मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्स यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी

बिल गेट्स सांगतात, मी एवढ्या लहान वयात माझ्या आवडीच्या कामाप्रती स्वतःला झोकून दिलं होतं की तेव्हा माझ्याकडे पाहून कोणाचा विश्वासच बसत नसे की मला काही येतं, परंतु प्रत्यक्षात मला भेटल्यानंतर आणि माझ्याशी बोलल्यानंतर त्यांना जो आश्चर्याचा धक्का बसत असे तोच माझ्यासाठी सर्वात सुखद अनुभव ठरत असे. "जेव्हा कोणीच आपल्यावर विश्वास ठेवत नाही, तेव्हा तीच गोष्ट यशस्वीरित्या करून दाखवण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही !"
मित्रांनो, आज जाणून घेऊया, मायक्रोसॉफ्टचे जनक जगद्विख्यात उद्योजक बिल गेट्स यांच्याकडून शिकण्यासारख्या अशाच आणखी काही गोष्टी.. आपल्याला यापैकी कोणती शिकवण आवडली, कमेंट करून जरूर सांगा.

1. बुद्धिमत्तेला वय नसतं - 

बिल गेट्स जेव्हा कंपनी सुरू करणार होते तेव्हा ते अवघे 19 वर्षांचे होते. त्यांना पाहून कोणालाच वाटायचं नाही की त्यांना काही येत असेल. पण जेव्हा ते आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवीत तेव्हा लोक आश्चर्यचकीत होत आणि बिल यांचा उत्साह आणि आत्मविश्वास द्विगुणित होत असे. 

2. उत्साह अमर्याद हवा - 

कंपनी सुरू करायची तर प्रचंड ऊर्जा लागते. बिल गेट्सच्या सुरुवातीच्या दिवसात ते जे सॉफ्टवेअर विकत होते, ते त्यांनी बनवलंही नव्हतं, पण जेव्हा ते सौदा करायला गेले तेव्हा त्यांना एक महिन्याचा अवधी मिळाला आणि त्या महिन्यात अहोरात्र मेहनत करून त्यांनी मायक्रोसॉफ्ट बनवलं. 

3. Think week

बिल गेट्स प्रचंड व्यस्त असतात, ते दिवसरात्र काम करतात. दिवसा मीटींग्स आणि रात्री मुलं झोपल्यावर ईमेल्स अशा पद्धतीने त्यांचे काम चालते. ते जगभर त्यांच्या ग्राहकांसाठी फिरत असतात. मात्र वर्षभरातून केवळ दोन आठवडे ते वाचन करण्यासाठी आणि चिंतनासाठी सुट्टी काढतात, याला ते थिंकवीक असं म्हणतात. 

4. द्रष्टेपण अंगी बाणा - 

मायक्रोसॉफ्टने जेव्हा विंडोज सॉफ्टवेअर बनवलं, तेव्हा त्यांना आधीच माहिती होतं की भविष्यात वर्ड, पॉवरपॉईंट आणि एक्सेल लोकांच्या जीवनात किती प्रभाव पाडणार आहे, आणि तसच झालं. म्हणूनच आपल्या कामाचं भविष्य ओळखायला शिका, द्रष्टेपणा अंगी बाणा.

5. आवश्यक तेव्हा सल्ला मागा - 

तुम्हाला ओळखणारे, तुमच्याशी जोडले गेलेले आणि तुम्ही ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेऊ शकता अशा माणसांकडून जेव्हा गरज भासेल तेव्हा सल्ला घ्या, सल्ला मागायला बिचकू नका. 

6. काम वेळेत पूर्ण करा - 

शाळेत असताना बिल गेट्सना एक फार वाईट सवय होती. त्यांना नेहमी असं दाखवायला आवडे की ते काहीच करत नाहीत, आणि शेवटच्या क्षणी ते कामाला लागत. ही सवय जेव्हा त्यांनी कंपनी सुरू केली तेव्हा फार घातक ठरू लागली. त्यानंतर त्यांनी स्वतःला बदललं आणि आपली कामं वेळेत पूर्ण करायला ते शिकले.