योग्य करिअर निवडीसाठी या 6 टिप्स (#Career_Wednesday)

मित्रांनो,

करिअर निवडायचं कसं हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला वयाच्या विशिष्ट टप्प्यावर भेडसावत असतोच. करिअर म्हणजे काय इथपासून ते आपल्यासाठी योग्य करिअर कोणतं असेल, त्यासाठी काय करायचं, पैशांचं पाठबळ कुठून आणि कसं उभं करायचं, करिअर आणि दैनंदिन जीवन यांचा समतोल भविष्यात कसा राखता येईल .. असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. म्हणूनच योग्य करिअर निवडण्यासाठी या 7 टिप्स विचारात घ्या -

1. तुमची स्वतःची आवड ओळखा -

अनेक वेळा करिअरचा निर्णय हा त्या करिअरमधून आपल्याला किती आर्थिक उत्पन्न मिळेल हा विचार करून केला जातो, आणि इथेच गोची होते. कारण, करिअर म्हणजे केवळ पैसे देणारी गोष्ट नाही तर तुमचं जीवन त्यासह घडलं पाहिजे हा विचार अनेकजण करतच नाहीत. म्हणूनच, असं करिअर निवडा जे खरंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुरुप करता येईल व त्या कामातून तुम्हाला आर्थिक उत्पन्नही होईल. बरेचदा, केवळ आर्थिक उत्पन्नाचा विचार करून जे करिअर तुम्ही निवडता ते प्रत्यक्षात तुम्हाला जमत नाही, किंवा त्यातील अनेक गोष्टी तुम्हाला पटत नाहीत व तुम्ही तरीही मन मारून अनेक वर्ष पुढे करिअरसाठी अक्षरशः वाया घालवली याची तुम्हाला उशीरा जाणीव होते, तोवर वेळ निघून गेलेली असते.

2. करिअर निवडताना भविष्यातील संधींचा विचार करणे अनीवार्य -

कोणतंही करिअर निवडताना, तुम्हाला त्या कामातून भविष्यात कोणकोणत्या संधी मिळतील याचाही विचार केला पाहिजे, तशा दृष्टीकोनातून त्या क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे. त्या क्षेत्राचा भविष्यात कसा विकास होईल आणि किती मागणी असेल याचाही विचार करून निर्णय घ्या.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

3. स्वतःला घडवा -

ज्या क्षेत्रात आपल्याला पुढे जायचे आहे, ज्या करिअरची आपण निवड करणार आहोत, त्या क्षेत्रासाठी स्वतःत कोणकोणते बदल करावे लागतील, करायला हवेत त्याचा विचार करून स्वतःला घडवा. त्यासाठी त्या क्षेत्रातील योग्य प्रशिक्षण घ्या. भरपूर अभ्यास करा आणि मगच त्या क्षेत्रात पाऊल टाका.

4. करिअर निवडीसाठीच्या विविध परीक्षा द्या -

तुमचा कल नेमका कोणत्या विषयात वा अभ्यासात आहे याची जर तुम्हाला नेमकी कल्पना येत नसेल तर तुम्ही एखाद्या करिअर काऊन्सिलरची मदत घेऊ शकता. किंवा हल्ली अनेक अशा परीक्षाही वा चाचण्या आहेत ज्या देऊन तुम्ही तुमच्या करिअरसाठी कोणत्या क्षेत्रांची निवड करावी ते तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने ठरवता येतं. अशा चाचण्या द्या.

5. पगार आणि भत्ता यांचे स्वरूप समजून घ्या -

तुमच्या क्षेत्रात तुम्हाला भविष्यात किती पगार मिळेल व त्याशिवाय अन्य भत्ता (इन्सेन्टीव्हज् ) चे स्वरूप जाणून घ्या. याचं कारण, भविष्यात तुमच्यावर वाढणाऱ्या जबाबदाऱ्या आणि तुमची मिळकत या साऱ्याचा ताळमेळ तुम्हाला आज, आत्ताच बसवायला हवा.. यामुळे तुम्हाला भविष्याचा अंदाज आलेला असेल आणि तुम्ही आवश्यक तसे बदल तुमच्या स्वतःत व जीवनात घडवत जाल.

6. लहान लहान कामं करायला सुरूवात करा -

सुरुवातीपासूनच जर तुमचं करिअर तुम्ही सुनिश्चित केलेलं असेल तर त्या क्षेत्रातील अनुभवी व जाणकारांकडून तुम्ही लहान लहान कामं मिळवू शकता. किंवा, त्यांच्यासह एखाद्या कामामध्ये सहभागी होऊ शकता. उदा. जर तुम्हाला भविष्यात चित्रपट दिग्दर्शक व्हायचं असेल तर एखाद्या सिरीयलच्या डायरेक्टरला असिस्ट करून तुम्ही त्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवू शकता जो तुमच्या गाठीशी राहील व भविष्यात तुम्ही काम करताना तुम्हाला तो उपयोगी पडेल.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com