबिन्स लिखीत 5 सेकंड्स रूल हे पुस्तक जीवनाकडे पहाण्याचा आपला दृष्टीकोनच बदलून देतं. हल्ली आपण सगळेच एका गोष्टीबाबत फार सतर्क झालेलो आहोत, ती म्हणजे मोटीव्हेशन .. अर्थात प्रेरणा. पण या पुस्तकाचे लेखक म्हणतात, प्रेरणा मिळविण्यापेक्षा जर आपण हा 5 सेकंड्सचा रूल अंमलात आणून जीवन जगायला लागलो तर आपण जीवनात नक्कीच अधिक यशस्वी होऊ शकू.

काय आहे हा 5 सेकंड्सचा रूल .. ?
आपल्या सगळ्यांच्याच जीवनात भीतीचे, अस्थिरतेचे आणि अत्यंत कठीण असे क्षण येतातच येतात पण यावर मात करणं आपल्याला खरंच फार सहज शक्य आहे आणि ती करण्यासाठीच हा पाच सेकंदाचा नियम या पुस्तकात सांगितला आहे. लेखिका म्हणते, या पाच सेकंदामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासपूर्ण, अधिक साहसी आणि जीवनाप्रती अधिक आनंदी व्हाल. या नियमाचा अवलंब केल्यास तुमची प्रॉडक्टीव्हीटी तर वाढेलच त्याचबरोबर तुम्ही स्वतःला दरवेळी गेल्यावेळेपेक्षा अधिक दमदारपणे पुढे आणाल आणि स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून स्वतःच सतत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत रहाल.

कसा अप्लाय करायचा हा 5 सेकंड्स रूल ..?
एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही ठरवलं असेल की रोज व्यायाम करायचा पण प्रत्यक्षात व्यायाम करायला सुरुवात करण्यापूर्वीच तुम्ही कंटाळलेले असाल तर अशावेळी इतकंच करायचं, मनातल्या मनात 5...4..3...2...1 असे पाच ते एक उलटे आकडे मोजत यायचं आणि 1 आकड्यानंतर लगेचच शरीराची हालचाल करायला, म्हणजे व्यायाम करायला सुरुवात करायची.

एकंदरीत काय, कोणत्याही क्षणी जर तुम्हाला निराश वाटत असेल, किंवा एखाद्या वेळी तुमच्या मनात आत्मविश्वासाची कमी वाटत असेल, किंवा केव्हाही जर तुम्ही कोणतंही ध्येय गाठण्याचं ठरवाल अशा कोणत्याही क्षणी हा रूल वापरून तुम्ही स्वतः लगेचच ते काम करायला प्रत्यक्षात सुरुवात करायला पाहिजे आणि तसे केल्याने तुम्ही स्वतःची प्रगतीच कराल यात शंका नाही असे पुस्तकात सांगितलेले आहे.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

याचा फायदा काय?
या नियमाचा खरंतर एकच नाही तर अनेक फायदे आहेत. जेव्हाही तुम्ही अशी उलटी मोजणी सुरू करता, तेव्हा अगदी पाच सेकंदातच तुमचं मन दुसरीकडे वळवण्यात तुम्ही यशस्वी होता. विशेषतः जेव्हा तुम्हाला भीती वाटत असते, किंवा अशाश्वती वाटायला लागते तेव्हा केवळ पाच सेकंदाचा हा नियम वापरताच तुमचं मन तुम्हाला या भावनांमधून बाहेर काढून स्वतःच्या आत्मविश्वासावर लक्ष केंद्रीत करायला भाग पाडतो.. पण महत्त्वाचं म्हणजे फक्त पाच ते एक उलटी मोजणी करून तुम्हाला थांबायचं नाहीये, तर ती मोजणी होताच तुम्हाला प्रत्यक्षात ती कृती करायची आहे जी तुम्ही मनाने त्या क्षणी करू इच्छिता.

समजा, तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलात आणि प्रत्यक्षात तुमचं नाव पुकारलं गेल्यावर तुम्हाला प्रचंड भीती वाटायला लागली तर अशावेळी चटकन पाच सेकंदाचा हा नियम वापरून पहा आणि मोजणी पूर्ण होताच लगेचच मुलाखतकक्षाच्या दिशेने चालायला लागा.. बघा तुम्हाला आत्मविश्वासपूर्ण वाटतं की नाही ते ..!

भावना आणि कृती -
असं विज्ञानाने सिद्ध झालंय की आधी तुमच्या मनात भावना येतात आणि मग तुम्ही त्यानुरूप कृती करता म्हणून नेहमी तुमच्या भावनांकडे लक्ष ठेवा. जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, निराश वाटेल, हरल्यासारखं वाटेल तेव्हा पाच सेकंदाचा नियम वापरून स्वतःच्या मनातील भावना बदला आणि मग नव्या विचारांनी, नव्या भावनांसह कृती करा.. बघा तुमचं जीवन बदलेल. छोटी छोटी उद्दीष्ट ठेऊन हा नियम वापरून पहा. अगदी झोपेतून लवकर उठण्यासारखं छोटं टार्गेट समोर ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी हा नियम वापरून पहा. तुम्हाला निश्चितच या नियमाचा उपयोग होईल.


हे पुस्तक वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - https://salil.pro/5secondsrule


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
Learn.netbhet.com