परदेशात विद्यार्थ्यांसाठी निवास शोधण्यासाठी ही आहे परफेक्ट वेबसाईट .. (#Web_wednesday)

तुम्ही जर विद्यार्थी असाल आणि परदेशात भाड्याने घर शोधत असाल तर तुमच्यासाठी घरबसल्या जागा शोधण्यापासून ते जागा निश्चित करण्यापर्यंतची मदत करणारी स्टूडंट्स डॉट कॉम (https://www.student.com/) ही वेबसाईट आहे.

या वेबसाईटची सुरुवात 2011 साली झाली. यूकेत जन्मलेल्या आणि शांघायमध्ये वसलेल्या ल्यूक नोलान यांच्या कल्पनेतून ही कंपनी सुरू झाली. स्टूडंट्स डॉट कॉमया वेबसाईटच्या माध्यमातून जगभरातील विद्यार्थ्यांना परदेशात घरं शोधण्यासाठी आणि मुख्य म्हणजे सुरक्षित निवासस्थान घरबसल्या शोधण्यासाठी ही वेबसाईट मदत करते.

2011 पासून सुरू झालेल्या या कंपनीत तब्बल 200 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत तर कंपनीची कार्यालये शांघाय, लंडन, न्यूयॉर्क आणि हाँगकाँग येथे आहेत. 2015 च्या आकडेवारीनुसार या वेबसाईटने तब्बल 110 मिलीअन डॉलर्सचा व्यवसाय केल्याचे कळते. याच वर्षी कंपनीने जगभरातील सुमारे 100 हून अधिक विद्यार्थ्यांना तब्बल 420 हून अधिक शहरांमध्ये निवासस्थान मिळवून दिल्याची नोंद फोर्ब्सने घेतली आहे. या वेबसाईटवर सर्वाधिक विद्यार्थी चीनमधले असले तरीही आता भारत, साऊथ कोरीया, नायजेरिया येथूनही विद्यार्थी या वेबसाईटचा वापर करू लागले आहेत.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

ही वेबसाईट अशा पद्धतीने काम करते..

या वेबसाईटवर तुम्ही ज्या परदेशातील शहरामध्ये जागा शोधताय त्या शहराचं नाव टाकून किंवा तुमच्या विद्यापीठाचं नाव टाकून सर्च करू शकता. यामध्ये सर्व देश, सर्व शहरं वा सर्वच विद्यापिठं समाविष्ट झालेली नसली तरीही असंख्य नामांकित विद्यापीठं, नामांकित शहरं मात्र या वेबसाईटशी जोडली गेलेली आहेत. लंडन, डब्लीन, पॅरीस, न्यूयॉर्क, नॉटींगहॅम, बार्सीलोना, बर्मिंगहँम, मँचेस्टर यांसारख्या अनेक प्रसिद्ध व मुख्यत्त्वे जेथे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात अशा शहरांमधील निवासस्थानं या वेबसाईटवर तुम्हाला सापडू शकतील.

या वेबसाईटवर तीन प्रकारच्या जागेचे विद्यार्थ्यांसाठी पर्याय देण्यात आलेले आहेत. शेअर्ड रूम, प्रायव्हेट रूम आणि एंटायर प्लेस हे तीन ऑप्शन्स यामध्ये आहेत. यांच्या नावावरूनच यामध्ये नेमक्या कशा जागा उपलब्ध असतील याचा अंदाज तुम्हाला येईल. तुम्ही तुमच्यायोग्य पर्याय निवडायचा. त्यानंतर सर्च केल्यावर तुम्हाला त्यानुरूप जागा व त्या जागेचे फोटोज दिसू लागतील. त्यापैकी तुम्हाला आवडलेल्या जागेची निवड करायची आणि काँट्रॅक्ट योग्य वाटल्यास, तुम्हाला पटल्यास तुम्ही त्यानुसार काँट्रॅक्ट साईन करून जागेचं भाडं भरायचं की झाली तुमची खोली बुक.. !

मात्र, कंपनीने आपली विश्वासार्हता जपण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपल्या वेबसाईटवरच कँसलेशन पॉलीसीही स्पष्ट दिलेली आहे. त्यामुळे कोणताही व्यवहार होताना फसवणूक होण्याची शक्यता अत्यल्प असेल हे विशेष. त्याचबरोबर तुम्ही जी जागा बुक केली असेल त्या जागेची प्रत्यक्षात पहाणीही तुम्ही या वेबसाईटच्या टीमबरोबर जाऊन करू शकता. प्रत्येक प्रॉपर्टीचे फोटोज, तिथे नेमक्या कोणत्या सोयीसुविधा आहेत, तिथले नियम काय आहेत, तिथे सुरक्षेच्या दृष्टीने काय केलेलं आहे, आणि स्टूडंट्स डॉट कॉमच्या कँसलेशन पॉलिसीबरोबरच त्या जागेच्या मालकाचीही काही कँसलेशन पॉलिसी असेल तर त्याबाबतची सर्व आणि संपूर्ण माहिती त्या त्या जागेच्या डीटेल्समध्ये स्पष्ट देण्यात आलेली दिसते.

सध्या भारतातील एकही शहर या वेबसाईटच्या यादीत दिसत नाही, मात्र भविष्यात ही कंपनी भारतातही व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे असे कंपनीच्या संस्थापकांनी फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेले आहे.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com