भारतीय क्रिकेटसंघाचे माजी कर्णधार विराट कोहली यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार विराट कोहली, ज्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, की त्यांना त्यांचा परफॉर्मन्स उत्तम नसल्याकारणाने तब्बल एक वर्षासाठी संघातून बाहेर काढण्यात आले होते, आणि हेच वर्ष त्यांच्यासाठी जीवन बदलवणारे ठरले.. पण कसे? चला जाणून घेऊया ...

1. स्वतःला आव्हान द्या आणि सुधारणा करत रहा - 

2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यादरम्यान प्रतिस्पर्ध्यांना विराटचा वीकनेस ओळखता आला. विराट आपल्या शरीरापासून लांब अंतरावर बॅट धरून खेळतो हे लक्षात येताच ते त्याला मुद्दाम वाईड बॉल्स टाकू लागले. या घटनेनंतर प्रचंड मेहनत करून विराटने आपला वीकनेस स्ट्रेंग्थमध्ये बदलला आणि पुढल्या अनेक मॅचेसमध्ये वाईड बॉलवर षट्कार ठोकू लागला. 

2. पुन्हा उसळी मारून वर या - 

2015 च्या सामन्यात यशाचे प्रबळ दावेदार असूनही भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून हारला, तेव्हा अनेक तज्ज्ञांच्या मते विराट कोहलीचा परफॉर्मन्स अनेक कारणांनी खराब असल्याचे तेव्हा बोलले गेले. तरीही विराटने हार मानली नाही, तर तो उसळून वर आला आणि त्याने आपले स्थान निर्माण केले. 

3. बांधिलकी आणि जबाबदारी - 

रणजी सामना खेळत असताना विराट अवघ्या 18 वर्षांचा होता. तेव्हा त्याचे वडील वारल्याची धक्कादायक बातमी त्याला कळली. पण त्याने खेळत असलेला सामना अर्धवट सोडला नाही, कारण तेव्हा त्या क्षणी संघाला त्याची गरज होती. विराटने तो सामना मनोधैर्य राखून पूर्ण खेळला आणि मग तो वडीलांच्या अंत्यविधीला गेला. 

4. सातत्य - 

तीन वेगवेगळ्या आयपीएल्समध्ये तब्बल 500 हून अधिक रन्स दरवेळी काढणारा विराट हा एकमेव कप्तान आहे. त्याच्या या यशाचं श्रेय त्याच्या सातत्यपूर्ण सरावाला आणि खेळालाच द्यायला हवं. 

5. मेहनतीला पर्याय नाही -

2012 मध्ये ऑस्ट्रेलियाहून परतल्यावर विराटला संघातून बाहेर काढण्यात आलं, त्याक्षणी त्याचे डोळे उघडले. तब्बल 13 महिने तो बाहेर होता आणि हेच 13 महिने त्याचं जीवन बदलणारे ठरले. विराटने स्वतःला बदललं, त्याच्या आरोग्याच्या सवयी त्याने बदलल्या. लक्ष्य डोळ्यापुढे ठेऊन त्याने अहोरात्र मेहनत केली आणि परिणामी त्याला संघात परत घेण्यात आलं. 

6. स्वतःला गांभीर्याने घ्या - 

सुरुवातीला जेव्हा विराट मैदानात उतरायचा तेव्हा त्याच्याविषयी प्रतिस्पर्ध्यांच्या मनात कधीच दरारा निर्माण होत नसे. त्यांना त्याच्या खेळाबद्दल जराही भीती वाटत नसे, तेव्हा त्याने स्वतःला अधिक प्रभावशाली बनवलं अँड द रेस्ट वॉझ हिस्ट्री 

7. तांत्रिकदृष्ट्या सक्षम बना - 

विराट कोहली हा तांत्रिकदृष्ट्याही सक्षम खेळाडू आहेच हे कोणीच अमान्य करणार नाही. सचिन तेंडुलकर प्रमाणेच विराट कोहलीसुद्धा प्रत्येक बॉल अगदी तंत्रानुसार खेळू शकतो. जर तुम्हाला सर्वोत्तम व्हायचं असेल तर तंत्रानुसार सराव करणं अनिवार्य आहे. 

8. प्रत्येक कामाचा आनंद घ्या- 

तुम्ही जे काम करताय त्याचा आनंद घेणं फार महत्त्वाचं आहे. विराट जेव्हा मैदानात खेळत असतो तेव्हा तो प्रत्येक मॅचमध्ये अगदी आनंदाने समरसून आणि सहजतेने खेळतोय हे स्पष्टपणे दिसतं. काम कुठलंही करा, पण ते मनापासून करा, हेच विराटकडून शिकावं.