उद्योजक होण्यासाठी हवा थोडासा वेडेपणा नि खूप सारी आंतरिक ऊर्मी

स्टे हंग्री स्टे फूलिश

#Saturday_Bookclub

एखादी व्यक्ती अपयशी का ठरते याची जशी अनेक कारणं सांगता येतील, तशीच एखादी व्यक्ती यशस्वी का होते यामागेही अनेक कारणं असतात. तब्बल 25 अशा उद्योजकांच्या खऱ्याखुऱ्या गोष्टी लेखिका रश्मी बन्सल यांच्या स्टे हंग्री स्टे फूलिश या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतात.. आणि नुसत्याच कथा नाहीत, तर यांच्या यशामागे नेमकी कोणती कारणं दडलेली होती हे देखील या पुस्तकात वाचायला मिळते. उद्योजक होण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनाकडे पहायला हवं याचा एक परिपूर्ण दृष्टीकोन या पुस्तकातून मिळतो.

आयआयएम एमबीए ग्रॅज्युएट असलेल्या पंचवीस तरूणांच्या खऱ्या गोष्टी या पुस्तकात दिलेल्या आहेत. हे सगळेजणं मध्यमवर्गीय कुटुंबातले.. इतकी सर्वोत्तम पदवी गाठीशी असताना त्यांना उच्च पदाची, भरपूर पगाराची नोकरी कुठेही मिळाली असती. परंतु, या सगळ्यांनी नोकरीचा पर्याय न निवडता, स्वतःच्या आतला आवाज फॉलो केला, आपली स्वप्न आणि आपल्या मनातील काहीतरी करण्याची तीव्र इच्छा यांच्या आवाज सतत ऐकत राहिले आणि प्रचंड अवघड वळणांतून निभावून नेत पुढे आपापली स्वप्न पूर्ण केली. ते स्वतः नोकरीखेरीज अन्य जे करू इच्छित होते ते त्यांनी केले आणि आज हे सगळेच जण आपापल्या व्यवसायात यशस्वी झालेले आहेत. यशस्वी उद्योजक म्हणून सगळ्या जगाला त्यांची ओळख आहे. मग यांच्या या यशामागे नेमकी कोणती कारणं दडली होती ? यासाठी लेखिकेने तीन कॅटेगरीजमध्ये या पंचवीस लोकांची विभागणी केली आहे.


1. द बिलीव्हर्स - असे उद्योजक ज्यांना हे पक्क ठाऊक होतं की त्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करायची नाहीये तर स्वतःचा उद्योग व्यवसाय करायचा आहे आणि मग ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत ते त्या दिशेने जात राहिले. ते हरले नाहीत, ते थांबले नाहीत, त्यांनी स्वतःच्या स्वप्नांवरचा विश्वास कोणत्याही परिस्थितीत हरवू दिला नाही. 

2. दी अपॉर्च्युनिस्ट - या उद्योजकांनी आपला मार्ग कधीच आधी ठरवला नव्हता परंतु, जेव्हा त्यांच्यासमोर तशी संधी चालून आली तेव्हा त्यांनी ती घेतली आणि ते पुढे गेले. यांच्या गोष्टींवरून हेच शिकायला मिळतं की जरूरी नाहीये की तुम्ही जन्मतःच उद्योजकत्व घेऊन आलेले असाल, परंतु नंतर तुम्ही तुमच्यात तशी कौशल्य विकसीत करू शकता. तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर स्वतःला तसं घडवून उद्योजक होऊ शकता हे लक्षात ठेवा.

3. दी अल्टरनेट व्हिजन - या उद्योजकांनी आपले व्यवसाय उभारले ते सामाजात एक ठसा उमटवण्यासाठी ! त्यांना आपल्यातील कल्पकतेला, आपल्यातील गुणांना आणि आपल्या बुद्धिमत्तेला आणखी वाव देत स्वतःची एक नवी ओळख निर्माण करायची होती आणि त्यांनी वेगळी वाट चोखाळत ते स्वप्न पूर्ण केलं.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================


या सगळ्या वर्गिकरणांतून ज्या पंचवीस लोकांच्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात त्या खरोखरीच फार प्रेरणादायी आहेत. या सगळ्यांमध्ये कॉमन दिसून आलेले काही गुण म्हणजे -


1. पॅशन ( एखादी गोष्ट करण्यामागची तीव्र ऊर्मी )
यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी कमावण्याच्या इच्छेपेक्षाही आपल्या मनातील स्वप्न पूर्ण करण्याबाबतची तीव्र ऊर्मी होती. त्यामुळे ते कितीही वेळा हरले, चुकले, पडले तरीही ते कधीच थांबले नाहीत वा त्यांनी आपली स्वप्न कधीही सोडून दिली नाहीत. त्यांनी ते काम केलं, कारण त्यांना ते करायचंच होतं .. मनापासून


2. संधी हेरण्याचं कसब
त्यांना आपल्या हुशारीने संधी हेरता आल्या. त्यांनी त्या संधी वेळीच हेरल्या, कधी शोधल्याही आणि त्यांचा उपयोग करून घेतला. या लोकांचं वेगळेपण हे होतं, की यांनी इतरांपेक्षा वेगळ्या मार्गाची निवड केली. त्यांनी वेगळी साधनं वापरली, वेगळा विचार केला आणि वेगळ्या कृती केल्या. शिवाय, त्यांना हे देखील पक्क ठाऊक होतं, की एखाद्या गोष्टीची सुरूवात फार जोरदार झाली नसली तरीही याचा अर्थ ती गोष्ट भविष्यात यशस्वी होणार नाही असं नसतं. त्यामुळे ते सातत्याने त्यांचं काम करत राहिले.


3. जनसंपर्क -
अर्थात, जनसंपर्क .. हे यशस्वी होण्याचं फार प्रभावी माध्यम आहे. या सगळ्या लोकांनी ज्यांनी वेगळी स्वप्न पाहिली आणि पूर्ण केली.


4. परोपकार -
या पुस्तकात अशाही उद्योजकांच्या कथा आहेत, ज्यांनी स्वतः देखील अनेक आर्थिक व परिस्थितीजन्य अडचणीतून स्वतःचं जीवन फुलवलं., पण म्हणूनच त्यांच्या मनात परोपकाराची भावना आहे. आपल्याप्रमाणे अन्य कोणीही अशा अडचणींमधून मार्ग काढत पुढे जात असेल तर त्यांना हवी ती साथ देण्यासाठी हे उद्योजक नेहमी तयार असतात.


5. काळजी -
त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांविषयी मनापासून आणि खरीखुरी काळजी आहे. आपल्या कर्मचाऱ्यांशी ते कधीच क्रूरपणे वागत नाहीत, किंबहुना स्वतः पुढे जात असताना ते आपल्या कर्मचाऱ्यांनाही आपल्यासोबत सदैव पुढे नेत जातात.


6. भाग्य -
आणि एवढं सगळं करूनही जर दुर्दैवाने अपयश आलंच तर ते खचून जात नाहीत. ते आपल्याला यश मिळावं म्हणून प्रयत्नवादी तर आहेतच परंतु आपल्या नशीबानेही आपल्याला साथ द्यावी यासाठी ते नेहमी अचूक कर्म करत रहातात.

( हे पुस्तक मिळविण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - https://salil.pro/stay-hungry-stay-foolish )


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com