गोदाकाठची फोटोग्राफर, जी त्यावर चालवतेय आपलं घर

फोटोग्राफी करणं हे अजूनही आपल्याकडे पुरुषांचीच मक्तेदारी असलेलं क्षेत्र आहे. भारतात सेल्फीक्विन बऱ्याच दिसतील पण ज्यांच्यापर्यंत शिक्षणाची गंगाही पोचलेली नाही, अशा तळागाळातल्या महिलांमध्ये तर फोटोग्राफी आणि कॅमेऱ्याचे तंत्रज्ञान वापरणारी महिला, तेही व्यावसायिक पातळीवर, अशी एकमेव महिला म्हणजे नाशिकच्या गोदाकाठी फोटोग्राफी करणारी सुमित्रा जाधव.

बीबीसी न्यूजने थेट त्यांच्या कामाची दखल घेतली तेव्हा खरंतर सुमित्रा यांचे काम प्रकाशझोतात आले. सार्वजनिक ठिकाणी पर्यंटकांचे फोटो काढणाऱ्या सुमित्रा यांनी हे काम परिस्थितीमुळेच सुरू केले. सुमित्रा यांचे पती खरंतर हा व्यवसाय करतात, मात्र जेव्हा सुमित्रा यांचे सासरे आजारी पडले तेव्हा त्यांना गावी जावे लागले आणि घराची जबाबदारी सुमित्रांच्या खांद्यावर आली. अशावेळी पदरी शिक्षण नसल्याने काय काम करता येईल असा विचार केला असता, त्यांच्या पतींनी त्यांना कॅमेऱ्याचे आणि फोटोग्राफीचे तंत्र शिकवले. अर्जंट फोटो कसे काढायचे, ते प्रिंट कसे करायचे हे सगळं काही सुमित्रा शिकल्या आणि मग त्यांनी गोदावरी काठच्या पर्यटकांचे फोटो काढून देण्यास सुरुवात केली.

हा व्यवसाय सुरु केल्यानंतर सुमित्रा यांना अनेक अनुभव आले. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एरवी पुरूष फोटोग्राफरच्या समोर तितक्याशा न खुलणाऱ्या महिलांना, समोर जेव्हा एक महिला फोटोग्राफरच आपले फोटो काढतेय हे दिसायचं तेव्हा त्या अधिक खुलून जात. याउलट अनेक महिलांना सुमित्रा यांचं काम पाहून फार आश्चर्य वाटत असे, कारण त्यांनी अशाप्रकारे फोटोग्राफीच्या क्षेत्रात काम करणारी महिला कधी पूर्वी कुठे पाहिलेली नसल्याचे त्या सांगत.

सुमित्रा आता गोदाकाठची फोटोग्राफर म्हणून नावारूपाला येत आहेत ही खरोखरीच कौतुकाचीच बाब आहे.
त्यांच्या उदाहरणावरून एकच गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही तुमच्या आवडीचं कौशल्य शिकू शकता आणि त्या कौशल्याने तुमची जीवनाची खडतर वाट सुसह्य होऊ शकते. त्यामुळे शिकणं कधीही कोणत्याही परिस्थितीत थांबवू नका... !
धन्यवाद
टीम नेटभेट
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !