भारतीय संस्कृतीतील ७ असे गुरु ज्यांनी इतिहास रचला

भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान सर्वोच्च आहे याचे कारण भारताला अनादीकाळापासून लाभलेले गुरु आणि त्यांचे ज्ञान आहे. इतिहासापासून आजपर्यंत घडून गेलेल्या कित्येक गुरुंनी त्यांच्या ज्ञानाच्या ओंजळीने आज आपल्याला दिसणारा हा ज्ञानाचा सागर भरला आहे यात काही शंकाच नाही. आजपर्यंत आनेक गुरु या देशाने आपल्याला दिले आहेत. जे फक्त त्यांनी निवडलेल्या क्षेत्रातच चमकले नाही तर त्यांनी त्याच्या ज्ञानाच्या आणि विचारांच्या तेजाने अज्ञानाने अंधारलेला आपला देश प्रकाशित केला आज आपण आशाच ७ गुरुंना या लेखातून मानवंदना देणार आहोत ज्यांनी फक्त लोकांना सज्ञानीच बनवले नाही तर एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित सुध्दा केले.

१. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

स्वतंत्र भारताचे पहीले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन फक्त यशस्वी नेतेच नव्हते तर प्रख्यात नावाजलेले शिक्षक सुध्दा होते. ५ सप्टेंबर १८८८ मध्ये जन्मलेल्या राधाकृष्णन यांची २०व्या शतकातील हुशार व्यक्तिमत्व अशी सुध्दा ओळख होती.

" एक खरा शिक्षक तोच असतो जो आपल्याला आपल्या बद्दल योग्य विचार करायला मदत करतो." या विचारसरणीवर त्यांनी आयुष्यभर विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे जगले.

देशाला योग्य आकार देण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो अशी त्यांची धारणा होती. डॉ. राधाकृष्णन यांनी भारत आणि पाश्चात्य देशातील अंतर कमी करण्यास मदत केली. "परिवर्तनासाठी शिक्षण" हे ब्रीद त्यांनी तरुण पिढीला दिले. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.

२. चाणाक्य

विष्णूगुप्त आणि कौटील्य अशा नावांनी सुध्दा ओळखले जाणारे चाणाक्य चौथ्या शतकाने आपल्या भारताला दिलेले महान गुरु होते. चाणाक्य यांनी तत्त्वज्ञानी, न्यायशास्त्रज्ञ आणि राजा चंद्रगुप्त मौर्य यांचे राजकीय सल्लागार अशा अनेकभूमिका निभावल्या.

त्यांनी नितीशास्त्र (म्हणजेच चाणाक्यनीती) आणि अर्थशास्त्र या दोन बहूमुल्य ग्रंथाची ठेव संपूर्ण भारताला दिली. हे दोन्ही ग्रंथ पुढच्या पिढीला अनुभवलेल्या सत्यतांचे ज्ञान देणारे आहेत. त्यांचा चाणाक्यनीती हा ग्रंथ विचार परिवर्तन करणार्‍या आणि यशस्वी जीवनाची मूल्य शिकवणार्‍या सूत्रांचा संच आहे.

३. रवींद्रनाथ टागोर

७ मे १८६१ रोजी जन्मलेले रवींद्रनाथ टागोर हे शैक्षणिक विद्वत्ता असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. एक लेखक म्हणून आपल्या लेखणीलाच शस्त्र मानून त्यांनी त्यांच्या लिखाणातून बिटीशांविरुध्द स्वतंत्र लढ्यात आवाज उठवला.

क्रियाशिलतेतून शिकलेल्या मुलांचा शारिरीक आणि मानसिक असा दूतर्फा विकास होतो, असे त्यांचे ठाम मत होते. त्यांच्या याच धारणेतून शांतिनिकेतन च्या प्रयोगाला चालना मिळाली इथे शिक्षणाबरोबरच शारिरीक म्हणजेच नाटक, नृत्य, झाडावर चढणे, फळ काढणे अशा पाठ्यक्रम बाह्य गोष्टी करण्यासाठी मुलांना प्रोत्साहीत करत असत. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना परिसंवाद, वादविवाद अशा अनेक गोष्टींमधून शिकवत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आपमध्ये लपलेल्या कलाकौशल्यांना वाव मिळत असे. "शिक्षणाचा उद्देश्य स्पष्टीकरण देणे हा नाही आहे तर ज्ञानाने त्यांच्या मनाचे दरवाजे उघडणे हा आहे." आशी त्यांची धारणा होती.

४. स्वामी विवेकानंद

"माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो" असे संबोधत पूर्ण जगाला भारतीय संस्कृतीची महत्ता सांगणारे आणि भारतीय संस्कृतीला जागतीक दर्जा देणारे विवेकानंदांना प्रत्येक भारतीय ओळखतो. अतुलनीय बुध्दीचे सागर अशी ख्याती असलेल्या विवेकानंदांचा जन्म १८६३ मध्ये झाला. त्यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना केली. या संस्थेतील साधू आणि त्यांचे अनुयायी वेद पुराण आणि हिंदू संस्कृती जनजागृती करण्याचे काम करतात.

