तुमचा उद्योगव्यवसाय यशस्वी होण्यासाठी या 10 महत्त्वाच्या टिप्स (#Biz_Thirsday)

जर तुम्ही सध्या शिक्षण घेत असाल आणि भविष्यात तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर किंवा जर तुम्ही ऑलरेडी स्वतःच्या व्यवसायातच काम करत असाल तरीही या महत्त्वाच्या 10 टिप्स वापरून तुम्ही तुमच्या व्यवसायात नक्कीच यशस्वी होऊ शकता.
चला तर मग, जाणून घेऊया या 10 टिप्स -

1. योग्य व्यवस्थापन आणि भविष्याचे नियोजन करा -

दिवसभराच्या कामाचे नीट व्यवस्थापन करा. त्यासाठी एका डायरीत नीट नोंदी करा, त्यात दररोजचे काम जे पूर्ण करायलाच हवे त्याविषयी लिहून ठेवा. योग्य बिझनेस प्लॅन आणि मार्केटींगचे धोरण नीट ठरवलेले असणे ही यशाची पहिली पायरी असते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक धोरण सुनिश्चित करून ठेवा, त्यामुळे तुम्ही भविष्यात तुमच्या व्यवसायवृद्धीसाठी अन्य कुशल कामगारांना हाताशी घेऊ शकता.

2. सविस्तर नोंदी ठेवण्याची शिस्त लावा -

व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर भविष्याची आखणी करा आणि स्वतःला शिस्त लावा, नोंदी घेण्याची, नोंदी ठेवण्याची. या नोंदी सविस्तर ठेवल्यास अधिक उत्तम. उदाहरणार्थ, खर्चाच्या नोंदी.. किती पैसे होते, कुठे खर्च केले, कोणाला दिले, का दिले, कधी परत मिळणार अशी सविस्तर नोंद घेण्याची सवय अतिशय महत्त्वाची आहे. यामुळे तुमच्यावर भविष्यात कोणताही ताण येणार नाही. तसंच, भविष्यात समजा काही गोंधळ, गडबड झाली तर तुम्हाला तुमच्या या सविस्तर नोंदींचा निश्चितच फायदा होईल.

3. तुमच्या स्पर्धकांवर बारकाईने लक्ष ठेवा -

तुम्ही स्वतःच्या व्यवसाय आखणीबरोबरच तुमच्या स्पर्धकांच्याही व्यवसाय करण्याच्या पद्धतींवर लक्ष ठेवले पाहिजे. त्यांनी नेमके स्वतःत व स्वतःच्या व्यवसायात केव्हा, कुठे, कधी, कसे बदल केले, त्यांची मूल्य काय, ते ग्राहकांना सेवा कशी देतात या साऱ्याकडे जेव्हा तुम्ही बारकाईने पहाल तेव्हा तुम्हाला तुमच्या व्यवसायातही सुधारणा करणे शक्य होईल. तसंच, वेळीच तुमच्या स्पर्धकावर मातही करणे शक्य होईल. त्यासाठी तुम्ही त्यांची वेबसाईट, सोशल मीडिया अकाऊंट, ग्राहकांचे रिव्ह्यू याकडे लक्ष ठेऊ शकता.

4. भविष्यातील जोखीम आणि बक्षीसे या दोन्हीचाही विचार करून ठेवा -

कोणती जोखीम पत्करून, ती यशस्वी करून दाखवल्यास काय रिवार्ड्स मिळू शकतात याचा नीट विचार व नियोजन आधीच केलेले असू देत. तसंच, जोखीम यशस्वीरित्या न पेलल्यास त्याचा तुमच्या व्यवसायावर कसा व किती प्रमाणात नकारात्मक परिणाम होऊ शकतो याचाही अभ्यास करा.

5. ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करा -

तुमचा ग्राहक कोण आहे हे नीट ओळखा. त्यांच्या गरजा काय आहेत त्या ओळखा.. व त्यानुरूप तुमच्या व्यावसायिक धोरणांची आखणी करा. ग्राहकांना सेवा पुरवण्यात अजिबात कमी पडू नका. जुन्या ग्राहकांकडून वेळोवेळी आलेल्या अभिप्रायांचा विचार करा व त्यानुरूप स्वतःच्या ध्येयधोरणांमध्ये बदल करा. ग्राहक जोडून ठेवण्यासाठी निरनिराळ्या योजना राबवा.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

6. अधिक उत्तम मार्केटींगसाठी सतत प्रयत्नशील रहा -

तुमच्या व्यवसायाकडे अधिकाधिक ग्राहक जोडण्यासाठी सातत्याने मार्केटींग करत रहा. त्यासाठी निरनिराळे पर्याय, नवनवीन तंत्रज्ञान यांचा वापर करत रहा. स्थानिक वृत्तपत्रे, मासिके, ब्रोशर्स, पँप्लेट्स याचबरोबर नव्याने पेव फुटलेल्या सोशल मीडियाचे तंत्रज्ञानही वापरायला शिका. सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्म्सचा वापर करून कशा प्रकारे मार्केटींग अधिक प्रभावी करता येईल याचा अभ्यास करा, त्यासाठी आवश्यक वाटल्यास नीट प्रशिक्षण घ्या.

7. कल्पकता वापरा -

व्यवसायात सातत्याने कल्पकतापूर्ण अशी भर घालत चला. समजा तुमचे एखादे बुटीक असेल तर त्यातील कपड्यांची कल्पक मांडणी, तिथली रचना, तिथे मिळणारे उत्तम दर्जेदार कपडे या सगळ्यामध्ये वेळोवेळी कल्पकता वापरून नावीन्य आणत रहा जेणेकरून ग्राहक तुमच्याकडे आकृष्ट होतील.

8. तुमच्या व्यवसायाप्रती पूर्ण एकाग्र रहा -

उद्योगव्यवसाय एका रात्रीत यशस्वी होत नाही, तर त्यासाठी दीर्घकालपर्यंत मेहनत व संयमशीलता दाखवावी लागते. म्हणूनच या पूर्ण कालावधीत स्वतःचा फोकस ढळू देऊ नका. व्यवसायाकडे व व्यवसायवृद्धीकडे पूर्ण लक्ष्य केंद्रीत करा. अहोरात्र, व्यवसायवृद्धीसाठी परिश्रम करत रहा. नियोजन, आखणी व अंमलबजावणी या त्रिसूत्रीने पुढे जात रहा.

9. तंत्रज्ञान शिका -

नव्या काळातील नवीन प्रगत तंत्रज्ञानाशी सातत्याने स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी सातत शिकत रहा. पूर्वी ज्या पद्धतीने तुमच्या वडीलांनी वगैरे व्यवसाय केला असेल त्याच पद्धतीने जर तुम्ही आजही व्यवसाय करत राहिलात तर तुम्हीही तेवढंच कमावाला जेवढं ते त्यांच्या काळात कमावत होते हे लक्षात ठेवा. म्हणूनच, अधिक उत्पन्न हवं असेल तर प्रगत तंत्रज्ञान अंगिकारून त्याचा उपयोग तुमच्या व्यवसायात करा.

10. सातत्य ठेवा-

वरील सर्व गोष्टींमध्ये सातत्य असणे हे फार फार महत्त्वाचे आहे, कारण, जर सातत्य नसेल तर यांपैकी एकाही गोष्टीचा उपयोग होणार नाही. म्हणूनच, व्यवसायात झपाट्याने प्रगती करायची असेल तर प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात सातत्य ठेवा.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com