'लॅक्मे' या पहिल्या स्वदेशी सौंदर्यप्रसाधनांच्या ब्रँडची रंजक कथा

'गरज ही शोधाची जननी आहे' असं म्हटलं जातं, आणि उद्योगव्यवसायांच्या बाबतीत तर ही म्हण नेहमीच सार्थ ठरते. जेव्हा माणसाला गरज निर्माण होते, एखाद्या वस्तूची मागणी बाजारपेठेत वाढते तेव्हा त्या वस्तू वा सेवांचा पुरवठा करणाऱ्या उद्योगव्यवसायांची निर्मिती होते.
अशीच मोठी रंजक कथा आहे, लॅक्मे या पहिल्या स्वदेशी सौंदर्यप्रसाधनांच्या ब्रँडची ..
चला जाणून घेऊया ...

सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत लॅक्मे हा पहिला स्वदेशी ब्रँड 1952 पासून अस्तित्वात आला. सौंदर्य आणि श्रीमंतीची देवी लक्ष्मी मातेच्या नावावरून या ब्रँडचे नामकरण झाले. सुरुवातीपासूनच हा ब्रँड भारतात अत्यंत लोकप्रिय झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपली अर्थव्यवस्था नाजूक होती तेव्हा तत्कालिन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालिन बडे उद्योजक जेआरडी टाटांना ही बाब लक्षात आणून दिली की भारतातील महिला सौंदर्यप्रसाधनांकरिता परदेशी ब्रँड्सवरच अवलंबून आहेत. त्यामुळे जेआरडींनी भारतातच सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा अशी सूचनाही पं.नेहरूंनी त्यांना केली. त्यानंतर टाटा ऑईल्सची सबसिडरी म्हणून लॅक्मेचा जन्म झाला. आता सौंदर्यप्रसाधनांच्या निमित्ताने देशाबाहेर जाणारा आपला पैसा देशातच खेळू लागला. नवल टाटांची दुसरी पत्नी सायमन टाटा हिच्याकडे या नव्या लॅक्मे कंपनीला यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. 1961 मध्ये त्यांनी कंपनी जॉईन केली आणि 1982 मध्ये त्या कंपनीच्या अध्यक्ष बनल्या. 

त्याकाळी भारतात मेकअप करणाऱ्या स्त्रियांबद्दल प्रचंड गैरसमज होते. अशा मेकअप करणाऱ्या बायकांच्या चारित्र्याशीच थेट मेकअपचा संबंध जोडला जायचा. मेकअप करणाऱ्या बायका या प्रचंड उथळ असतात असा पक्का विश्वास तत्कालिन जनमानसात रूजला होता. अशा काळात सायमन यांनी स्वतःच्या ग्लॅमरस रहाणीमानातून हा समज मोडून काढला, पण हे सगळं फार कठीण होतं. 

उदारिकरणानंतर भारतीय बाजारपेठेत जेव्हा परदेशी कंपन्या आल्या तेव्हा पुन्हा एकदा लॅक्मेला प्रचंड स्पर्धा निर्माण झाली पण लॅक्मेने वेळीच आपल्या उत्पादनांच्या किंमतीत विचारपूर्वक बदल केला आणि मोठ्या प्रमाणावर भारतीय महिलांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले. 

लॅक्मेकडे तब्बल 300 हून अधिक सौंदर्यप्रसाधनांची रेंज आहे. अलीकडच्या काळात तर तब्बल 70 हून अधिक देशात लॅक्मेची उत्पादने निर्यात होतात. इतकेच नव्हे तर कोरोना पँडॅमिकच्या काळानंतरही सौंदर्यप्रसाधनांच्या विश्वासार्ह ब्रँड्समध्ये लॅक्मे कंपनी 5 व्या क्रमांकावर आहे. 

1996 मध्ये टाटा ग्रुपने लॅक्मे कंपनी हिंदुस्थान युनिलीव्हरला तब्बल 200 कोटी रुपयांना विकली. 2017-18 मध्ये लॅक्मेने 1000 कोटींच्या महसुलाचा टप्पा पार केला.