'या जीवनाचं काय करायचं ?' या प्रश्नाच्या उत्तरासाठी वाचा हे पुस्तक .. (#Saturday_bookclub)

'या जीवनाचा अर्थ काय ?', 'या जीवनाचं नेमकं काय करायचं ?', 'आपल्याला या जीवनात काय करायचंय?' हे प्रश्न अनेकदा जवळपास प्रत्येक व्यक्तीला पडतात.. याच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, लेखक व्हिक्टर फ्रँकल यांनी आपल्या मॅन्स सर्च फॉर मीनींग (Man's search for meaning) या पुस्तकात..!

लेखक व्हिक्टर फ्रॅंकल यांना दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी हिटलरने छळछावणीत टाकले. अत्यंत बिकट परिस्थितीतील या दिवसांमध्ये लेखक व्हिक्टर तेथे कुटुंबापासून दूर एकाकीच होते.या दिवसात खरंतर लेखक आपल्या भवताली असलेल्या अन्य कैद्यांच्या जीवनापासून खूप काही शिकले, तसंच जीवनाचा काय अर्थ आहे या एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी शोधायला सुरुवात केली ती तिथूनच..

अनेकांना वाटत असेल की जीवनाचं काय करायचं वगैरे प्रश्नांची उत्तर शोधून काय फायदा .. कशाला एवढे मोठे विचार करायचे मात्र याचसाठी 'Giveup-itis' नावाची संकल्पना लेखकाने पुस्तकात स्पष्ट केलेली आहे.

'Giveup-itis' -

हिटलरच्या छळछावणीत असताना इतर कैद्यांकडे पाहूनच त्यापैकी कोणता कैदी आता लवकरच मरणार आहे हे इतर कैद्यांना मनोमनीच कळू लागत असे. याचं कारण, ज्या कैद्याचं मरण जवळ आलेलं असे तो आपोआपच इतरांपेक्षा आजारी, हतबल, अधिक चिंताक्रांत आणि उदास असा दिसू लागत असे, इतकंच नव्हे तर त्याच्या तोंडी भाषाही हतबलतेची, नैराश्यपूर्ण अशी यायला लागत असे. अशा कैद्यांसाठी स्वतःच्या जीवनाचा अर्थ शोधणं हे एक असाध्य कोडंच होतं जणू ! आणि हीच गोष्ट लेखकाच्या लक्षात आली. एकदा का तुम्हाला तुमचं जीवन जगण्याचं कारण समजलं तर तुम्ही हजारो संकटही छातीवर झेलायला सज्ज असता, पण जर तुमच्याकडे या why चं उत्तर नसेल तर मग तुम्हाला how हा प्रश्नच पडत नाही. आणि म्हणून तुमचं जीवन निरर्थक होत जातं आणि सरतेशेवटी अशा निरर्थक जीवनामुळेच तुमचं मन निराश होत जातं.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

लेखकाने सर्वात महत्त्वाची गोष्ट या पुस्तकात सांगितली आहे ती अशी, की या जीवनाला स्वतः काहीच अर्थ नसतो, तर तो अर्थ देण्याचं कामंच तुम्हाला करायचं असतं.. जीवनाचा अर्थ काय आहे हे आपल्याला स्वतःलाच ठरवायचं असतं.

व्हिक्टर फ्रँकल सांगतात, आपण कोणत्याही सिच्युएशनमध्ये असलो तरीही आपण एकच गोष्ट कायम नियंत्रणात ठेऊ शकतो ती म्हणजे आपला एटीट्यूड.. अनेक लोक खरंतर खूप चांगलं जीवन जगत असतात पण ते नेहमीच उदास, दुःखी असतात आणि दुसरीकडे लेखकासारखे सकारात्मक लोक .. जे छळछावणीत असूनही सुखी रहाण्याचा सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न करत असतात.

मग आता प्रश्न एकच उरतो तो म्हणजे आयुष्याला अर्थ देण्याचं काम कसं करायचं..हा अर्थ कसा द्यायचा आणि मुळात तो आपापला अर्थ कसा शोधायचा ?

हा अर्थ शोधण्यासाठी या तीन गोष्टी लेखक सांगतात -

1. काम

तुमच्याकडे जेव्हा तुमचं काम असेल तेव्हा त्या कामातून तुम्ही तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकता. जेव्हा तुमच्याकडे तुमचं काम असतं तेव्हा तुमचं जीवन तुम्हाला अर्थपूर्ण वाटतं आणि तुम्ही आपोआपच अधिक उत्साहाने जीवन जगायला लागता.

2. प्रेम -

स्वार्थी प्रेम तर सगळीकडेच असतं. पण जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ मिळवायचा असेल तर तुम्ही दुसऱ्याला प्रेम द्यायला लागा. देण्यातलं प्रेम जेव्हा अनुभवाल तेव्हा तुम्हाला तुमचं जीवन अर्थपूर्ण वाटायला लागतं.

3. भोग (त्रास, छळ) -

लेखक सांगतात, ज्या क्षणी तुम्ही तुमच्या जीवनातील त्रासाला अर्थ देता त्या क्षणापासून तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. तुमच्या जीवनात तुम्ही जे भोग भोगले ते इतरांना सांगून त्यांना त्यातून संदेश दिला की तुमच्या जीवनाचा अर्थ तुम्हाला सापडतो.

एकूणातच हे पुस्तक आपल्याला सांगते की -

- जीवनाला स्वतःहून अर्थ नसतो

- हा अर्थ देण्याचं काम, आणि मुळात हा अर्थ आधी शोधण्याचं काम आपल्याला करायचं असतं.

- आणि जीवनाला अर्थ देण्याचं काम करण्यासाठी कार्य, प्रेम, आणि भोग हे तीन मार्ग आहेत. यातून तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ सापडेल.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com