रिच डॅड, पुअर डॅड मध्ये सांगितलेले आर्थिक स्वातंत्र्या चे 8 नियम !

रॉबर्ट कियोसाकी यांचे रिच डॅड, पुअर डॅड हे एक अत्यंत गाजलेले पुस्तक. यामध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी स्वतःच्याच गोष्टी द्वारे पैसे कमावणे, वाढविणे, सांभाळणे आणि आर्थिकदृष्टया स्वतंत्र होण्याचे नियम सांगितले आहेत.

भरपूर शिकून नोकरी करणारे आणि तरीही पैशांची चणचण जाणवणारे रॉबर्ट चे वडील, आणि कमी शिकलेले मात्र योग्य गुंतवणूक करून श्रीमंत झालेले रॉबर्टच्या मित्राचे वडील ! या दोघांकडून रॉबर्ट काय शिकला ते या पुस्तकात सांगितले आहे.

प्रकाशित झाल्यानंतर आज कित्येक वर्षे झाली, तरी आजही हे पुस्तक विक्रीचे नवे नवे उच्चांक गाठत आहे. कित्येक लोकांचे आयुष्य या पुस्तकाने बदलून टाकले आहे. मी पंधरा वर्षाच्या शैक्षणिक आयुष्यात जे शिकलो त्यापेक्षा जास्त फायदा हे एक पुस्तक वाचल्याने झाला आहे हे मी माझ्या अनुभावावरून तुम्हाला सांगू शकतो.

ज्यांना शक्य असेल त्यांनी पूर्ण पुस्तक अवश्य वाचा. येथे या पुस्तकाची मराठी आवृत्ती मिळविता येईल. - https://salil.pro/RDPD

आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी खाली दिलेले आठ नियम (या पुस्तकातील अत्यंत महत्वाचे 8 मुद्दे) नीट समजावून घ्या. जर हे नियम वापरले तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही.


1. तुमच्या विचारांची दिशा बदला -
'एखादी वस्तू विकत घेण्याची माझी ऐपत नाही' असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःच्या प्रगतीत अडथळा निर्माण करता, त्याऐवजी, जेव्हा तुम्ही म्हणता, ' अमुक एक वस्तू विकत घेण्यासाठी अधिक पैसे मी कसे बरं कमावू शकतो ?' तेव्हा तुमच्या मेंदूला चालना मिळते आणि तुमचा मेंदू तुमचे उत्पन्न कसे वाढेल, त्यासाठी तुम्ही काय काय करू शकता या दिशेनी विचार करू लागतो. म्हणूनच, या क्षणापासून, तुमच्या मेंदूत येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक विचाराला सकारात्मक विचारामध्ये परावर्तीत करा. एखादी गोष्ट मी करू शकणार नाही हा विचार कधीच करू नका, तर त्याऐवजी, अमुक एखादी गोष्ट मी कशी बरं करू शकेन याचा विचार करायला लागा. सरावाने तुम्ही स्वतःसाठी स्वतःच एक पोषक दृष्टीकोन विकसीत कराल हे लक्षात घ्या.
Rich dad poor dad या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कीयोसाकींनीही जीवघेण्या स्पर्धेपासून लांब कसं रहायचं हे लहानपणीच जाणलं होतं. मित्राच्या वडीलांसाठी विनामूल्य काम करताना ते त्यांच्या भीतीपासून मुक्त होणं शिकले होते तसंच मित्रासाठी आणि स्वतःसाठी अधिक पैसे कमावण्याची आकांक्षाही तेव्हाच त्यांच्या मनात रूजली होती.

2. आर्थिक साक्षर व्हा -
कीयोसाकी म्हणतात, 'बुद्धिमत्ता अडचणी सोडवते आणि धनाचे उत्पादन करते. आर्थिक बुद्धिमत्तेशिवाय मिळणारे धन हे अल्पावधीतच नष्ट होते.'
आपली शिक्षणव्यवस्था आपल्याला पैशांसाठी काम करायला शिकवते, पण पैसे कसे मिळवायचे, धनसंचय कसा करायचा आणि धनाचे व्यवस्थापन कसे करायचे हे आपल्याला शिकवले जात नाही. प्रत्यक्षात आपल्याला हे सगळं शिकवायला हवं.
आर्थिक सक्षमता आपल्याला आर्थिक स्वातंत्र्याप्रत नेते. याचसाठी महागाईकडे (inflation) लक्ष ठेवा आणि आपली आर्थिक उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य गुंतवणूक करा किंवा मालमत्ता जमा करा. Assets विकत घ्या आणि liabilities कमी करा.

