"तुम्ही योग्य जागी आहात काय ?"(#Monday_Motivation)

एकदा एक उंटीण आणि तिचं पिलू एका झाडाखाली विसावले तेव्हा, तिच्या पिल्लाने तिला विचारले, "आई, आपल्या पाठीवर हे कुबड का असतं गं ?"

उंटीण म्हणाली," कारण, आपण वाळवंटी प्रदेशात रहातो, तिथे पाण्याची कमी असते पण म्हणूनच आपल्याला पाण्याची कमतरता भासू नये म्हणून देवाने आपल्या या मदारीत पाणी साठवण्याची क्षमता दिली आहे."

यावर पिलू म्हणालं, "अच्छा .. मग आपले पाय एवढे लांब लांब आणि असे विचित्र का आहेत ?"

त्यावर आई म्हणाली, "वाळवंटातल्या वाळूतून आपल्याला नीट चालता यावं म्हणून आपले पाय असे आहेत, शिवाय तिथे उष्णता खूप असते त्यामुळे वाळू चटकन तापते, अशा वेळी आपल्याला त्या वाळूच्या झळांनी त्रास होऊ नये म्हणून असे लांबा पाय देवाने दिले आहेत."

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

पिलू क्षणभर विचारात पडलं आणि पुन्हा त्याने प्रश्न केला, " आणि या अशा जाड जाड पापण्या .. त्या कशाला अशा जाड दिल्या आहेत..?"

यावर आई म्हणाली, "अरे बाबा, वाळवंटातली वाळू ही सतत हवेच्या झोताबरोबर उडत असते, आणि त्यामुळे ती आपल्या नाकात डोळ्यात जाऊन आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून देवाने अशा जाड पापण्या आणि मोठ्या नाकपुड्या आपल्याला दिलेल्या आहेत.."

पिल्लाने सगळं कान देऊन ऐकलं नि समजावून घेतलं.. आणि अखेरीस पुन्हा आईकडे एकच प्रश्न केला,

"आई .. समजलं, म्हणजे आपल्या शरीराची सगळी रचना ही वाळवंटी प्रदेशात आपण रहातो म्हणून अशी केली गेलेली आहे बरोबर नं .. ? मग आता मला एकाच प्रश्नाचं उत्तर दे, की आपण मग वाळवंटातच जाऊन का रहात नाही आहोत ..? आपण इथे या प्राणीसंग्रहालयात काय करतोय ..?"

मित्रांनो,

या कथेतून हाच बोध घ्यायचा, की प्रत्येक माणसाची एक जागा असते. त्यानुरूप, त्या माणसाकडे देवाने कौशल्य दिलेली असतात, म्हणून जर तुम्ही तुमच्या कौशल्याचा वापर करून त्या योग्य जागेवर असलं पाहिजे आणि जर तुम्ही तिथवर पोचू शकला नसाल तर आजपासूनच तुमच्यातील कौशल्यांचा विचार करून तुमची योग्य जागा शोधा आणि त्या दिशेने प्रयत्न करू लागा. बघा, एक ना एक दिवस यश तुमचंच असेल..

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com