जगद्विख्यात दिव्यांग लेखिका हेलन केलर यांच्याकडून शिकण्याजोग्या काही गोष्टी

जगद्विख्यात दिव्यांग लेखिका हेलन केलर यांना बालपणी झालेल्या आजारामुळे त्यांची दृष्टी गेली तसेच त्यांना कर्णबधीरत्वही आले. जीवनाने दिलेल्या अशा भयंकर आव्हानावर मात करत ही जिद्दी मुलगी थेट जीवनाला भिडली आणि तिने अत्यंत कष्ट सोसत आपले शिक्षण पूर्ण केले. हेलन यांची शिक्षिका आणि पुढे जी खरंतर त्यांची जन्मभराची सोबतीण झाली, अशा अॅनी सॅलेव्हन यांनी स्पर्शाच्या माध्यमातून हेलन यांना शिक्षण दिलेच तसेच जीवनाची लढाई लढण्यासाठी सामर्थ्यशालीही बनवले. त्यांच्या मदतीनेच हेलन यांनी आपल्यातील उणीवांवर मात करत आपले जीवन फुलवले. 

जाणून घेऊया हेलन केलर यांच्याकडून शिकण्याजोग्या काही गोष्टी - 

1. स्कार्लेट फीव्हर या आजारात हेलन यांना अंधत्त्व आणि बधिरत्त्वही आले. त्यामुळे त्यांचे जीवन अंधारून गेले. त्यांच्या जीवनाविषयी आता अन्य कोणालाच आशा उरली नव्हती, मात्र त्यांनी जिद्दीने आपले जीवन फुलवले आणि असाध्य ते साध्य करून दाखवले.

2. अॅन या आपल्या शिक्षिकेकडून स्पर्शाच्या आणि अनुभवांच्या माध्यमातून जिद्दीने हेलन यांनी शिक्षण घेतले. नुसतं डोळ्यांनी बघून शिकता येतंच असं नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून घेतलेले शिक्षण अधिक प्रभावी ठरते हेच यावरून कळते. 

3. हेलन यांचं जीवन हाच मुळी एक प्रचंड खडतर प्रवास होता, पण त्यांच्या मते या जगात सुरक्षितता हेच मुळी एक मिथक आहे. जीवनात संकटं येतातच आणि कधीकधी ती कल्पनेपलीकडचीही असू शकतात, पण त्याला घाबरून जगणं थांबवू नका. 

4. दृष्टी नसूनही हेलन यांच्याकडे व्हिजन होती. त्यांना आपलं ठरलेलं उद्दीष्ट कितीही कठीण असलं तरीही साध्य करायचंच होतं, आणि त्यांनी ते केलंच. गोष्टी पहाता येत असूनही तुमच्याजवळ दृष्टी (व्हिजन) नसणं यासारखं दुसरे दुर्दैव नाही असं त्या म्हणत. 

5. जीवनाने जेवढी क्रूरता आणि असहिष्णूता या सुंदर तरूणीवर केली त्याउलट या सुंदर तरूणीने मात्र जीवनाला भरभरून प्रेम दिले, ते तिच्या सकारात्मकतेने. हेलन केलर म्हणत, तुमचं लक्ष्य कायम सू्र्यावरच जर ठेवलंत तर तुम्हाला कधीही सावलीची भीती नसेल. 

6. तुमचं जीवन हे तुमच्या हातात आहे असं हेलन नेहमी म्हणत. त्या सांगत, जीवनात तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून रहाता, पण तुम्हाला जे हवंय ते बाहेर नाहीये तर ते तुमच्या आतच दडलेलं आहे हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे.