एक कथा दोन दृष्टीकोन (#Monday_Motivation)

एक प्रसिद्ध लेखक त्यांच्या खोलीत बसले होते, त्यांनी विशिष्ट टेबलावर बसून आपल्या लिखाणास सुरुवात केली, त्यांनी लिहिले -

' गेल्या वर्षी माझ्यावर शस्त्रक्रीया झाली. गॉलस्टोन काढण्याच्या त्या शस्त्रक्रियेनंतर मी बराच काळ अंथरूणावर झोपूनच होतो. त्याच वर्षी, मी 60 वर्षाचा झालो आणि निवृत्तीलाही आलो होतो. मला माझी नोकरी थांबवावी लागली आणि ती कंपनी जी मला फार प्रिय होती तिथून मी निवृत्त झालो. माझं काम, जे मी गेली 35 वर्ष करत आलेलो होतो तेही मला निवृत्तीमुळे थांबवावं लागलं.

गेल्याच वर्षी माझी प्रिय आईही देवाघरी गेली... आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे, गेल्या वर्षीच माझ्या मुलालाही एका कार अपघातामुळे त्याच्या मेडीकलच्या अंतिम परिक्षेत अपयश पत्करावं लागलं.

एकापाठोपाठ एक अशा दुर्दैवी घटनांनंतर पुन्हा आणखी कार दुरुस्तीसाठी खर्च झालेला पैसा म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच होता !'

आणि सरतेशेवटी लेखकाने लिहीलं ...

' अरेरे ... मागचं वर्ष किती जास्त वाईट होतं आपल्यासाठी !'

इतक्यात त्या लेखकाची पत्नी तेथे आली. तिने पाहिलं की तिचे पती किती दुःखात बुडालेले आहेत आणि प्रचंड चिंताक्रांत दिसत आहेत. इतक्यात तिचं लक्ष्य लेखकाच्या समोरील कागदावर त्याने लिहिलेल्या मजकूराकडे गेलं. ती हळूच त्या खोलीतून बाहेर निघून गेली.

15 मिनीटांनी जेव्हा ती पुन्हा खोलीत आली तेव्हा तिने एक कागद, ज्यावर तिने स्वतः काहीतरी लिहीलेलं होतं, तो लेखक महाशयांसमोर ठेवला. त्यावर तिने लिहीलं होतं -

' गेल्या वर्षी, माझ्या पतींची अखेर त्या त्रासदायक अशा गॉलस्टोनपासून सुटका झाली, गेली कित्ती वर्ष त्यांना त्यामुळे सतत त्रास भोगावा लागत होता. त्यात आणखी एक बरं झालं की ते सुखासमाधानाने निवृत्तही झाले. त्यांना तब्बल 35 वर्ष काम करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण उत्तमरित्या करता आलं यासाठी मी देवाची आभारी आहे. आता, माझे पती त्यांचा बहुतांश वेळ त्यांच्या आवडत्या लेखन कलेसाठी घालवू शकतात याचा मला फार आनंद आहे.

गेल्याच वर्षी, माझ्या 95 वर्षांच्या सासूबाईंही कोणत्याही वेदनांशिवाय, सुखासमाधानाने देवाघरी गेल्या आणि त्याच वर्षी देवाने, माझ्या मुलालाही अपघातातून सुखरूप वाचवले. आमच्या कारचं जरी बरंच नुकसान झालं असलं तरीही आमचा मुलगा वाचला, आणि त्याला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही हेच आमच्यासाठी लाखमोलाचं होतं.

आणि शेवटी पत्नीने लिहीलं होतं -

गेलं वर्ष, देवाच्या प्रेमाची आणि आशिर्वादाची अनुभूती देणारं होतं आणि आम्हीही देवाचे आभार मानत आणि त्याच्या लीलांवर अगाध विश्वास ठेवत ते वर्ष आलं तसं स्वीकारत जगलो हेच समाधान ..

लेखकाने आपल्या पत्नीने लिहिलेला तो कागद वाचताच त्याचे डोळे पाणावले.. अश्रू गालावर ओघळायला लागले. पत्नीने गेल्या वर्षीच्या प्रत्येक दुर्घटनांकडे पहाण्याचा एक निराळा सकारात्मक दृष्टीकोन त्याला दिला होता, आणि त्यामुळे तो निरातीशय प्रेमाने आनंदला होता.

मित्रांनो, लक्षात ठेवा, केवळ आनंद मिळविल्यानेच तुमचं जीवन आनंदी होत नसतं, तर कृतज्ञता बाळगल्याने तुमचं जीवन आनंदी होत असतं. चला तर मग, आजपासून आपल्याजवळ जे आहे, त्यासाठी कृतज्ञ व्हायला शिकूया आणि आपलं जीवन आनंदाने भारून टाकूया.

गुलाबाला काटे आहेत म्हणून खंतावायचं की गुलाबाला काटे आहेत यासाठी आनंदी व्हायचं...

तुम्हीच ठरवा..

निवड तुमचीच असते ...

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com