तिशीनंतर महाग पडू शकतात या आर्थिक चुका, आजच स्वतःच्या आर्थिक गुंतवणुकीबाबत गंभीर व्हा - (#Friday_Funda)

आपल्याला पैशाची बचत करण्याबाबत आपल्या घरातील मोठ्यांकडून वेळोवेळी सांगितलं जात असतं, मात्र बरेचजण या गोष्टी गंभीरतेने घेत नाहीत. नोकरी वा उत्पन्नाचं साधन जोवर हातात असतं तोवर सगळं ठीक, सुरळीत सुरू असतं, पण जेव्हा हातून उत्पन्नाचं साधन जातं, त्यानंतर मात्र सर्व परिस्थिती अवघड होऊन बसते याचं कारण आपण भविष्याच्या दृष्टीने आर्थिक नियोजन केलेलंच नसतं. वयाच्या तिशीनंतर असा बेजबाबदारपणा कोणालाही फार महागात पडू शकतो. खाली काही अशाच आर्थिक नियोजनाबाबतच्या चुका सांगत आहोत, या चुका करणं तुम्हाला परवडणार नाही, त्यामुळे या चुका कधीच करू नका -

1. एसआयपीमध्ये गुंतवणुक न करणं -

तुम्ही ऐकलंच असेल, थेंबे थेंबे तळे साचे.. ही उक्ती आर्थिक बचतीबाबत तंतोतंत लागू होते. सिस्टमॅटीक इनव्हेस्टमेंट प्लॅनबाबत जर तुम्हाला माहिती नसेल, तर ती पूर्ण माहिती करून त्यात गुंतवणूक करा. या प्रकारामध्ये दरमहा एक ठराविक रक्कम तुमच्या खात्यातून तुम्ही गुंतवू शकता. समजा, तुम्ही 2000 रुपयांची गुंतवणूक एसआयपीमध्ये करायचं ठरवलं तर दरमहा तुमच्या खात्यातून 2000 रुपये एसआयपीच्या खात्यात वळवले जातील.

2008 आणि 2009च्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स 8000 - 9000 च्या पातळीवर घसरला होता. तो आता 26000 पेक्षा जास्त झाला आहे. कल्पना करा जर तुम्ही चांगल्या इक्विटी फंड योजनेच्या एसआयपीमध्ये गुंतवणुक केली असती तर तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला आजवर किती परतावा मिळाला असता..

2. पुरेसा हेल्थ इन्शुरन्स नसणे -

उत्तम आरोग्यासाठी जशी गुंतवणूक करता तशीच उत्तम हेल्थ इन्शुरन्समध्येही गुंतवणूक केली पाहिजे. याचं कारण, आरोग्य कितीही चांगलं असलं तरीही दुखणी वा इजा आपल्याला सांगून होत नाही.. अर्थात, केव्हाही आरोग्य बिघडलं, गंभीर आजार झाला, अपघात झाला तर तुमच्याजवळ अशा वेळेसाठी आर्थिक तजवीज केलेली पाहिजे.

3. टर्म इन्शुरन्समध्ये गुंतवणूक न करणं..

तुमच्या कुटुंबासाठी पैसे कमावणारे तुम्हीच एकमेव साल तर सर्वात पहिलं काम करा ते म्हणजे टर्म इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करा. यामुळे तुमच्या कुटुंबाला वेळोवेळी आर्थिक परतावा मिळेल व तुमच्या कुटुंबाचं जीवनमान सुधारू शकेल. जर तुमचं अचानक निधन झालं तर अशा कठीण परिस्थितीतही तुमच्या मागे तुमच्या कुटुंबाला आर्थिक घडी नीट बसवता येणे या गुंतवणूकीमुळे सोपे होईल. प्रिमीयम भरून तुम्हाला ही गुंतवणूक करता येईल.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

4. तारूण्यापासूनच गुंतवणुकीबाबत गंभीर नसणं -

ही एक फार मोठी चूक तुमच्याकडून होऊ शकते व त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतो हे लक्षात घ्या. असं म्हणतात, चांगल्या कामाला कधीच उशीर झालेला नसतो. त्यामुळे, गुंतवणुकीबाबत तुम्ही जर आजवर गंभीर नसाल तर आज या क्षणापासून स्वतःला बदला व तुमच्याजवळचा पैसा गुंतवायला सुरुवात करा. गुंतवणुकीचा एकच नियम आहे, जितकी लवकर सुरु कराल, तितके त्याचे बेनिफीट्स दीर्घकाळपर्यंत व उत्तम मिळतील.

5. गरजेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका -

कर्ज घेताना विचारपूर्वक घ्या. तुम्हाला जितक्या रकमेची गरज आहे, तेवढेच कर्ज घ्या. गरजेपेक्षा अधिक कर्ज कधीच घेऊ नका. तसंच, तुम्ही जितकं परत करू शकाल तितकंच कर्ज घ्या. कारण, जर तुम्ही वेळेवर इन्स्टॉलमेंट भरू शकला नाहीत तर तुमच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच जाईल आणि तुम्ही डीफॉल्टर झालात तर भविष्यात कधीही तुम्ही कर्ज घेऊ शकणार नाही. म्हणजेच तुमच्या एका चुकीमुळे तुम्ही तुमचा वर्तमान व भविष्य दोन्हीही स्वतःच्या हाताने खराब करून घ्याल.

मित्रांनो,

वयाच्या तिशीनंतरही जर तुम्ही या आर्थिक चुका सुधारल्या नाहीत तर तुमचं भविष्य कसं असेल याची कल्पना तुम्ही स्वतःच करू शकता .. त्यामुळे जागे व्हा आणि गुंतवणुकीला गांभीर्याने घ्यायला शिका.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com