वर्क फ्रॉम होम कसं मॅनेज करायचं ? (#Career_Wednesday)

कोरोनाच्या या कठीण काळात वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे, आणि घरातूनच ऑफीसचं काम करताना अनेकांना फारच तारेवरची कसरत करावी लागतेय. महिलावर्गाची तर या काळात कसोटीच आहे. कारण, त्या घरात असल्याने मुलं, कुटुंबीय या सगळ्यांची काळजी घेण्याची जबाबदारीही त्यांच्याचवर आली शिवाय ऑफीसचंही काम वेळेवर पूर्ण व्हावं यासाठी अक्षरशः तारांबळ उडाली. पण, करिअर तर महत्त्वाचंच.. मग अशावेळी काहींनी ही कसरत मॅनेज केली पण काहींचं वर्क फ्रॉम होमचं बस्तान काही केल्या नीट बसेना, पुरुषांनाही घरातील गोंधळाची, आल्यागेल्याची सवय करत काम करावं लागलं. तुम्हीही जर अशापैकी एक असाल आणि वर्क फ्रॉम होमची कसरत करताना तुमच्याही नाकी नऊ आले असतील तर हा लेख जरूर वाचा, कारण भविष्यात कदाचित आपलं काम असंच सुरू ठेवावं लागू शकेल -

1. वेळापत्रकानुसार काम करा -

जरी हे दररोज करणं फार कठीण असलं तरीही शक्यतो वेळापत्रक बनवा आणि त्यानुसारच काम करा. ऑफीसच्या कामाची वेळ आणि घरातील कुटुंबीयांना देण्यासाठी स्वतंत्र वेळ ठेवा. अगदी तुम्ही ऑफीसमध्ये जसं काम करता त्याप्रमाणेच घरातून काम करा. जेवणाची, मधल्या चहाची वेळ ठरवून ठेवा. फक्त तेवढ्याचकरता मध्येमध्ये उठा. बाकी ज्याप्रमाणे ऑफीसमध्ये असताना घड्याळाच्या काट्यावर काम करता, त्याप्रमाणेच घरातूनही काम करा.

2. काम करताना शक्यतो फॉर्मल किंवा सेमीफॉर्मल पेहराव ठेवा -

वर्क फ्रॉम होम करताना तुम्हाला ऑफीसचं कोणीच पहायला येणार नसतं हे जरी खरं असलं तरीही तुम्ही जोवर ऑफीसचं काम ऑफीसला आल्यासारखं करणार नाही तोवर तुम्हाला कामाचा उत्साह येणार नाही हे देखील सत्यच आहे. त्यामुळे शक्यतो वर्क फ्रॉम होम करताना आपल्या पेहरावावर लक्ष्य ठेवा. अगदी घरातले कपडे घालून काम करायला बसू नका. त्यामुळे तुमच्या कामात आळसच अधिक भरेल.

शिवाय यामुळे तुमच्या मेंदूला वर्कमोड मध्ये आल्यासारखं वाटेल आणि मेंदू तुम्हाला कामात पूर्ण सहाय्य करायला लागेल. विश्वास नाही बसत.. मग करून पहा एक दिवस...

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

3. आपल्या कुटुंबियांशी संवाद साधा तसंच बॉस व सहकाऱ्यांशीही संवाद साधा -

तुमचं कामाचं शेड्यूल नेमकं कसं असणार आहे, दिवसभरात तुम्ही किती वेळ ऑफीसचं काम करणार आहात, घरातील काय व कोणकोणत्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वीकारणार आहात.. कोणत्या तुम्हाला जमणार नाही, किंवा वेळेचं नियोजन कशाप्रकारे केलं तर तुम्ही घराचा आणि ऑफीसच्या कामाचा, जबाबदाऱ्यांचा तोल सांभाळू शकाल या सगळ्याबाबत स्पष्टता ठेवा व हे सगळं तुमच्या कुटुंबियांशी आणि ऑफीसमधील तुमचे रिपोर्टींग बॉस, सहकारी यांच्याशी नीट कम्युनिकेट करा.

4. विश्वासार्हता कायम ठेवा -

कामात चालढकल अजिबात करू नका, तसंच तुमचं काम नेटकेपणाने दररोज करा. त्यासाठी पुरेसा वेळ द्या. मन लावून काम करा. तसंच, सांसारिक जबाबदाऱ्याही नीट पार पाडा, गल्लत करू नका. कामाचा ताण मनावर वा शरीरावर येऊ नये यासाठी नीट नियोजन करून काम करण्यावर भर द्या. यामुळे तुम्हाला निश्चितच आनंद मिळेल कारण, तुमची विश्वासार्हता टिकून राहील व तुमच्याप्रती तुमच्या भवतालच्या सर्वांचा आदर निश्चितच द्विगुणित होईल.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com