1 करोडची ऑफर धुडकावून सुरू केली तिने स्वतःची कंपनी.. आज आहे तब्बल 700 करोडचा टर्नओव्हर (#Biz_Thursday)

"उद्योजक होणं हा एकट्याचा प्रवास आहे, एक मोठा प्रवास.. ज्यात अपयश आहे.. नकार आहेत.. विलंबही आहे... मात्र तरीही जिंकेपर्यंत लढत रहाण्याची ज्याची ताकद आहे, अशा व्यक्तीने उद्योजक होण्याचा ध्यास घ्यावा नि उद्योजक होऊन दाखवावं..."

वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षीच तिने हा ध्यास घेतला होता, नि पुढे अनेक वर्ष लढत झगडत, असंख्य नकार पचवूनही तिने जगाच्या पाठीवर आपलं नाव यशस्वीरित्या कोरलं.. ही कहाणी आहे, शुगर कॉस्मेटिक्सच्या विनीता सिंघ यांची..

आपल्या आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी. आईवडील दोघंही डॉक्टर, त्यातूनही वडील फार फार महत्त्वाकांक्षी. त्यांना जगात सर्वात जास्त प्रोटीन्स शोधायचे होते, ज्यामुळे अनेक आजारांवर औषधं बनवण्यास मदत होईल. असा ध्यास घेतलेला असल्याने विनीताचे वडील अहोरात्र एम्सच्या लॅबमध्ये काम करत असायचे. वडीलांमधले गुण लहानग्या विनीताच्या अंगी न येतील तरच नवल.. म्हणूनच, विनीताला एकच गोष्ट पक्की ठाऊक होती, की आपल्याला जे काही करायचंय ते देशातच नाही तर संपूर्ण जगात अव्वल असलं पाहिजे.

आईवडीलांसह विनीता जेव्हा गुजराथहून दिल्लीला शिफ्ट झाल्या तेव्हा ती लहानच होती, तिला कोणाशीही मोकळेपणाने व्यक्त होणं कठीण वाटायचं. फारसे मित्रमैत्रिणीही नव्हते, पण तरीही उद्योजिका होण्याचं जणू तेव्हाच तिच्या कपाळावर कोरलं गेलेलं असावं. कारण, शाळेत असतानाच विनीता आणि तिच्या मैत्रीणीने एक मासिक काढायला सुरुवात केली आणि ते मासिक अगदी 3 रूपयाला दारोदारी जाऊन त्या विकायच्या. तेव्हाही अगदी 3 रुपयेही जास्त वाटतात म्हणून अनेकांनी त्यांचं मासिक खरेदी करण्यास नकार दिला, पण तिथूनच त्यांच्यात नकार पचवण्याची ताकद आली. तसंच, पैशाला गृहीत न धरण्याचा संस्कारही तिथेच त्यांच्या मनावर रूजला.

अगदी चारचौघांप्रमाणेच आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काही करणं विनीता यांनाही कठीणच वाटायचं. ज्या गोष्टी येतात त्या करायच्या आणि त्यात हमखास यश मिळतंच हे साधंसोपं जगण्याचं समीकरण. त्यानुसारच त्यांनी आयआयएम अहमदाबादला इन्व्हेस्टमेंट बँकींगसाठी अप्लाय केलं आणि प्रवेशही मिळवला. तिथूनच पुढे एक करोडच्या पॅकेज देणारी जॉबचीही ऑफर त्यांना मिळाली, पण विनीता यांना तेव्हा जाणवलं, की आपण अपयशाच्या भीतीने हे सगळं करत आलोय, पण कधी ना कधी जर अपयश वाट्याला आलंच तर आपण काय करणार असं सतत मन विचारत राही. याच काळात त्यांनी खूप वाचन केलं आणि अंतःप्रेरणा सतत उफाळून येत राहिली की आपल्याला एक उद्योजिका व्हायचंय. विनीता खुद्द एका मुलाखतीत सांगतात, जर मला ठाऊक असतं की उद्योजिका होणं इतकं महाकठीण काम आहे, आणि त्यासाठी मला अनेक वेळा अपयशही पचवावंच लागणार आहे तर मी कधीच माझी नोकरी सोडून या वाटेला आले नसते.. पण .. बरंच झालं की मला हे सगळं आधी माहिती नव्हतं, आणि त्यामुळेच मी नव्या वाटेने स्वतःला आझमावून पाहिलं.

