नोकरी स्वीकारण्याआधी तुमच्या मालकांना हे प्रश्न विचारा ! (#Career_Wednesday)

नोकरीसाठी अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची, तयारी कशी करायची या आणि अशा अनेक मुद्द्यांबाबत आपल्याला अनेकजण मार्गदर्शन करत असतात पण सगळं नीट योग्य करूनही प्रत्यक्षात एखाद्या ठिकाणी नोकरी सुरू केल्यावरही अल्पावधीतच आपल्याला त्या कंपनीशी सूर जुळल्यागत वाटत नाही. असं का होतं याचा कधी विचार केलाय का तुम्ही ?

याचं कारण, आपण नोकरी मिळण्यासाठी एवढे उत्सुक आणि गरजू असतो की आपण त्या त्या एम्प्लॉयरशी अनेक टर्म्स सुरुवातीला क्लिअर करायलाच विसरतो..आणि त्यामुळेच जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण काम सुरू करतो तेव्हा काही ना काही कुरबुरी कामाच्या ठिकाणी सुरूच रहातात.

अनेकदा काही ठिकाणचं वर्क कल्चर इतकं विचित्र असतं की तिथे आपला जीव घुसमटतो. कधीकधी तर कामाच्या ठिकाणी इतका त्रास होतो की आपल्याला प्रचंड मानसिक ताण येतो... आणि पश्चात्ताप होतो. नोकरी सोडण्यासारखी परिस्थिती तेव्हा असत नाही म्हणून केवळ आपण त्या कंपनीत काम करत रहातो.

मित्रांनो, असं होऊ नये यासाठी सुरुवातीलाच काळजी घ्यायला हवी. आणि त्यासाठीच तुम्ही नोकरी स्वीकारण्यापूर्वीच काही प्रश्न तुमच्या बॉसला स्पष्टपणे व नम्रपणे विचारून घ्यायला हवेत, यामुळे तुमच्यावर लवकर लवकर नोकरी बदलण्याची वेळ येणार नाही. तर हे प्रश्न म्हणजे -

1. माझ्या आधी या जागेवर जे काम करत होते त्यांनी जॉब का सोडला ?

जर आधीच्या व्यक्तीला प्रमोशन मिळालं असं उत्तर मालकाने दिलं तर निश्चीतच ती कंपनी योग्य म्हणायची. आता यापुढे तुम्ही ज्या जागेसाठी नोकरी स्वीकारणार आहात त्यात पुढे करिअर कशाप्रकारे डेव्हलप करता येईल याविषयी बॉसकडून मार्गदर्शन करून घ्या. जर त्या पोझिशनला कोणतंही भविष्य नसेल तर असं काम स्वीकारू नका, कारण, तिथे तुमची प्रगती निश्चितच खुंटेल.

2. माझ्या परफॉर्मन्सची मोजदाद कशी केली जाईल ?

त्या जागी काम करताना तुमच्या कामाची, तुमच्या परफॉर्मन्सची मोजदाद कशी केली जाईल हे विचारा. त्यासाठी काही फॉर्मल मेथड आहे का, कोणी विशिष्ट व्यक्ती आहे का जी तुमच्या कामाची योग्यप्रकारे, योग्य पद्धतीने मोजणी करून मग तुमच्या कामाची योग्यता ठरवेल याबाबत विचारणा करा. तसंच, करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी तुमच्या कामाविषयी तत्क्षणी फीडबॅक लागतो तसा फीडबॅक तुम्हाला जर तिथे मिळणार नसेल तर त्याठिकाणी काम करू नका. कारण, जर तुम्हाला तुमच्या कामाचा वर्षाकाठी रिव्ह्यू मिळेल तर याचा अर्थ तुमचा बॉस किंवा त्या कंपनीला तुमच्या प्रगतीशी काहीही देणं घेणं नाही हे स्पष्ट लक्षात येतं.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

3. एम्प्लॉयी ट्रेनिंग, मेंटॉरशिप वगैरे कंपनी देते का ?

एक अशी कंपनी जी वेळोवेळी एम्प्लॉयी ट्रेनिंग्स कंडक्ट करते, मेंटॉरशिप प्रोग्राम्सवर इन्व्हेस्ट करते अशी कंपनी केव्हाही उत्तम, कारण ही कंपनी खऱ्या अर्थाने तुमच्या प्रगतीसाठी धडपडते आहे. आपल्या कंपनीचे एम्प्लॉयी चांगले व्यक्तिमत्त्व असावेत यासाठी जी कंपनी प्रयत्नशील असते तेथे काम करून तुम्हाला निश्चितच फायदा होईल.

4. तुमचं आयुष्य आणि काम यामध्ये संतुलन राखण्यासाठी तुमची कंपनी तुम्हाला सहाय्य करेल का ?

कोरोना पँडामिकपूर्वी कोणी हा प्रश्न विचारला नसावा, पण आता कोरोनानंतरच्या या काळात आपल्या एम्प्लॉयरला हा प्रश्न विचारून घेणे महत्त्वाचे आहे. याचं कारण, काम आणि आयुष्य यांचं संतुलन राखण्याची आता गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच, अशी कंपनी जिथे कर्मचाऱ्यांना फक्त कामाच्या ओझ्याखाली दाबून टाकलेले नसेल तर त्याऐवजी त्यांचे जीवन फुलवण्यासाठीही काही योजना, जसं की paid leave, medical leave, health checkup, family welfare fund or unit अशा नानाविध योजना कर्मचाऱ्यांकरिता आनंदाने राबवल्या जातात अशा कंपनीत काम स्वीकारा. यामुळे तुमचं जीवन निश्चितच सुंदर होईल.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com