नेतृत्वासाठी सहानुभूती (Empathy) हा गुण महत्त्वाचा (#Friday_Funda)

संशोधनांती असे आढळून आले आहे की नेतृत्व करायचे असेल तर संवेदना, दुसऱ्यांप्रती सहानुभूती (दया नव्हे) हा सर्वात मोठा आणि सर्वाधिक महत्त्वाचा गुण आहे.

Evolutionary Biology मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, जेव्हा निर्णय क्षमतेमध्ये 'सहानुभूती' हा गुण समाविष्ट केला गेला तेव्हा त्याचा फायदा असा झाला की लोकांमधील सहकार्याची भावना वाढीस लागली, त्याचबरोबर लोकांमध्ये इतरांप्रती संवेदना आणि सहानुभूती अधिक प्रमाणात निर्माण झाली.

Qualtrics च्या अभ्यासानुसार जेव्हा नेते जास्त संवेदनशील व सहानुभूतीपूर्ण होते तेव्हा त्यांच्या अनुयायांचे मानसिक आरोग्य उत्तम होते.

याचाच अर्थ, जर कोणत्याही समूहाच्या नेत्याचे वागणे हे जेव्हा इतरांप्रती जास्त सहानुभूतीपूर्ण असते तेव्हा त्यांच्या अनुयायांमध्ये समर्पण व सहकार्याची भावना वाढीस लागते असे स्पष्टपणे म्हणता येईल.

ही सहानुभूतीची भावना मनात कशी येते..? तर याबाबतही शास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले आहे की ही भावना मनात जन्मतःच असते, किंवा उपजतच असावी लागते. याबाबत University of Virginia मध्ये एक अभ्यास करण्यात आला. जेव्हा लोकांनी आपल्या मित्रांना संकटात पाहिले, अशी संकटं जी त्यांच्या स्वतःवरही कधी ना कधी आलेली आहेत, तेव्हा त्या लोकांच्या मेंदूतील त्याच भागात काही हालचाल झाली जी स्वतःवर तेच संकट बेतले असताना त्यांच्या मेंदूत झाली होती. याचा अर्थ असा, की लोक स्वतःइतकंच स्वतःच्या मित्रांवर आणि सहकाऱ्यांवरही प्रेम करतात, त्यांना त्यांच्या मित्रांप्रती, सहकाऱ्यांप्रती तितकीच सहानुभूती वाटत असते.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

सहानुभूतीने नेतृत्त्व करणे म्हणजे काय ?

'नेतृत्त्व करणाऱ्याने सहानुभूती अंगिकारणे' म्हणजे नेमकं काय करायचं ? असा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे, तर नेता दोन प्रकारे हा गुण दर्शवू शकतो.

1. नेत्याने नेहमी, एखाद्या परिस्थितीत आपण नेमकं काय केलं असतं, आपण जर दुसऱ्याच्या ठिकाणी असतो तर काय केलं असतं, एखादी समस्या त्या जागी आपण असतो तर आपण कशी सोडवली असती याचा विचार वेळोवेळी करावा. पण, यातही, नेते केवळ एवढंच करून यशस्वी होत नाहीत, तर त्याचबरोबर जेव्हा ते त्याबाबत आपल्या अनुयायांशी संवाद साधतात, त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या समस्या मनापासून जाणून घेतात तेव्हाच ते खरे यशस्वी होतात.

2. नेत्यांना स्वतःला मानसिक आरोग्य तज्ज्ञ असण्याची काहीच गरज नाही -

सहानुभूतीने वागण्यासाठी किंवा इतरांना तशी सौहार्दपूर्ण वागणूक देण्यासाठी स्वतः नेत्यांना मानसिक आरोग्य तज्ज्ञ वगैरे असण्याची काहीच गरज नाही. नेत्यांनी केवळ आपल्या अनुयायांशी नीट संवाद साधला पाहिजे व त्यांच्या अडचणी मनापासून समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांची मदत केली पाहिजे.. यातच त्यांनी निम्म्याहून अधिक बाजी मारलेली असते.

एकूणात काय, तर नेतृत्व गुण जर अंगी असेल तर सहानुभूती या गुणाचीही त्याला जोड देणे अत्यावश्यक आहे. कारण, जेव्हा नेतृत्व करायला जाल, तेव्हा तुम्हाला सहानुभूतीने माणसं जोडता येणं अत्यावश्यक आहे. यामुळे तुमचे अनुयायी तुमच्याप्रती विश्वास ठेवतील व त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या नेतृत्वासाठी होईल.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com