भारतरत्न जेआरडी टाटा यांनी उत्तम नेतृत्व कसे असावे याविषयी सांगितलेल्या काही गोष्टी

आपण आपल्या कंपनीत टीमलीडर म्हणून काम करत असाल तर आपल्याला यांपैकी कोणत्या विचारांचा अवलंब प्रत्यक्षात करायला आवडेल, किंवा आपण यापैकी कोणते विचार प्रत्यक्षात अवलंबत आहात आम्हाला कमेंट करून जरूर सांगा.
आपण जर टीमलीडर नसाल तर आपल्या टीमलीडरला ही पोस्ट जरूर शेअर करा.. कदाचित जेआरडींच्या विचाराने आपल्या टीमलीडरच्या नेतृत्वातही काही चांगले बदल होऊ शकतील.. आणि तुमचे टीमलीडर तुम्हाला ही पोस्ट त्यांना शेअर केल्याबद्दल आवर्जून धन्यवाद देतील... !

1. उत्तम नेता तोच असू शकतो, ज्याला त्याच्या टीमने, त्याच्या अनुयायांनी नेता म्हणून स्वीकारलेले असते. जेव्हा हा स्वीकार असतो तेव्हाच त्या नेत्याच्या शब्दाला मान मिळतो.

2. कोणत्याही व्यवसायात नेत्याने सर्वानुमते आणि एकमताने कोणताही निर्णय घ्यावा. विशेषतः तेव्हा जेव्हा तुम्ही अत्यंत बुद्धिमान लोकांच्या चमुचे नेतृत्त्व करत असता, तेव्हा प्रत्येकाचं मत निराळं असू शकतं, म्हणूनच नेत्याने एकमताने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

3. जोवर तत्वांचा मुद्दा नसतो, तोवर दुसऱ्यांच्या दृष्टीकोनाचाही विचार नेत्याला करता आला पाहिजे. सहकाऱ्यांच्या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये लक्ष्य घालण्यापेक्षा त्यांना निर्णय स्वातंत्र्य देणंही फार महत्त्वाचं असतं. तसंच इतरांचे योग्य व ठाम विचारही नेत्याने स्वीकारायला शिकलं पाहिजे. 

4. व्यवसाय करताना अनंत अडचणी येतात, कधी नुकसान, कधी संकटं तर कधी विश्वासार्हतेचा मुद्दा ... अनेक अडचणी येतात, अशावेळी नेत्यामध्ये निर्णय क्षमता असली तरच तो व्यवसाय योग्य दिशेने पुढे जाऊ शकतो. 

5. केवळ निर्णय घेऊन नेत्याचं काम संपत नाही, तर नेत्याने आपल्या भूमिकेवर आणि आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम रहाणंही फार महत्त्वाचं असतं...त्या परिस्थितीत आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता हे नेत्याने जबाबदारीने इतरांना पटवून दिलं पाहिजे. 

6. चांगली, हुशार, चुणचुणीत टीम मिळणं हे एखाद्या नेत्यासाठी भाग्यच असतं. अशी टीम असेल तेव्हा नेतृत्त्व करणं अधिक सोपं होतं.