शावार्शची असामान्य शौर्यकथा

16 सप्टेंबर 1976 चा दिवस.

आर्मेनिया मधील एक 23 वर्षांचा तरूण खेळाडू कंटाळा घालवण्यासाठी म्हणून येरेवानमधल्या कृत्रिम तळ्याच्या बाजूने पळतोय. त्याच्या बाजूने त्याचा भाऊ आणि त्याचे प्रशिक्षक आहेत. त्या 23 वर्षांच्या तरूणाच्या पाठीवर 45 पाऊंडाची सॅक आहे ज्यामध्ये वाळू भरलेली आहे. या 13 मैलाच्या अंतरात त्याचे जीवन कायमस्वरूपी बदलून जाणार आहे याची त्याला कल्पनाही नाही...

आणि इतक्यात कसलातरी भयंकर जोरदार आवाज झाल्याचे त्याने ऐकले, जणू कुठेतरी बाँबच फुटला असावा. त्याचे कान टवकारले आणि त्याने नजर त्या दिशेने फिरवली. समोर एक महाभयंकर प्रसंग दिसत होता. ट्रॉली बस नंबर 15 रस्त्यावरून थेट तळ्यात कोसळली होती.

क्षणार्धात या कोवळ्या तरूणाने श्वास रोखून तळ्यात उडी मारली आणि तो पोहत त्या बसपाशी पोचला. पाण्याखाली तब्बल 15 फूट जाऊन त्याने आपल्या डाव्या पायाने लाथ मारून बसची एक खिडकी उघडली. तितक्यात पाण्यात उमटलेल्या जोरदार तरंगामुळे त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि तरीही तो तसाच बसच्या आत शिरला. त्याने आतमध्ये कोणी जिवंत आहे का त्याचा अंदाज घेतला आणि क्षणाचाही विलंब न करता एकापाठोपाठ एक अशा 40 खेपा पोहून मारत त्याने शक्य तितक्या माणसांना आपल्यासोबत वर आणलं. वर त्याचा लहान भाऊ, जो स्वतःसुद्धा एक उत्तम जलतरणपटू होता तो होता. या साऱ्या माणसांना त्याच्याजवळ सोडत तो कोवळा तरूण पाण्यात पोहत माणसांचे प्राण वाचवायला पुन्हा पुन्हा आत शिरत होता.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

अपघातग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जेव्हा पोलीस दल तिथे पोचले तेव्हाही हा तरूण थांबला नाही. त्याने एकट्याने 37 नागरिकांना पाण्यातून वर किनाऱ्यावर आणले, ज्यातले 20 नागरिक सुखरूप बचावले.

या बहाद्दर तरूणाचे नाव होते, शावार्श कॅरापेत्यान. आर्मेनियामध्ये 19 मे रोजी जन्मलेला शावार्श जणू नियतीने महान गोष्टी करण्यासाठीच पाठवलेला एक देवदूत असावा. कारण, त्याच्या जीवनात अशी आणखी एक घटना यापूर्वीही घडली होती.

खेळाडू म्हणून त्याचे करिअर उत्तम होईल हे त्याच्या वडिलांनी केव्हाच जाणले होते, सुरुवातीला त्यांनी शावार्शला जिम्नॅस्टीकसाठी प्रोत्साहन दिले पण त्याने उशीरा सुरुवात केली असून तो या खेळात चॅम्पियन बनू शकणार नाही असे मत त्याच्या प्रशिक्षकाने व्यक्त केले. त्यामुळे शावार्शला जलतरणपटू होण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, तिथेही, आवश्यक असलेली लवचिकता त्याच्या शरीरात नाही असे मत पडले. अखेरीस, शावार्शला फिनस्विमर म्हणून करिअर निवडता आले, ज्याकरिता आवश्यक असणारी मजबूत अंगकाठी आणि अमर्याद ऊर्जा त्याच्याकडे होती.

फिनस्विमींग - एक असा क्रीडा प्रकार, ज्यामध्ये जलतरणपटूंना पाण्याखाली शर्यत करावी लागते आणि त्यांच्या पायाला माशांचे असतात त्याप्रमाणे पर (फिन्स) लावलेले असतात. लांबपल्ल्याच्या या शर्यतीसाठी फिनस्विमर्सना स्नॉर्कल्स किंवा ऑक्सिजन टँक्स वापरावे लागतात. तर कमी पल्ल्याच्या शर्यतीसाठी त्यांना केवळ पाण्याखाली श्वास रोखून धरावा लागतो.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
वडिलांना आपला अभिमान वाटावा म्हणून शावार्शने प्रचंड मेहनत घ्यायला सुरुवात केली. तो दररोज 18 मैल धावण्याचा सराव, तेही पाठीवर वाळूची बॅग घेऊन, करू लागला. इतकंच नव्हे तर अन्य प्रकारेही त्याने मेहनत करायला सुरुवात केली आणि मुख्य म्हणजे श्वासाचं तंत्र, श्वास जास्तीत जास्त वेळ रोखून धरण्याच्या तंत्राचाही त्याने सराव करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्याच्या मेहनतीला रंग आला. शावार्शने 50 आणि 100 मिटरच्या शर्यतीत मॉस्कोमध्ये 1972 मध्ये झालेल्या युरोपिअन चँपिअनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. सोव्हीएत मासिकाने या विजयाबद्दल शावार्शचे विशेष कौतुक केले आणि भविष्यात आणखी विजय मिळवणार असा विश्वासही व्यक्त केला.

याच दरम्यान, शावार्शच्या जीवनात एक असा प्रसंग घडला ज्यात तो किती निधड्या छातीचा, निडर आहे हे दिसून आले. 1974 मध्ये एकदा बसने क्रीडाकेंद्रात जात असताना एक बाका प्रसंग उद्भवला. बसचं इंजिन पहाण्यासाठी बसखाली उतरताना चालक निष्काळजीपणे बसचे हँडब्रेकच लावायला विसरला, क्षणार्धात बस उतारावरून मागे दरीच्या दिशेने जायला लागली. प्रसंगावधान दाखवत शावार्श झटदिशी ड्रायव्हरच्या केबिनमध्ये शिरला आणि त्याने चटकन् हँडब्रेक लावला. आलेलं संकट टळलं, पण त्याला कुठे माहिती होतं की अशा कठीण प्रसंगी देवदूत बनून रहाण्यासाठीच नियतीने त्याची निवड केली आहे...

1974 मध्ये घडलेला तो बसचा अपघात आणि शावार्शने आपले प्राण पणाला लावून वाचवलेला अनेकांचा प्राण ही घटना अक्षरशः थरकाप उडवणारी. या घटनेच्या वेळी सर्वात कठीण गोष्ट शावार्शसाठी होती ती म्हणजे पायाने खिडकीची काच फोडणे... पण त्यांनी तीही जोखीम पत्करली. काच पायात रुतल्याने पायातून अखंड रक्तस्त्राव होत होता, पण त्याकडे आणि वेदनांकडे दुर्लक्ष करत शावार्शने पुढे होत लोकांचे प्राण वाचवले.

नंतर कित्तीतरी दिवस शावार्शला ही घटना स्वप्नात दिसून ते खडबडून जागे होत असतं. त्यांना स्वप्नातही वाटे, की त्यांनी त्याप्रसंगी आणखीही कोणाचे प्राण वाचवले असते तर...

या दुर्दैवी घटनेच्या वेळी शावार्श यांच्या पायाला जी जखम झाली ती तशीच घेऊन ते घरी परतले खरे पण त्या थंड आणि प्रदूषित पाण्याने त्यांची जखम चिघळली. तशातच संध्याकाळी त्यांना प्रचंड ताप भरला. डॉक्टरांनी शावार्शला न्युमोनिया झाल्याचे आणि रक्त विषारी झाल्याचे निदान केले. तब्बल तीन आठवड्यानंतर ते पुन्हा चालू लागले खरे पण त्या घटनेने त्यांचे करिअर वेळेपूर्वीच संपवले, ते कायमचेच ! याचं कारण, ट्रॉलीबसच्या त्या घटनेत शावार्शच्या श्वसनसंस्थेचे प्रचंड नुकसान झाले. त्याने पाण्यात सतत मारलेल्या फेऱ्यांनी घात केला होता. पण तरीही, शावार्शनी पुन्हा तयारी केली, पुन्हा मेहनत केली आणि 1975 मध्ये सुवर्णपदक जिंकले. खरंतर ट्रॉलीबस दुर्घटनेनंतर पाण्याची भीती नव्हे तर पाण्याचा अक्षरशः तिटकारा येऊ लागल्याचेही शावार्श कबूल करतात.