हिंदू संस्कृतीतील गुरुकुल या शिक्षणपध्दतीवर त्यांचा विश्वास आणि पाठींबा सुध्दा होता. गुरुकुल म्हणजे जिथे विद्यार्थी आणि त्यांचे गुरु शिक्षणासाठी एकत्र राहतात. शिक्षणातून देशाचे सुजाण नागरिक घडवणे ह्यावर त्यांचा भर होता.

"शिक्षण म्हणजे माणसामध्ये अगोदरच असलेल्या गुणांचे प्रकटीकरण होय." अशी त्यांची धारणा होती. म्हणजेच विवेकानंदांच्या मते माणसामध्ये त्याला हवे असलेले गुण अगोदरच भरपूर प्रमाणात असतात शिक्षण हे त्यांना प्रकाशित करणारे माध्यम आहे.

५. सावित्री बाई फुले

या सगळ्या पुरुषांमध्ये आपले अस्तित्त्व ठळक पणे मांडणार्‍या या मराठमोळ्या स्त्री ला आपण कसे काय विसरु शकतो. पहील्या स्त्री शिक्षिका म्हणून ख्याती असलेल्या सावित्री बाई फुले. ज्यांनी स्त्रीयांविरुध्द होणार्‍या अन्यायाला वाचा फोडली. स्त्रीयांना सुध्दा पुरुषांप्रमाणे शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अतुलनिय आहेत. त्यांनी स्त्रीयांसाठी पहिली शाळा सुरु केली.

स्त्रीयांनासुध्दा पुरुषांप्रमाणे शिक्षणाचा अधिकार आहे, चूल आणि मूल इतकाच स्त्री चा
अधिकार नाही या धारणेच्या सावित्री बाई फुले हजारो स्त्रीयांची स्वप्न पूर्ण करणार्‍या स्त्रोत
बनल्या. त्यांनी अस्पृश्य समाजातील स्त्रीयांसाठी सुध्दा शाळा काढली. त्यांनी मुलांनी शाळेत येऊन शिक्षण घ्यावे यासाठी वेतन सुरु केले, त्याचबरोबर शिक्षक पालक सभा घेऊन मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटवून दिले. त्यांच्या कामगिरीचा आदर म्हणून पुणे विद्यापिठाचे नाव सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ असे ठेवण्यात आले.

६. Dr. APJ अब्दुल कलाम

भारतामध्ये असा एकही व्यक्ती सापडणार नाही ज्याला अब्दुल कलाम कोण आहेत ते माहीत नाही. कलामांची भारताचे मिसाईल मॅन अशी ओळख आहे. १५ ऑक्टोबर १९३१ मध्ये जन्मलेल्या कलाम यांनी यशस्वी शास्त्रज्ञ ते भारताचे अकरावे राष्ट्रपती असा मोठा प्रवास केला आहे. शिक्षणपध्दतीमध्ये बदल घडवून आणणे हे त्यांचे प्रमुख उद्दीष्ट होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी, खेळाची मैदाने, स्वच्छ प्रसाधनगृहे अशा मुलभूत सुविधा त्यांनी पुरवल्या. शहरी आणि ग्रामीण शिक्षणपध्दतीमध्ये समतोल आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. देशाती प्रत्येक खेडोपाड्यातील मुलांना बाहेर पडून शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केले.

जेव्हा त्यांच्या खेड्यातील माणसांमध्ये शिक्षणाचा अभाव आढळून आला तेव्हा त्यांनी आणि सामाजिक काम करणार्‍या संस्थांना शिक्षणाची ही दरी भरुन काढण्यासाठी मदतीचा हात मागीतला. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे.

७. गौतम बुध्द

सिध्दार्थ नावाने गौतम बुध्दांचा जन्म एका राजघराण्यात झाला होता. राजघराण्यातील सिध्दार्थ नेहमी आनंद आणि स्वातंत्र्याच्या शोधात असे शेवटी या शोधासाठी त्यांनी ऐशोआरामाचा त्याग केला आणि बोधी वृक्षा खाली तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांनी बौध्द या नवीन धर्माची स्थापना केली ज्याने लोकांना जगण्याचा नवीन मार्ग दिला. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी ही आठ मूल्ये त्यांनी जगाला दिली. बुध्दांनी स्थापन केलेल्या या धर्माचा आज जगभर प्रसार झाला आहे.

या सर्व गुरुंनी त्यांच्या जिवन शैलीतून आणि ज्ञानातून भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला अमूल्य ठेवा दिला आहे. नेटभेट कडून या सर्व गुरुंना दंडवत प्रणाम यापुढेही असेच गुरु या भारतात घडत राहोत हीच सदीच्छा.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
*नेटभेट ई -लर्निंग सोल्युशन्स*
मातृभाषेतुन शिकूया , प्रगती करूया !
Learn.netbhet.com