दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आणि अत्यंत प्रभावशाली नेते नेल्सन मंडेला यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी

दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णिय अध्यक्ष, ज्यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारानेही गौरविले गेले असे अत्यंत प्रभावशाली नेते नेल्सन मंडेला यांनी संपूर्ण मानवजातीसाठी अनेक बहुमोल असे ठोस सामाजिक बदल घडवले.
त्यांनी दिलेल्या शिकवणुकी आज जाणून घेऊयात ..

1. नेल्सन मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेत समानतेसाठी लढा दिला. त्यांचं एक प्रसिद्ध इंग्रजी वाक्य आहे, वुई डोन्ट केअर व्हेदर द कॅट इझ ब्लॅक ऑर व्हाईट, अन्टील शी इझ एबल टू कॅच द माऊस ...याचा अर्थ, माणसाच्या कौशल्यावरून त्याची ओळख ठरत असते, त्याच्या वर्णावरून नाही.

2. लोकशाहीत प्रत्येक माणसाला काही मूलभूत हक्क मिळालेले आहेत आणि त्याला ते वापरण्याचं स्वातंत्र्यही मिळालेलं आहे. यापैकीच एक म्हणजे मतदानाचा हक्क, जो प्रत्येक माणसाला मिळालेला आहे, जरी तो शिकलेला असो वा अशिक्षित असो. शिक्षणामुळे मत कोणाला द्यायचं याबाबतचा विवेक मिळू शकतो पण शिक्षण नाही म्हणून कोणाचाही मतदानाचा हक्क हिरावून घेता येणार नाही. 

3. नेल्सन मंडेला यांच्या जीवनाचे उद्दीष्ट स्पष्ट होते. वर्णभेद आणि मानवी हक्कांसाठी लढा देण्यासाठी ते उभे ठाकले होते. त्यांना माहिती होतं की हा मार्ग खूप कठीण असणार आहे पण तरीही ते त्यांच्या मार्गावर अखंड चालत राहिले, त्यांनी कधीच हार मानली नाही.

4. अपरिमीत अन्याय आणि छळ सोसूनही नेल्सन मंडेला हे स्वतः एक शांतताप्रिय आणि क्षमाशील नेते म्हणून लोकप्रिय झाले. याचे कारण त्यांच्या विचारपद्धतीत दडलेले होते. त्यांनी जगाला असा संदेश दिला की जर तुम्ही क्षमा करायला शिकला नाहीत तर तुम्ही मनातून केवळ कायम धुमसत रहाल. म्हणून क्षमा करायला शिका. 

5. रग्बी हा खेळ दक्षिण आफ्रिकेत खूप प्रसिद्ध होता. गौरवर्णीय लोकांची मक्तेदारी असल्याने या खेळाच्या विश्वचषकावेळी द.आफ्रीकेतील श्वेतवर्णियांनी विरोधी संघाला समर्थन देत निषेध नोंदवला. मात्र त्यावेळी मंडेलांनी विजयी संघाची जर्सी घालून विजयी संघाचे समर्थन केले. राष्ट्रप्रेम वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले होते. 

वैयक्तिक स्तरावर (योग्य असल्यास) मीठी मारणे, एकत्र जेवणे, एकत्र मैदानी खेळ खेळणे, याने राष्ट्रप्रेम वाढीस लागते असे मंडेलांच्या या कृतीतून जगाला दिसले. 

6. रिव्होनिया खटल्यात मंडेला यांना फाशीची शिक्षा होण्याचा धोका होता, त्यावेळी त्यांनी आपल्या कॉम्रेड्सना विनंती करून त्यांचे मन वळवले आणि ते अपील करणार नाहीत याची खातरजमा केली.त्यांनी आपल्या समर्थकांना प्रतिष्ठा व अभिमान बाळगण्याचे आणि स्थिर रहाण्याचे आवाहन केले. 

हळुवारपणे पावले टाका, संथपणे श्वास घ्या आणि खळखळून हसा हा जीवनमंत्र त्यांनी शेवटी दिला. 

7. जीवनात आलेल्या अनुभवांनी मंडेला यांना एक कटू आणि विखारी व्यक्ती बनवणे सहज शक्य होते, पण तसे झाले नाही. ते म्हणत तुम्हाला तुमच्या भूतकाळाला कधीतरी मर्यादा आखाव्याच लागतील. तुमच्या कठीण बालपणाची, तुमच्या लग्नाची किंवा तुमच्या बॉसची गोष्ट तुम्ही कितीवेळा जगाला सांगत रहाणार ? तुमच्या मित्रांसमोर दयेची भीक मागून तुम्ही त्यांना जिंकू शकत नाही. त्याचा एकच इलाज म्हणजे भूतकाळाने दिलेल्या जखमा भरून तो काळ कायमचा मागे सारा.