कंपनीत विश्वासार्हतेचे वातावरण तयार करण्यासाठी हे मुद्दे लक्षात ठेवा - (#Biz_Thirsday)

गेल्या आठवड्यात आपण पाहिले की एखाद्या व्यवसायाची भरभराट होण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांमध्ये व मालकांमध्ये विश्वासार्हतेचे नाते असणे किती महत्त्वाचे आहे, या भागात पाहूयात की हे विश्वासार्हतेचे नाते जपण्यासाठी नेमकं काय करायला हवं..

अनेक छोट्या छोट्या बाबी, ज्या वरवर पहाता अगदी किरकोळ वाटतात, मात्र प्रत्यक्षात त्यांच्यामुळे मोठा फरक पडतो अशा बाबी विचारात घेऊयात.

1. कार्यपद्धतीचा आढावा घ्या..

जेव्हा कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखवते आणि ठरवते की कोणत्या प्रोजेक्ट्सवर कोणी काम करायचं, तेव्हा कर्मचाऱ्याचं लक्ष्य त्याकडे वेधलं जातं ज्याबाबत त्यांना अधिक चिंता वाटते. परिणामी, मॉर्निंग स्टार कंपनीसारख्या कंपनीज्, जेथे अत्यंत उत्पादनक्षम कर्मचारी कार्यरत आहेत, अशा कंपनीतील कर्मचारी कंपनीशी वर्षानुवर्षे जोडले रहातात. मॉर्निंग स्टार ही कंपनी जगातील सर्वात मोठी टोमॅटो उत्पादन करणारी कंपनी आहे. येथे, कर्मचाऱ्यांना जॉब टायटल्ससुद्धा देण्यात आलेले नाहीत, कर्मचारी स्वतःच त्यांचे कामाचे गट ठरवतात व काम करतात.

गेमिंग सॉफ्टवेअर कंपनी व्हेल्व्हमध्ये कर्मचाऱ्यांना चाकं असलेले डेस्क्स दिलेले आहेत तसंच, त्यांना अशा प्रॉजेक्ट्समध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं जे त्यांना अधिक इंटरेस्टींग आणि रिवार्डींग वाटतात. जेव्हा कर्मचारी नव्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होतात तेव्हा त्यांना स्पष्ट अपेक्षा सांगितल्या जातात आणि जेव्हा प्रोजेक्ट पूर्ण होतात तेव्हा 360 अंशातून परिपूर्ण असे मूल्यांकन केले जाते.

2. सहकाऱ्यांची मदत घेण्यात कमीपणा वाटू देऊ नका -

तुम्ही कंपनीत मालक असा वा कर्मचारी असा, तुम्ही जर ऑफीशिअल कामासाठी तेथील तुमच्या सहकाऱ्यांची मदत घेतलीत, ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत त्याबाबत मोकळेपणाने तुमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करत गेलात तर निश्चितच त्याचा खूप फायदा होतो व कंपनीत एकमेकांप्रती विश्वासार्ह वातावरण निर्माण होते. इतरांची मदत करायला आवडणे आणि मानवी स्वभावगुणविशेष आहे. त्याचा उपयोग कंपनीतील सहकाऱ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो.

3. सहकाऱ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे लक्ष द्या -

तुमचे सहकारी, कर्मचारी हे केवळ कामापुरतेच तुमच्याशी जोडले गेलेले आहेत असे नाही तर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील मौल्यवान वेळ तुम्हाला दिलेला आहे याची जाणीव ठेवा. या जाणीवेतूनच तुम्हाला हे लक्षात येईल की केवळ काम पूर्ण करून घेणे हा उद्देश समोर ठेवल्यास कंपनीतील कर्मचारी कधीच कंपनीशी मनापासून जोडले जाणार नाहीत. मात्र, अशी कंपनी जेथे कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण विकासासाठी प्रयत्न केले जातात अशा कंपनीत कर्मचारी अधिक योगदान देतात. म्हणून, तुमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या, सहकाऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी हातभार लावा,त्यासाठी निरनिराळे उपक्रम घ्या.

याबाबत एक्सेंच्युअर आणि अडॉब सिस्टम या दोन कंपन्यांचे उदाहरण मोलाचे ठरेल. येथील मॅनेजर वेळोवेळी आपल्या कर्मचाऱ्यांना एक प्रश्न विचारत असतात, "मी तुला तुझा इथून पुढचा जॉब मिळण्यासाठी मदत करतो आहे ना?" या प्रश्नाचा गर्भितार्थ असा की कर्मचारी आपल्या कंपनीतून काहीतरी चांगलं शिकत आहे की नाही आणि ते त्याला शिकता यावं यासाठी मॅनेजर म्हणून ते स्वतः किती प्रभावी आहेत या दोन्हीचे मूल्यमापन यामुळे सहजी होते. संपूर्ण व्यक्तीमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा कंपनीला फायदा होतो आणि कर्मचारी कायम त्या कंपनीशी एकनिष्ठ रहातात, तसंच दीर्घकाळपर्यंत टिकून रहातात.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

4. सहेतूक उत्तम नाती तयार करा -

अनेक कंपन्यांचे असे म्हणणे असते, की तुम्ही येथे काम करायला येता, मैत्री करायला नाही.. आणि या कडक धोरणाने तेथील वातावरण हे नेहमी काहीसे गंभीर आणि नीरस झालेले असते. न्यूरोसायन्स सांगते की, मानवी मेंदूत ऑक्सिटॉसीन नावाच्या रसायनामुळे मानवाला विश्वासार्हता आणि सामाजिक ओळख या दोन्हीची फार तीव्र गरज असते. म्हणूनच, जेव्हा लोक आपल्या कामाच्या ठिकाणी जेव्हा सहेतुक चांगली नाती जोपासतात तेव्हा त्यांच्या कामगिरीत झपाट्याने प्रगती होताना दिसते. तसंच, जेथील मॅनेजर्स आपल्या टीममेंबर्सप्रती काळजी व सहवेदना दर्शवतात तसंच त्यांच्या प्रगती आणि यशासाठी झटतात तेथील कर्मचारी कंपनीच्या कामासाठी दर्जात्मक आणि गुणात्मक वाढ होण्यासाठी जीवाचं रान करतात.

आणखीही काही मुद्दे आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात पुढल्या गुरूवारी ..

( या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा - https://learn.netbhet.com/blog/Build-Trust-Culture-at-your-workplace-buz-thirsday )

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com