3. स्वतःच्या कामावर किंबहुना स्वतःच्या कामाकडेच लक्ष केंद्रीत करा -
तुमच्या अंतिम ध्येयावर लक्ष केंद्रीत करा ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे आणि त्यासाठी त्यादृष्टीनेच काम करत रहा असं रॉबर्ट कीयोसाकी म्हणतो. म्हणूनच, सधन होण्यासाठी निरनिराळे मार्ग शोधत रहा. व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या संधी शोधत रहा. अधिकाधिक मालमत्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील रहा.. आणि जो पैसा कमावाल तो अशारितीने गुंतवा की त्यातून तुम्हाला अधिक परतावा मिळत राहील. एकंदरीत काय, तर तुमचा पैसा तुमच्यासाठी वेळेला कामी आला पाहिजे. पैशासाठी तुम्ही नाही, तर तुमच्यासाठी पैसा आहे हे लक्षात ठेवा.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
4. जोखीम पत्करा आणि आलेल्या अनुभवांतून स्मार्ट व्हा -
श्रीमंत लोक जोखीम पत्करतात कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक अशा संधी सापडतात ज्यामुळे त्यांना कोट्यधीश होता येऊ शकेल ! रॉबर्ट कीयोसाकींनी सुमारे 18000 डॉलर्सची पहिली छोटीशी गुंतवणूक केली होती जी त्यांना दरमहा 25 डॉलर्सचा देत होती. ही रक्कम जरी फार मोठी नव्हती तरीही त्यामुळेच ते स्मार्ट तर झालेच आणि भविष्यात प्रत्येक गुंतवणुकीपाठोपाठ त्यांच्यातील स्मार्टनेस वाढला. म्हणूनच गुंतवणूक करताना विचारपूर्वक जोखीम पत्करा आणि प्रत्येक अनुभवांती अधिकाधिक सधन आणि स्मार्ट व्हा.

5. कॉर्पोरेट करभरणीची पद्धत समजून घ्या -
लेखक सांगतात, कॉर्पोरेट कंपनी आधी कमावते, खर्च करते आणि मग उरलेल्या उत्पन्नावर कर भरते, परंतु सामान्य व्यक्तींना मात्र आधी त्याच्या उत्पन्नातील काही भाग कर म्हणून भरावी लागते आणि मग उरलेली रक्कम खर्च करता येते. ही व्यवस्था एकप्रकारचे शोषण करणारीच आहे मात्र हे थांबवता येऊ शकेल. हे थांबवण्यासाठी, अकांउंटींग, गुंतवणूक, शेअर बाजार आणि कायदा या चार बाबींचे सखोल ज्ञान हवे. यामुळे तुम्ही करपरताव्याचे योग्य नियोजन करू शकाल आणि कर वाचवू शकाल ज्यामुळे अंतिमतः तुम्ही तुमच्या संपत्तीची गुंतवणूक करून अधिक सधन होऊ शकाल.

6. पैसा शोधा
कीयोसाकी म्हणतो, एक शिक्षित मन हेच श्रीमंत मन असते. कारण, जेव्हा तुम्ही स्वतःला आर्थिक बाबतीत धिटाईने पुढे न्याल तेव्हाच तुमची प्रगती होईल. श्रीमंत माणसं अडचणीतूनही स्वतःचं नशीब घडवतात आणि हेच पैशालाही लागू होतं. पैसा निर्माण करावा लागतो.
आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करताना लेखक म्हणतो, बुद्धीमान लोकांच्या ज्ञानाला भांडवल समजा व त्यांना आपल्यासह कामात सहभागी करून घ्या. तुमची ज्ञानवृद्धी झाल्याने तुमची ताकद वाढते हे लक्षात घ्या.
म्हणूनच, गुंतवणुकीच्या निरनिराळ्या पर्यायांची ओळख व माहिती करून घ्या. तुमच्यासाठी स्वतंत्रपणे अभ्यास करून गुंतवणूकीचे योग्य पर्याय देणाऱ्या सेवांचा लाभ घ्या. ज्यामुळे तुम्ही आत्मनिर्भर व्हाल आणि स्वतंत्रपणे आर्थिक व्यवहार करू शकाल.

7. जीवन फुलवण्यासाठी काम करा, पैशासाठी नाही !
लेखक म्हणतो, 'लोकं श्रीमंत होण्यासाठी केवळ एकाच तांत्रिक कौशल्यावर अवलंबून असतात'.मात्र खरी जीवनकौशल्य म्हणजे परस्पर संवाद, व्यवस्थेचे वा माणसांचे व्यवस्थापन. या सर्व बाबीही पैसे कमावण्याइतक्याच किंबहुना पैसे कमावण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत आणि दुर्दैवाने त्याही शाळेत शिकवल्या जात नाहीत. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्गावर या सर्व जीवनकौशल्यांनाही तुम्ही आत्मसात केले पाहिजे. परिणामकारक संवाद आणि मनुष्यबळाचे व्यवस्थापन यामुळे तुमच्या गुंतवणूक सल्लागाराकडून योग्य आणि अर्थपूर्ण माहिती मिळवणे सहज शक्य होते हे लक्षात घ्या.

8. भावनांवर नियंत्रण ठेवा -
रॉबर्ट कीयोसाकी म्हणतो, मनुष्यप्राण्यामध्ये पाच लक्षणं सर्वसाधारणतः नेहमी आढळतात, भीती, दुसऱ्याचा उपहास करणे, आळशीपणा, वाईट सवयी आणि उद्धटपणा. मात्र, हे सर्व एखादी व्यक्ती कशा पद्धतीने वापरते त्याने खरा फरक पडतो.
आभाळ कोसळल्यागत निराश होऊ नका आणि त्याउलट अतिउत्साहाने वा अतिआशादायी होऊन खूप स्वप्नाळूही होऊ नका. त्याऐवजी, तुमचा भावनिक तोल नेमका राखण्यासाठी प्रयत्न करा आणि आर्थिक उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रीत करा. लक्षात घ्या, एखाद्या चंचल, अप्पलपोट्या आणि वेड्यासारखे विचार करणाऱ्या मनापेक्षा सुयोग्य प्रशिक्षित मन हे केव्हाही उत्तमच !

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !