अपयशाची भीती कमी करण्याचे 

७ मार्ग

"अपयश ही यशाची पहीली पायरी आहे." ही ओळ अगदी सर्वांना तोंडपाठ आहे पण तरीही जेव्हा खर्‍या आयुष्यात अपयश येते तेव्हा आपण खचून जातो. आपण काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला आणि पहील्याच प्रयत्नात यशस्वी झालो असं क्वचितच घडते. अनेकवेळा पहील्या प्रयत्नात आपल्याला अपयश येतेच पण म्हणूच पुन्हा प्रयत्नच करु नये हे कितपत योग्य आहे. आपण अपयशाला इतके घाबरतो की पुन्हा प्रयत्नच करत नाही. अपयशाचा सामना करत करत
यशा पर्यंत पोहोचता येते हे आपण विसरुन जातो. याच अपयशाच्या भीतीचा सामना करण्यासाठी कोणते मार्ग आहेत ते आपण आजच्या या लेखातून पाहणार आहोत.

१. लाज न बाळगण्याचे धोरण स्विकारा.

अपयश आले म्हणून कोणतीही लाज बाळगू नका. आपल्याला अपयश आल्यावर आपणच जगातील एकमेव अशी व्यक्ती आहोत जी अशाप्रकारे अपयशी झाली असे वाटून घेतो आणि त्याचा त्रास करुन घेतो. या काळात आपले मित्र कसे आहेत यावर सुध्दा तुम्ही अपयशानंतर खचणार की सावरणार हे अवलंबून असते. त्यामुळे अशा मित्रांना निवडा जे अपयश आल्यावर तुमची खिल्ली उडवणार नाहीत किंवा मागून चूकीचं बोलणार नाहीत याउलट तुमची बाजू समजून घेऊन तुम्हाला बळ देतील. लक्षात ठेवा अपयश हा यशाच्या मार्गातील अविभाज्य घटक आहे जो कोणालाही चूकला नाही.

२. अपयशाचं कारण शोधून काढा.

अपयश आल्यानंतर आपल्याकडून काहीतरी गुन्हा झाल्याप्रमाणे स्वत:ला कुठेतरी बंद करुन घेऊ नका. त्यापेक्षा हा विचार करा की हे का झालं? आपलं नेमकं काय चुकलं? असे प्रश्न स्वत:ला विचारा त्यांची उत्तर शोधा आणि या चुका पुढील प्रयत्नात होणार नाही याची काळजी घ्या.

३. चुकांतून शिका.

आपल्या चूका न मान्य करणे आणि अपयशातून काहीच न शिकणे म्हणजे खरे अपयश आहे. आपण जोपर्यंत आपल्या अपयशाची जबाबदारी घेत नाही, आपल्या चूका स्विकारत नाही तोपर्यंत त्या दृष्टीने आपल्यामध्ये सुधारणा करणे निव्वळ अशक्य आहे.

४. मनामध्ये साठवून ठेवू नका.

अपयश आल्यानंतर कितीही केले तरी थोडेतरी खचायला होतेच यात काहीच अपवाद नाही. अपयशामुळे आलेली नकारात्मकता वाईट विचार मनामध्ये साठवून ठेवू नका. परीवारातील व्यक्तींशी किंवा जवळच्या मित्रांशी याबद्दल बोला. मनात साठवून ठेवल्याने घूसमट होते त्यापेक्षा जे काही मनात असेल ते कोणासमोर तरी व्यक्त करा.

५. आपल्यातील भीतीला प्रश्न विचारा.

आपल्या मनातील शंका, भीती या खरचं इतक्या महत्वाच्या आहेत का? खरच या सर्व सत्यात उतरणार आहेत का? आणि जरी या भीती खर्‍या ठरल्या तर असं आपलं काय नुकसान करणार आहेत? या भीतींमुळे पुन्हा एकदा अपयश येईल पण यश आलं तर? असे प्रश्न आपल्यातील भीती आणि शंकांना विचारा. या भीतीमुळे भविष्यात प्रयत्न न केल्याच्या पश्चात्तापापेक्षा भीतीवर मात करुन प्रयत्न करणे कधीही चांगले.

६.आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींकडेच लक्ष द्या.

आपण खुपवेळा अशा गोष्टींना घाबरतो किंवा त्यांचा जास्त विचार करतो ज्या आपल्या नियंत्रणातच नाहीत. त्या बदण्यासाठी आपण काहीच करु शकत नाही. त्यामूळे अशा गोष्टींकडे आपले लक्ष केंद्रीत करुन नकारात्मक विचारांना आमंत्रण देण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत, ज्या आपण सुधारु शकतो त्यांच्याकडे आपले लक्षकेंद्रीत करा.

७. अपयशाला मिठी मारायला शिका./ अपयशाचे आभार माना.

यश आणि अपयश या दोन गोष्टी आपण अंधार आणि उजेड याप्रमाणे समजू शकतो. अंधारच नसता तर आपल्याला कदाचित प्रकाशाची किंमत कधी कळलीच नसती. ज्याप्रकारे प्रकाशाचे महत्त्व समजण्यासाठी अंधाराची गरज आहे. त्याचप्रमाणे यशाची किंमत समजण्यासाठी अपयशाची आवश्यकता आहे. अपयशामुळेच आपण आपल्यातल्या क्षमतांना ओळखू शकतो त्यांच्यावर आभ्यास करु शकतो. त्यामुळे अपयशाचे आभार मानणे तितकेच महत्त्वाचे आहे.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com