23 व्या वर्षी हातात आलेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून विनीता यांनी पक्क ठरवलं की आपल्याला उद्योजिकाच व्हायचंय. जवळ कोणताही अनुभव नसताना, मनात केवळ एक योजना घेऊन त्यांनी मग अनेक गुंतवणूकदारांचे उंबरठे झिजवले. सगळीकडून नकार आला, कारण, विनीता तेव्हा अवघ्या 23 वर्षांच्या होत्या. त्यामुळे त्यांचं वय विचारात घेता त्यांच्यावर एवढा मोठा विश्वास कोणीच दाखवत नव्हतं. मग त्यांनी ठरवलं, की आता मी कोणाही गुंतवणूकदाराकडे पैसे मागायला जाणार नाही, स्वतःच भांडवल उभं करेन.. मग पाच वर्ष त्यांनी ग्राहकांना बॅकग्राऊंड व्हेरीफिकेशन सर्विसेस द्यायला सुरुवात केली, ज्याचे त्यांना महिन्याला फक्त 10 हजार रुपये मिळायचे. एक गलेलठ्ठ पगाराची ऑफर सोडून एवढ्या कमी पैशात गुजराण करणं अवघड होतंच, पण तरीही स्वप्नपूर्तीचा ध्यास गप्प बसू देत नव्हता. सुरुवातीला विनीता यांनी ठरवलेला व्यवसाय त्यांची त्यात मूलतःच आवड नसल्याने त्यांना फार काळ करावासा वाटलाच नाही. शिवाय, त्या व्यवसायात त्यांना हे लक्षात आलं की हा व्यवसाय तर चालेल पण याचं टर्नओव्हर आत्ता आहे त्यापेक्षा कैक पटींनी जास्त कधीच मिळणार नाही, तसंच, आपली कंपनी कधीच वर्ल्डक्लास कंपनी होऊच शकणार नाही. जेव्हा ही गोष्ट जाणवली तेव्हा विनीता यांनी आणखी एक निर्णय घेतला, तो म्हणजे आपलं प्रॉडक्ट बदलण्याचा.. आणि तेव्हा जन्म झाला शुगर कॉस्मेटिक्स या कंपनीचा.

महिलांच्या मानसिकतेचा अभ्यास करताना विनीता यांना जाणवलं, की महिलांना अशी सौंदर्यप्रसाधनं नको आहेत जी त्यांना वरवर फक्त सुंदर करतील, किंवा असे रंग जे त्यांच्यावर कधीच खुलून दिसणार नाहीत, तर त्यांना अशी सौंदर्यप्रसाधनं हवी आहेत, जी त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करतील.. आणि हाच धागा ओळखून त्यांनी आपल्या कंपनीची उत्पादनं बनवली.. आणि पहाता पहाता ही उत्पादनं लोकप्रिय झाली.

जेव्हा ही कंपनी अस्तित्वात आली तेव्हा बाजारात ज्या सौंदर्यप्रसाधनांच्या कंपन्या वर्चस्व गाजवून होत्या, त्यांची टॅगलाईन होती की त्यांचे प्रॉडक्ट्स महिलांना गोरं करतील.. गोरेपणाच्या बाजारपेठेला शुगर कॉस्मॅटीक्स कंपनीने मोठ्या अभ्यासपूर्वक आणि हुशारीने आत्मविश्वासाच्या बाजारपेठेत बदलून टाकलं.
कोणत्याही ऋतूत शुगर कॉस्मेटिक्सचे प्रॉडक्ट्स चेहऱ्यावर टिकून रहातात आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या बिझी वेळापत्रकातही तुमच्या चेहऱ्यावर ही उत्पादनं सुस्थितीतच रहातात हेच यांच्या उत्पादनांचे वैशिष्ट्य आहे. मात्र, हा टप्पा गाठण्यासाठी विनीता यांना बरीच मेहनत करावी लागली.

कॉस्मॅटीक्सच्या रंगांच्या शेड्समध्येही त्यांनी अजिबात तडजोड खपवून घेतली नाही. अशी चोख उत्पादनं बनवून घेण्यासाठी त्यांनी सुरुवातीला जे मॅन्युफॅक्चरर्स त्यांनी गाठले त्यांपैकी केवळ काहीच जण तितकं चोख काम करू शकत होते. त्यांना हे लक्षात आलं की विनीता यांची कंपनी काहीतरी वेगळं करू इच्छित आहे, आणि त्यामुळेच त्यांच्याही मनात विनीता यांच्या कामाविषयी उत्सुकता होती.

विनीता यांनी मार्केटचा रिसर्च करतानाच मनात पक्क केलं होतं की आपल्या कंपनीचा टार्गेट ऑडीअन्स म्हणजे 20 ते 27 वयोगटातील तरूणी असतील, ज्या मेट्रो मिलेनिअल आहेत आणि ज्या दिवसभरात बराचसा वेळ डिजीटल कंटेंटवर घालवतात. अशा तरूणी, ज्या ग्लोबल ट्रेण्ड्सने इन्स्पायर होतात पण त्यांना त्यात त्यांचा भारतीय सौंदर्याचा फ्लेव्हरही हवा आहे. म्हणूनच तेव्हा विनीता चालवत असलेल्या कंपनीतील महिला कर्मचारी, ज्या त्यांच्या टार्गेट ऑडीअन्समध्येही बसत होत्या अशांवर त्यांनी आपल्या उत्पादनांचे रिझल्ट्स तपासून पाहिले. या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे दिलेला रिप्लाय ऐकल्यावर विनीता यांना विश्वास वाटला की, आपल्या ग्राहकांनाही आपली उत्पादनं निश्चितच आवडतील.

जेव्हा एवढा फोकस्ड विचार करून विनीता यांनी आपली उत्पादनं बाजारात आणली तेव्हाही त्यांनी एक निराळी स्ट्रॅटेजी वापरली. त्यांनी आपल्या कंपनीच्या उत्पादनांची सुरुवात ऑनलाईन मार्केटींगद्वारे केली.
सोशल मीडियावरही या कंपनीला उदंड प्रतिसाद मिळाला आणि विनीता यांनी अखेर आपलं वर्ल्डक्लास कंपनीचं स्वप्न पूर्ण केलंच..

या संपूर्ण प्रवासाविषयी विनीता सांगतात, ' नुसताच कोणतातरी व्यवसाय सुरू करू नका, तर तुमच्या ध्यास ओळखा, तुमची आवड ओळखा आणि ती घेऊन कामाला लागा. किंवा, तुमच्या समस्येपासूनच सुरुवात करू शकता. तुम्हाला जे प्रश्न पडतील, ज्या समस्या भेडसावतील, त्यातूनच मार्ग काढा, तुमचं उत्पादन ठरवा आणि कामाला लागा. तुम्हाला मार्केटींग येत नसेल, ब्रँडींग येत नसेल किंवा काहीच येत नसेल तरीही घाबरू नका. तुमच्या व्यवसायासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या, तुमच्यासाठी योग्य मेंटॉर शोधा आणि त्यांचा हात धरून पुढे जात रहा.. तुमच्या स्वप्नांच्या, तुमच्या मनाच्या वाटेने काम करत रहा, एक ना एक दिवस तुमचीही कंपनी वर्ल्डफेमस होईलच .. फक्त प्रामाणिकपणे काम करत रहा...!'

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com