तुमच्या कंपनीत हुशार कर्मचारी नियुक्त करण्यासाठी आधी तुमचे वेगळेपण बाजारपेठेत दिसू द्या. (#Biz_Thirsday)

एखादा उद्योगव्यवसाय सुरू करण्यापासून तो यशस्वी करेपर्यंत अनेक पायऱ्या, अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडावे लागतात. व्यवसायानुरूप इन्फ्रास्टक्चर, कल्पना, योजना, सगळं सगळं नीट केलं तरीही तुमच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी आवश्यकता असते ती तुमच्या हुशार कर्मचाऱ्यांची... आणि जर तुम्हाला तुमच्या कंपनीत प्रचंड बुद्धिमान, हुशार कर्मचारी नियुक्त करायचे असतील तर त्यांना मुळात तुमच्या कंपनीकडे तुम्हाला आकर्षित करावे लागेल आणि त्यासाठी बाजारपेठेतील अन्य कंपन्यांच्या तुलनेत तुमची कंपनी कशी आणि किती उजवी आहे हे छोट्या छोट्या गोष्टींमधून दाखवून द्यावे लागेल. चला तर मग आज जाणून घेऊया अशा गोष्टी, ज्यामुळे हुशार कर्मचारी होतील तुमच्या कंपनीकडे आकृष्ट आणि स्वतःच येतील तुमच्या कंपनीत काम करण्यासाठी !

1. काम करण्यासाठी उत्कृष्ट असे वातावरण तुमच्या कंपनीत तयार करा -

आपल्याला एखाद्या स्वच्छ, सुंदर वातावरणात काम करायला मिळावे अशी अपेक्षा प्रत्येकच कर्मचाऱ्याची असते. हुशार, बुद्धिमान आणि आपल्या कामात तरबेज असलेले कर्मचारी नेहमीच अशा कंपनीत काम करणे अधिक पसंत करतात जिथले वातावरण सुंदर असेल. फ्रेशर्स असतील तर त्यांना तर अशा सुंदर ऑफीसमध्ये काम करण्याचं स्वप्नच असतं. असं सुंदर ऑफीस असेल तर तेथील कर्मचाऱ्यांमध्ये आपोआपच उत्साहाचं, आनंदाचं वातावरण निर्माण होतं. अधिक जोमाने काम करण्यासाठी ऑफीसचं वातावरण नेहमीच कर्मचाऱ्यांच्या मनावर एक परिणाम साधत असतं, म्हणूनच हा परिणाम सकारात्मक आणि उत्साहवर्धक असेल अशा पद्धतीचं वातावरण तुमच्या ऑफीसमध्ये निर्माण करा.

2. तुमचा ब्रँड डेव्हलप करा -

ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कंपनीत कामासाठी हुशार कर्मचारी नियुक्त करू इच्छित असता आणि बाजारपेठेतील तशा कर्मचाऱ्यांकडे तुम्ही लक्ष ठेऊन असता त्याचप्रमाणे, कर्मचारीही बाजारपेठेतील चांगल्या ब्रँड्सचा सतत शोध घेत असतात. म्हणूनच, तुमच्या कंपनीचा ब्रँड डेव्हलप करा. तुमचा ब्रँड हेच तुमचं पहिलं इम्प्रेशन आहे हे लक्षात घ्या. तुमची कंपनी किती उत्तम आहे, इथे काम करणं हे प्रत्येक कर्मचाऱ्याकरिता किती आनंदाचा भाग असू शकतं हे वेळोवेळी लोकांसमोर मांडा. तुमच्या ब्रँडच्या जाहिरातीतून तुमची मूल्य, तुमची विचारधारणा लोकांसमोर येऊ देत. यामुळे आपोआपच पोटेन्शिअल कर्मचारी तुमच्या कंपनीकडे आकृष्ट होतील.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

3. कर्मचारी नियुक्ती पद्धती ही सोपीसुलभ असण्यावर भर द्या -

तुमच्या कंपनीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी जी पद्धत असेल ती किमान सोपी सुलभ असावी याकडे लक्ष्य द्या. याचं कारण म्हणजे, जेव्हा हुशार कर्मचारी तुमच्या कंपनीत काम मागण्यासाठी येतील तेव्हा जर ही पद्धत किचकट, क्लिष्ट असेल तर कदाचित ते तुमच्यापेक्षा अन्य दुसऱ्या स्पर्धक कंपनीकडे काम करणे अधिक श्रेयस्कर ठरवून निघून जातील. याचं कारण, वेळ आणि श्रम यांचा विचार हुशार कर्मचारी निश्चितच अधिक एफीशिअन्टली करतील, व जर तुमच्या कंपनीची हायरिंग प्रोसेस ही जास्त वेळखाऊ वा किचकट असेल तर होऊ शकतं की कर्मचारी त्यामुळेच तुमच्या कंपनीकडे फिरकणारही नाहीत .. मग तुमचा ब्रँड कितीही उत्तम असू देत ...!

4. सोशल मीडियाचा वापर -

तुमच्या कंपनीत वेळोवेळी ज्या जागा निघतील त्यांवर नियुक्तीच्या जाहीराती सोशल मीडियावर करणे केव्हाही उत्तम, कारण हल्लीच्या काळात नोकरी शोधण्यासाठी प्रत्येक जण सोशल मीडियाचाच वापर करू लागला आहे. तुमची वेबसाईट असेल तर त्यावर करिअर नावाचं बटन डेव्हलप करा,त्याअंतर्गत वेळोवेळी तुमच्याकडील जॉब ओपनिंग्सची माहित सविस्तर पोस्ट करत चला. याचा निश्चितच फायदा होईल. त्याचबरोबर अनेक वेबसाईट्सवरही तुम्ही तुमच्याकडील व्हेकन्सीच्या जाहिराती देऊ शकता.

4. योग्य मोबदला -

हुशार आणि एफीशिअन्ट कर्मचारी जर तुमच्या ब्रँडकडे आकृष्ट होत असतील आणि तुमच्या कंपनीबरोबर काम करण्यास उत्सुक असतील तर त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला, एम्प्लॉयी बेनिफिट्स आणि त्यांची काळजी घेईल अशा अन्य सुविधा तुमच्या ब्रँडकडून मिळायला हव्यात, यामुळे तुमचे कर्मचारी तुमच्या कंपनीशी मनापासून जोडले जातील व ते तुमच्या कंपनीत अधिक उत्तम प्रकारे व समाधानाने काम करतील. जी कंपनी कर्मचाऱ्यांची काळजी घेते तीच कंपनी अधिक प्रगती करू शकते हे लक्षात ठेवा.

मित्रांनो, जर तुमचा व्यवसाय यशस्वी व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर अशाप्रकारे मॅनपावर इन्व्हेस्टमेंट योग्य प्रकारे केलीत तर निश्चितच तुम्ही यश मिळवू शकाल. कारण, कोणताही बिझनेस तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा त्या बिझनेसचे पहिले ग्राहक म्हणजे तिथले कर्मचारी त्या कंपनीत समाधानी असतात !

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com