ठरवून केलेला बदल (Planned Change)

Tue Mar 30, 2021

काल सकाळी एक जुनं organisational Behaviour चं पुस्तक हाती लागलं. सहजच पुस्तक चाळत असताना त्यात Planned Change नावाचा एक कॉन्सेप्ट वाचायला मिळाला. त्यामध्ये असं सांगितलं होतं की एक व्यक्ती असो किंवा भली मोठी संस्था असो, प्रत्येकाला एकदा नव्हे तर अनेकदा वेगवेगळ्या बदलांना सामोरे जावेच लागते. आणि म्हणूनच लादलेला बद्दल स्वीकारण्यापेक्षा, आधीच ठरवून स्वतः बदल करणे म्हणजेच Planned Change.

मोबाईल फोन बनविणाऱ्या नोकियाला बदल येताना दिसला नाही, कॅमेरा बनविणाऱ्या कोडॅक लाही तो दिसला नाही, कोरोना काळाच्या आधी कित्येक लहान-मोठ्या बिजनेसना डिजिटल युगाचे बदल येताना दिसले नाहीत. मागे एकदा हर्षा भोगले यांची एक मुलाखत ऐकत होतो... त्यांनी त्यावेळी एका ऑनलाइन क्रिकेट वेबसाईट साठी काम करण्याचं स्वीकारलं तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. हर्षा भोगले हा उच्च दर्जाचा समालोचक टीव्हीचा पडदा सोडून वेबसाईट साठी काम करतोय हेच बऱ्याच लोकांना समजणं जड गेलं. पण हर्षा भोगले म्हटले, की क्रिकेट असो वा बिझनेस ऑनलाइन हेच भविष्य आहे. त्यांनी तो बदल पाहिला, आणि लवकर स्वीकारला.

अनेक उद्योजकांना आजूबाजूला चाललेला हा बदल कळत नाही किंवा दिसत नाही असं नसतं. मात्र, बदल स्वीकारण्यासाठी जे धाडस लागतं ते आपल्या मध्ये अभावानेच आढळतं. जगातल्या अनेक मोठमोठ्या कंपन्यांची टर्न अराउंड स्टोरी बघितली तर प्रत्येक वेळेला लक्षात येतं के त्या बलाढ्य कंपन्यांनी स्वतहाला वेळीच बदललं.

फ्लिपकार्ट ची सुरुवात ऑनलाइन पुस्तक विक्री करण्यात झाली होती, अगदी तशीच जशी ॲमेझॉन ची झाली होती. काही वर्ष ऑनलाइन पुस्तक विक्री मध्ये जम बसवल्यानंतर फ्लिपकार्ट ने हळूहळू इतर प्रोडक्स ऑनलाईन आणायला सुरुवात केली. तेव्हा अनेक विश्लेषकांनी ही फ्लिपकार्ट ची चूक असल्याचं म्हटलं होतं. पण तेव्हा केलेल्या त्या बदलामुळे आज फ्लिपकार्ट भारतातील सगळ्यात यशस्वी स्टार्टअप म्हणून ओळखली जाते.

ॲमेझॉन ने सगळ्यात आधी प्रत्येक प्रॉडक्ट च्या खाली सर्वांनाच फीडबॅक/ प्रतिक्रिया/Reviews लिहिण्याची सोय केली. हि खूप bold move होती. आज ऑनलाइन खरेदी करताना Review बघितल्याशिवाय आपण खरेदी करतच नाही. इतका हा बदल आपल्याला सवयीचा झाला आहे. जेफ बेझोस च्या ऑफिस मध्ये ठळक अक्षरात लिहिले आहे Day One. म्हणजेच रोज बिजनेस चा हा पहिलाच दिवस आहे अशा प्रकारे वागायचं. असं केलं तरच नव्या गोष्टी स्वीकारण्याची ताकद आणि तयारी होते.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

