यशस्वी स्टार्टअपची ६ वैशिष्ट्ये

कोणताही नवीन बिझनेस सुरु झाला आणि काही दिवसातच यशस्वी झाला असे होत नाही. बिझनेसचा जम बसवणे, आपले ब्राण्ड आणि ब्राण्डची ओळख निर्माण करणे ही एक दिर्घ आणि सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे. नवीन स्टार्टअप्स याला अपवाद नाही. खर तर अशा सुस्थापित कंपन्या ज्या वर्षानुवर्षे तेच उत्पादन किंवा सेवा पुरवत आहेत त्यांच्या तुलनेत ही प्रक्रिया स्टार्टअप्स च्या बाबतीत अधिक जास्त वेळ घेणारी ठरु शकते. असे असले तरी सर्व स्टार्टअप्स यशस्वी होतातच असे नाही.

मग स्टार्टअप्स अयशस्वी का होतात आणि आपला स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी आपण काय करु शकतो? आपण आजच्या या लेखामध्ये एखादा स्टार्टअप यशस्वी होण्यामागे कोणती वैशिष्ट्ये आहेत ते पाहणार आहोत.

१. मार्केट रिसर्च.

जे स्टार्टअप्स स्वतःचा बिझनेस सुरु करण्याआधी आपण ज्या मार्केट मध्ये उतरणार आहोत त्या मार्केटचा तपशीलवार आणि कसून अभ्यास करतात अशा स्टार्टअप्स ची यशस्वी होण्याची शक्यता जे मार्केटचा अभ्यास करत नाहीत त्यांच्या तुलनेत वाढते. मार्केट रिसर्च विशिष्ट मार्केटमध्ये बिझनेस स्थापित करण्याच्या धोक्यांविषयी जागरूक होण्यास स्टार्टअपना मदत करते. एका स्टार्टअप चे मालक म्हणून जर आपण काम करत असलेल्या विशिष्ट मार्केट मध्ये चालू असलेले ट्रेंड्स, उद्भवणारा धोका आणि संधींबद्दल माहीती असेल तर त्या दिशेने बिझनेस ची वाढ करण्यास ते आपल्याला मदत होते. मार्केटची चांगली समज असणे आपल्या बिझनेस विषयी अनेक निर्णय घेण्यास महत्त्वाचे ठरते. हे केवळ आपल्याला सध्याच्या मार्केट परिस्थितीबद्दल चांगली माहिती देत नाही तर आपल्या निश्वित ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत देखील करते अशा प्रकारे आपला बिझनेस आणि ब्रांड सुधारतो.

२. आपले व्हिजन स्पष्ट ठेवा.

एका स्टार्टअप चे मालक म्हणून आपल्या ब्रॅण्ड चे व्हिजन आणि मिशन अधोरेखित करणे फार महत्त्वाचे आहे. कारण जोपर्यंत आपण कुठे पोहोचायचे आहे हे ठरवत नाही तोपर्यंत तिथे पोहोचण्यासाठी काय आणि कशाप्रकारे करावे लागेल याबाबत काहिच प्लॅन करु शकत नाही. आपला ब्रॅण्ड जे काही करेल ते आपल्या व्हिजन आणि मिशन ला अनुसरुनच असले पाहिजे. यामध्ये ग्राहकांना सेवा देण्यापासून, आपल्या उत्पादनाची विक्री आणि ग्राहकांच्या सतत संपर्कात राहणे या सर्वाचा समावेश होतो.

३. छोट्या मार्केट ला आपले लक्ष्य करा.

यशस्वी स्टार्टअप होण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट जी आपण करु शकतो ती म्हणजे छोट्या मर्केट ला टार्गेट करणे. मोठ्या मार्केट मध्ये प्रसिध्द बिझनेस आणि संस्था काम करत असतात त्यामुळे वातावरण मोठ्या प्रमाणात स्पर्धात्मक होते. आणि या वातावरणात बरेच अधिक अनुभवी आणि ज्ञान असलेले खेळाडू आहेत जे एखाद्या स्टार्टअपच्या दृष्टीने धोक्याचे आहे. त्यामुळे मोठ्या मर्केट मध्ये आपला स्टार्टअप प्रोमोट करण्यापेक्षा प्रथम छोट्या मार्केट्स ना लक्षात घ्या. यामुळे आपल्या ग्राहकांना कशाची गरज आहे आणि ते आपले उत्पादन वापरण्यास तयार आहेत की नाही याची आपल्याला चांगली कल्पना येईल.

४. ग्राहकांचा अनुभव

आपला बिझनेस पूर्णपणे स्थापित असो किंवा नवीन आपल्या ग्राहकांपर्यंत चांगला अनुभव पोहोचवणे महत्त्वाचे आहे. एक स्टार्टअप म्हणून सुप्रसिध्द बिझनेस च्या तुलनेत चांगला अनुभव ग्राहकांपर्यंत पोहोचवणे कठीण जाऊ शकते पण तरीही हे महत्वाचे आहे. फक्त नवीन ग्राहक मिळवण्याकडे आपला संपूर्ण लक्ष पुरवण्यापेक्षा आपल्या असलेल्या ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देणे यावर आपण जास्त भर दिला पाहिजे. आपले मुख्य लक्ष्य असे विश्वासू ग्राहक तयार करणे असले पाहिजे जे आपल्या ब्रॅण्ड बरोबर दिर्घ काळ टिकतील. यामुळे सुरवातीला कदाचित ग्राहक वाढणार नाहीत पण आपल्या ब्रॅण्ड चे मूल्य वाढण्यासाठी याची नक्कीच मदत होईल. जोपर्यंत आपले ग्राहक आपल्या उत्पादनावर किंवा सेवेवर खुश आणि समाधानी आहेत तोपर्यंत आपला स्टार्टअप योग्य मार्गावर आहे.

५. ग्राहकांचे अभिप्राय (Feedback) विचारात घ्या.

एखादा स्टार्टअप सगळ्यात महत्त्वाची जर कोणती गोष्ट करु शकतो तर ती म्हणजे आपल्या ग्राहकांकडून त्यांचे तपशिलवार, प्रामाणिक आणि मौल्यवान अभिप्राय मिळवणे आणि त्यावर अभ्यास करणे. स्टार्टअप्स साठी सुरुवातीला सर्वात महत्त्वाचे काम आपल्या ग्राहकांना चांगले उत्पादन किंवा सेवा पुरवणे, त्यांना सर्वात चांगला अनुभव देणे हे आहे. स्टार्टअप्स च नाही तर कोणत्याही बिझनेस च्या यशासाठी आपल्या ग्राहकांना चांगल्या क्वालिटी चे उत्पादन किंवा सेवा पुरवणे हेच मुख्य उद्देश्य असले पाहिजे. आपले उत्पादन किंवा सेवा ग्राहकांच्या मनासारखे करण्यासाठी त्यांचे अभिप्राय सर्वात मोठा दुवा ठरतात त्यामुळे त्यांचे अभिप्राय (Feedback) फार महत्त्वाचे असतात. ग्राहकांच्या अभिप्रायांना सकारात्मक दृष्टीकोनातून बघणे आपल्याला आपले उत्पादन किंवा सेवा सुधारण्यासाठी मदत करेल.


६. कंपनीची संस्कृती (Culture)

स्टार्टअप च्या अनेक मालकांना असे वाटते की एक स्टार्टअप म्हणून आपण फक्त काम आणि परिणामांवरच लक्ष दिले पाहिजे. पण तसे नाही. एक मालक, लीडर म्हणून तुम्हाला हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की यशस्वी उद्योजक कशाप्रकारे आपल्या कंपनीचे कल्चर तयार करण्यासाठी गुंतवणूक करतात. आपल्या कंपनीमध्ये काम करण्यार्‍या कर्मचार्‍यांसाठी काही उपक्रम राबवणे फार महत्त्वाचे ठरु शकते. अशाप्रकारचे उपक्रम कर्मचार्‍यांमध्ये कामाच्या प्रति उत्साह निर्माण करतात, विविध कांमामध्ये सहभाग घेण्याची पातळी उंचावतात आणि सर्वात महत्त्वाचे असे उपक्रम त्यांची प्रोडक्टीविटी वाढवण्यासाठी मदत करतात. अशा प्रकारचे उपक्रम कर्मचार्‍यांमध्ये सहकार्याची भावना जागवतात.

एखाद्या स्टार्टअपला यशस्वी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, अशी कल्पना जीची संपूर्ण मार्केट ला गरज असेल. त्याचबरोबर योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि वरती नमूद केलेले मुद्दे यासर्वांचा योग्य मेळ स्टार्टअप यशस्वी करण्यास नक्कीच मदत करेल.