अशा मानसशास्त्रीय युक्त्या ज्या 99% लोकांवर हमखास काम करतात ! - (भाग 2) 

#Friday_Funda

मित्रांनो,
गेल्या भागात आपण अशा मानसशास्त्रीय युक्त्या पाहिल्या ज्या 99 टक्के लोकांवर हमखास काम करतातच. आज आपण अशाच आणखीही काही छोट्या पण हमखास काम करणाऱ्या मानसशास्त्रीय युक्त्यांविषयी जाणून घेऊया.. त्याच लेखाच्या आजच्या दुसऱ्या भागात

1.दुसऱ्याच्या स्मरणात रहाण्यासाठी -
प्रत्येकालाच वाटत असतं की आपण दुसऱ्यांच्या कायम लक्षात रहावं. त्यासाठी खरंतर खूप सोपी युक्ती आहे. नेहमी शेवटी किंवा अगदी सुरुवातीला तुमची उपस्थिती असावी. कोणत्याही गोष्टीचा शेवट किंवा सुरुवात तुमच्यापासून व्हायला हवी. लक्षात घ्या लोकांना शेवट आणि सुरुवात ही कायम स्मरणात रहाते.. मग भले मधला काळ, मधला कार्यक्रम कितीही चांगला का असेना ..

2.समोरच्याचा विश्वास जिंका -
समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकायचा असेल तर खरंतर अनेक मार्ग आहेत पण सर्वात सोपा, सहज मार्ग म्हणजे, जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता तेव्हा त्यांच्या देहबोलीला अधेमधे कॉपी करा.. आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे तुमच्या हालचाली त्यांच्यासारख्या असाव्यात. यामुळे समोरच्याच्या सबकॉन्शिअस माईंडमध्ये तुमच्याप्रती एक ताळमेळ निर्माण होतो आणि आपसूकच तुमच्याप्रती त्यांच्या मनात विश्वास निर्माण होतो.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

3.नेहमी आश्वासक रहा -
बरेचदा जेव्हा समोरचा आपल्याशी संवाद साधत असतो, तेव्हा आपण त्याच्याकडे केवळ पहात असतो आणि ऐकत असतो. आपली ही देहबोली समोरच्यासाठी तेवढी आश्वासक नसल्याने अनेक संवाद हे फारसे खुलत नाहीत, तिथल्यातिथेच खुंटतात किंवा विसंवाद होतात. म्हणून, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याशी दुसऱ्याने उत्तम संवाद साधावा, तर समोरच्याला नेहमी आश्वासक असा प्रतिसाद देत रहाणे फार गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही केवळ ती व्यक्ती तुमच्याशी बोलत असताना तुमची मान सकारात्मक हालवू शकता. पण या गोष्टीचा अतिरेकही नको, कारण, त्यामुळे समोरच्याला तुमचा वैतागही येऊ शकतो तसंच तुम्ही खोटारडे व कृत्रिमही भासू शकता हे ही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

4.थोडासा ज्यादा .. काफी ज्यादा ..
विशेषतः ही ट्रीक व्यावसायिक लोकांसाठी फार उत्तम आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी वस्तू विकत असता किंवा एखाद्याकडून व्यवसायासाठी थोडे पैसे कर्जाऊ घेणार असता तेव्हा तुम्हाला ही युक्ती वापरता येऊ शकते.
तुम्हाला जितके पैसे हवे असतील तेव्हा नेहमी त्या रकमेहून अधिक रक्कम त्याच्याकडे सुरूवातीला मागा.. यावर अर्थातच समोरच्याकडून नकार येतो. आता तुम्ही तुम्हाला गरज असतील तितके पैसे मागितल्यावर तुम्हाला नकार मिळण्याची शक्यता अत्यल्प झालेली असते. याचं कारण म्हणजे, लोकांना दुसऱ्यांचं मन दुखवायला किंवा त्यांना नकार द्यायला फार जिवावर येतं. पहिल्या नकारामुळे त्यांच्या स्वतःच्याच मनात ही भावना निर्माण झालेली असते, त्यामुळे ते पुन्हा नकार देण्याऐवजी होकार देतात आणि तुमचं काम होतं.
ही ट्रीक खरंतर केवळ पैशाच्याच बाबतीत लागू होते असं नाही, तर जेव्हाही तुम्हाला दुसऱ्याकडून एखादं काम करून घ्यायचं असेल तेव्हा तुम्ही त्याच्याकडे त्याहूनही मोठ्या कामाचा, ध्येयाचा प्रस्ताव ठेवा आणि मग त्या तुलनेत तुमचं काम किती छोटं, क्षुल्लक आणि समोरच्याला सहज करता येण्याजोगं आहे हे पटवून द्या .. की झालं तुमचं काम !

(याचा लेखाचा भाग 1 वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - https://learn.netbhet.com/blog/Psychological-tricks-that-work-for-most-of-the-people-friday-funda)

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com