नेटफ्लिक्स ही कंपनी आपल्याला नवी वाटते पण मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की नेटफ्लिक्स ही गुगल च्या आधी सुरू झालेली कंपनी आहे. तेव्हा व्हिडिओ कॅसेट किंवा डीव्हीडी पोस्टाने पाठवण्याचा नेटफ्लिक्स चा व्यवसाय होता. मात्र हळूहळू ऑनलाइन वापर वाढतोय हे नेटफ्लिक्सने वेळीच ओळखलं. आणि 2007 साली ऑनलाइन कन्टेन्ट बनवण्याच्या व्यवसायामध्ये नेटफलिक्स उतरली... वर्षभर जगभर असलेल्या लॉक डाऊन मध्ये लोक जेव्हा शेकडो वेब सिरीजचा फज्जा पाडत होते तेव्हा नेटफ्लिक्स कित्येक पटीने वाढत होती. २००७ साली जो बदल कंपनीने स्वतःहून केला त्याची फळं आज १३ वर्षांनंतर नेटफ्लिक्सला मिळत आहेत.

बदल न स्वीकारणे याबद्दलची सगळ्यात मोठी केस स्टडी "नोकिया" आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मित्रांनो स्मार्टफोनची शर्यत हरल्यानंतर नोकियाने Planned Change योजना आखली. नऊपैकी पाच बिझनेसेस बंद करून केवळ चार बिझनेस वर नोकियाने फोकस केला. आता नेटवर्किंग क्षेत्र मधली ती एक मोठी कंपनी बनू पाहत आहे. नुकताच त्यांनी सिमेंस आणि अल्काटेल या युरोपियन कंपन्यांचा नेटवर्किंग बिझनेस विकत घेतला आहे. ऑनलाईन मॅपिंग सर्व्हिसेस या दुसर्या बिझनेस मध्ये पण नोकिया भरीव कामगिरी करत आहे. कारण भविष्यातील स्वयंचलित गाड्यांसाठी हे तंत्रज्ञान फार उपयोगी ठरणार आहे.

Planned Change ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण कोणत्याही बदलाला सगळ्यात जास्त विरोध अंतर्गत होतो. तुम्हीच बघा तुमच्या ऑर्गनायझेशन किंवा बिजनेस मध्ये जेव्हा काही बदलायचा विचार करता तेव्हा इतर लोक त्याला कसा प्रतिसाद देतात. कोणाला नोकरी जाईल याची भीती वाटते, कोणाला आपली जागा जाईल याची भीती वाटते, कोणाला डिपार्टमेंट बदलायचं नसतं.... या प्रत्येक व्यक्तीच्या आपापल्या महत्त्वाच्या कारणांमुळे बिजनेस किंवा ऑर्गनायझेशन चं मोठे उद्दिष्ट मागे पडायला लागतं.

आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण वेळीच planned change न केल्यामुळे नुकसान होतं. मी नोकरी सोडून बिझनेस करायचा निर्णय घेतला तेव्हा म्हणजे 2015 खाली अनेकांना तो मूर्खपणा वाटला. कारण तेव्हा माझी नोकरी, पगार, पोझिशन खूप चांगली होती. पण नुकताच मला ऐकायला मिळालं की मी ज्या डिव्हिजन मध्ये नोकरी करत होतो ती डिव्हिजन बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. म्हणजे जर मी नोकरीत आहे तिथेच थांबलो असतो, तर कदाचित आज माझ्यासाठी अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती.

म्हणून मित्रांनो आत्तापर्यंत जे झालं ते झालं..... यापुढे आपल्याला बदलायला लागणार आहे हे नक्की. तो बदल काय असणार, आपण तो कधी करणार, आपण तो का करायचा याचे उत्तर तयार ठेवा. चार्ल्स डार्विन ने आपल्याला सांगितलंच आहे "सर्वात वेगवान किंवा सर्वात ताकदवान जिंकत नाही तर काळाच्या कसोटीवर तोच जिंकतो जो बदल स्वीकारतो !"Planned Change हे एक कडू औषध आहे पण भविष्यासाठी आपल्याला तयार करण्याचं सामर्थ्य केवळ त्याच औषधात आहे !!
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com