24 व्या वर्षी जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा त्यांनी एक दोन नव्हे तर चक्क 11 वर्ल्ड रेकॉर्ड्स सेट केले होते. 17 वर्ल्ड चँपियनशिप टायटल्स पटकावले होते, 13 युरोपिअन चँपियनशिप्स पटकावल्या होत्या आणि 7 सोव्हिएत चँपियनशिप टायटल्स जिंकले होते, आणि एवढं सगळं घडूनही अद्याप येरेवानमध्ये या ग्रेट हिरोची चर्चासुद्धा नव्हती.

थेट 1982 मध्ये जेव्हा एका जर्नलिस्टने ट्रॉलीबसच्या त्या अपघाताविषयी एका फिनस्विमिंग स्पर्धेदरम्यान चर्चा ऐकली तेव्हा त्याने मॉस्कोमधील कोमसोमोलस्काया प्रावदा या वर्तमानपत्रात त्याचे वार्तांकन केले. या लेखात ट्रॉलीबसच्या अपघाताविषयी जरी काही लिहीलेले नव्हते तरीही शावार्शच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल मात्र सविस्तर वर्णन प्रसिद्ध झाले होते, आणि त्यानंतर शावार्शची सर्वत्र चर्चा झाली. तो हिरो झाला. सोव्हीएत अधिकाऱ्यांनी त्याचा गौरव केला. विविध पुरस्कारांनी आणि पदव्यांनी त्याला सन्मानित करण्यात आले. असंख्य नागरिकांनी त्याला पत्र पाठवली.

खरंतर या गौरवांनंतर शावार्श आयुष्यात जरा विसावला असता तरीही चाललं असतं पण 1985 मध्ये जेव्हा येरेवान स्पोर्ट अकादमी आणि कॉन्सर्ट काँप्लेक्समध्ये आग लागली तेव्हा शावार्शने पुन्हा एकदा आपले प्राण पणाला लावून या आगीच्या झळांमध्ये उडी मारली, अगदी तशीच जशी त्याने त्या दिवशी ट्रॉलीबसमधील माणसांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली होती..

त्या घटनेनंतर शावार्श मॉस्कोला स्थलांतरीत झाले आणि त्यांनी तिथे आपली एक शूजची कंपनी सुरू केली, पण असे असले तरीही त्याच्या देशातील नागरिक त्याला कधीही विसरले नाहीत. 2014 मध्ये सोची येथे झालेल्या विंटर ऑलिंपिक गेम्समध्ये ऑलिंपिकची मशाल धरण्याचा सन्मान त्यांनी शावार्शला दिला. त्या दिवशी आपण रशिया आणि अर्मेनिया दोन्हीही देशांसाठी ती मशाल धरल्याचे शावार्श अभिमानाने सांगतात.
दशकांनंतर आजही जेव्हा ती ट्रॉलीबस दुर्घटना त्यांना आठवते तेव्हा त्यांच्या मनात स्वाभिमान दाटतो. याचं कारण ते म्हणतात, त्या दिवशी जर माझ्यासारख्या जगज्जेत्या फिनस्विमरने त्या घटनेपासून पळ काढला असता तर निसर्गाने आणि मानवतेने मला कधीच माफ केले नसते. मी देवाला काय उत्तर दिले असते ?
मला ठाऊक होतं, याक्षणी असंख्य निष्पाप जीवांना माझी गरज आहे आणि म्हणूनच मी माझे कसब वापरून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता त्यांचे प्राण वाचवण्यास सरसावलो...!

पोस्ट आवडल्यास जरूर शेअर करा.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !