कंपनीमध्ये विश्वासार्हतेचे वातावरण कसे तयार करावे ? ( भाग 3 ) (#biz_thirsday)

एकंदरीतच मॅनेजरने आपल्या वर्तणुकीत कशाप्रकारे व कोणकोणते बदल केल्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मनात विश्वासार्हता निर्माण होईल याबाबत आपण गेल्या दोन भागांमध्ये समजून घेतले. आजच्या या तिसऱ्या भागात आपण समजून घेऊया की याचा समग्र असा नेमका काय परिणाम कर्मचाऱ्यांच्या मनावर व वर्तनावर होतो.

यासाठी एका टीमने एक संशोधन केले. त्यांनी युएसमधील 1095 कामगारांचा फेब्रुवारी 2016 मध्ये सर्वे केला. हा सर्वे एका फर्मकडून करून घेण्यात आला होता. यामध्ये कामगारांचे नॅशनली रिप्रेझेंटेटीव्ह सँपल वापरण्यात आले. यामध्ये खालील निष्कर्ष आढळून आले -

सर्व कंपन्यांमधील या कामगारांची सरासरी विश्वासार्हता 70 टक्के आढळून आली.

सर्वोत्कृष्टता निवडणे आणि माहिती शेअर करणे या दोन मुद्द्यांमध्ये या सर्वच कंपन्यांनी सर्वात कमी टक्के प्राप्त केले होते जे अनुक्रमे 67 आणि 68 टक्के इतके होते.

यावरून असे अनुमान निघाले की यूएसमधील कंपन्यांना जर विश्वासार्हतेचे वातावरण निर्माण करायचे असेल तर त्यांनी या दोन मुद्द्यांना विचारात घेऊन त्यावर काम केले पाहिजे.

विश्वासार्हतेबाबत वैयक्तिक मुद्द्यांनी जेव्हा प्रत्येक कामागाराचा प्रतिसाद तपासला गेला तेव्हा तो फारच चांगला असल्याचे आढळून आले. ज्या कंपन्यांमध्ये विश्वासार्ह वातावरण जोपासण्यात आलेले होते तेथील कर्मचाऱ्यांमध्ये अन्य कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 106 टक्के अधिक ऊर्जा आढळून आली आणि 76 टक्के अधिक कामसूपणा दिसून आला. तसंच, त्यांच्यात 50 टक्के अधिक उत्पादन क्षमता असल्याचे आढळून आले. विश्वासार्हतेमुळे कर्मचाऱ्यांच्या मनात अधिक निष्ठा जोपासली गेल्याचेही लक्षात आले. तसेच जेथे विश्वासार्ह वातावरण आहे तेथील कर्मचारी पुढल्या वर्षीही त्याच कंपनीत आनंदाने काम करण्यास राजी असल्याचे तब्बल 50 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले.. तसंच तब्बल 88 टक्के कर्मचारी म्हणाले की ते काम करत असलेली कंपनी खूपच चांगली असल्याने ते निश्चितच त्याबाबत आपल्या कुटुंबाला व मित्रमैत्रिणींना सांगतील व येथे काम करण्यास नक्कीच त्यांना प्रोत्साहन देतील.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

जिथे विश्वासार्हतेचे वातावरण जपलेले असते अशा कंपनीतील कर्मचाऱी इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 60 टक्के अधिक त्यांचे काम एन्जॉय करताना दिसतात. 70 टक्के कर्मचारी कंपनीच्या उद्दीष्टांशी सहमत असतात आणि ते आपल्या इतर कर्मचाऱ्यांशी तब्बल 66 टक्के अधिक घट्ट जोडले गेलेले असतात.

एकंदरीतच अशा कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची एकमेकांशी वर्तणुक ही अधिक चांगली असते. त्यांच्यात इतर कंपन्या जेथे विश्वासार्हतेचे वातावरण नसते, त्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत तब्बल 11 टक्के अधिक सहवेदना आपल्या सहकाऱ्यांप्रती असल्याचे दिसते. त्याचबरोबर 41 टक्के कमी वेळी त्यांची चिडचिड होताना दिसते.

सर्वेक्षणात सर्वात रंजक निष्कर्ष असा दिसून आला की जेथील वातावरण विश्वासार्ह होते त्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अधिक चांगला पगार देत होत्या. हे कसं शक्य झालं..? याचं एकमेव उत्तर म्हणजे, तेथील कर्मचारी हे अत्यंत निष्ठावान व उत्पादनक्षम होते म्हणूनच .. !

हर्मन मिलरचे माजी सीईओ मॅक्स दी प्री एकदा म्हणाले होते, टीमलीडरची किंवा नेत्याची पहिली जबाबदारी असते, ती म्हणजे नेहमी वास्तव कथन करणे, वास्तवाची कल्पना देणे.. आणि शेवटची महत्त्वाची जबाबदारी असते ती म्हणजे आभार मानणे.. आणि या दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांदरम्यान त्या नेत्यानेही कामगार म्हणूनच वर्तन ठेवायला पाहिजे.

मागील तिन्ही लेखांचा सारांश अर्थातच असाच निघतो, की कंपन्यांमध्ये विश्वासार्हतेचे वातावरण जोपासले तरच कंपनीची भरभराट होऊ शकते.

निश्चीत ध्येय ठरवणे, कर्मचाऱ्यांना त्या ध्येयाचे नीट आकलन होण्यासाठी व त्यांनी ते साध्य करण्यासाठी त्यांना जे जे आवश्यक आहे ते ते पुरवणे आणि त्यांच्या रस्त्यातून बाजूला होणे असे केल्यानेच तुम्ही कंपनीत विश्वासार्हतेचे वातावरण तयार करू शकता हे लक्षात घ्यायला हवे.

याचा अर्थ, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहज होणे किंवा त्यांच्याकडून कमी अपेक्षा करणे असा अर्थ होत नाही तर त्याउलट, कर्मचाऱ्यांवर पूर्ण जबाबदारी सोपवणे आणि त्यांना अकारणच जाचक नियम, अटींमध्ये न अडकवणे हा आहे. विश्वासार्हतेचे वातावरण जेथे जेथे आहे तेथील मॅनेजमेंट ही आपल्या कर्मचाऱ्यांना जबाबदार नागरिकांप्रमाणेच वागवतात जे फार महत्त्वाचं आहे.. !

या लेखाचा भाग 1ला वाचण्यासाठी येथे क्लिक करा - https://learn.netbhet.com/blog/Build-Trust-Culture-at-your-workplace-buz-thirsday

या लेखाचा 2 रा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा - https://learn.netbhet.com/blog/To-built-trust-at-the-workplace-remember-these-keypoints-biz-thirsday

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com