नेटभेट चित्रकला स्पर्धा 2022 चा निकाल

नमस्कार मित्रमैत्रिणींनो,
नुकतीच नेटभेटतर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला आपण उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार.
या स्पर्धेत एकूण तब्बल 5300 प्रवेशिका आम्हाला प्राप्त झाल्या. सगळ्यांचेच प्रयत्न खरोखरीच फार उल्लेखनीय होते. दिलेल्या विषयांवर आणि दिलेल्या रंगमाध्यमांचा वापर करून आपल्या कल्पनेला चालना देत चित्र काढणं हे खरोखरीच आव्हानच होतं, परंतु, हे आव्हान अनेकांनी लीलया पेललं त्यामुळे परिक्षकांनाही विजेते निवडणं अंमळ आव्हानाचंच झालं होतं. मात्र, स्पर्धेकरिता दिलेल्या नियमांच्या चौकटीत बसणारी चित्र निवडून आणि त्यातून अटीतटीचा सामना असल्याप्रमाणे अंतिम तीन विजेते व उत्तेजनार्थ तीन पारितोषिंकासाठी विजेते निवडले गेले.
एकूण चार गटात झालेल्या या स्पर्धेत सर्व विजेत्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर विजेत्यांसह सर्व सहभागींना नेटभेटतर्फे डिजीटल प्रमाणपत्र देण्यात आले आणि त्याचबरोबर नेटभेटचा आर्टस्मार्ट सिरीज हा कोर्सही मोफत देण्यात आला.
नेटभेटतर्फे घेण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेचा मुख्य हेतू स्पर्धकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे हाच होता, त्याचबरोबर रंगांचा सुयोग्य वापर करता येणे, अभिव्यक्त होता येणे आणि स्पर्धेच्या नियमांमध्ये व अटींमध्ये बसणारे चित्र काढून स्पर्धेत उतरणे हे फार महत्त्वाचे होते. आपल्यातील सूप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा हे फार मोठं व्यासपीठ असतं हे आपण सारे जाणतोच. त्यामुळेच वयाची अट न ठेवता अबालवृद्धांसाठी, त्यांच्यातील दडलेल्या चित्रकाराला बाहेर काढण्याची संधी नेटभेटने दिली आणि तुम्हीही त्यास भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार आणि सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक हार्दीक अभिनंदन !
धन्यवाद
सलिल सुधाकर चौधरी