आजचा दिवस महत्त्वाचा .. सांगतं पुस्तक Today Matters (#Saturday_Bookclub)

आपण काल घडून गेलेल्या दिवसाला अतिमहत्त्व देतो, येणाऱ्या उद्याबद्दल अतिचिंता करत रहातो आणि पर्यायाने जो आजचा दिवस आपल्यासमोर असतो, त्या आजला मात्र कमी लेखतो .. त्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही आज जसं जगताय त्यातून तुमचा उद्या घडणार आहे हे लक्षात ठेवा, हा मंत्र देणारं पुस्तक म्हणजे Today Matters

जॉन सी. मॅक्सवेल यांनी लिहिलेल्या टुडे मॅटर्स हे पुस्तक, दैनंदिन जीवनातील शिस्तीचे महत्त्व या एका गंभीर विषयाकडे आपलं लक्ष्य वेधतं. या शिस्तीचंही वर्गीकरण लेखकाने 12 कॅटेगरींमध्ये केलेलं आहे. एटीट्यूड, प्राधान्यक्रम, आरोग्य, कुटुंब, विचार, वचनं (कमिटमेंट्स), अर्थ, विश्वास, नातेसंबंध, औदार्य, नीतीमूल्य आणि विकास या विभागांमध्ये हे वर्गीकरण करून लेखकाने आपल्याला आपला आजचा दिवस किती महत्त्वाचा असतो, व त्याकडे आपण किती गांभीर्याने पाहिलं पाहिजे हे सविस्तर पटवून दिलेलं आहे. तसंच, या सर्व सवयींबद्दल माणसाने नेमकं कशाप्रकारे विचार करून स्वतःला घडवलं पाहिजे हे देखील लेखकाने सांगितलं आहे.

1. Attitude - तुमचा एटीट्यूड कसा असावा हे दररोज ठरवा, आणि दररोज तुमचा योग्य एटीट्यूड तुमच्या वर्तनातून, देहबोलीतून आणि विचारातून झळकेल यासाठी प्रयत्नशील रहा.

2. प्राधान्यक्रम - तुमचा प्राधान्यक्रम ठरवा व दररोज त्यानुरूप कामं पूर्ण करा.

3. आरोग्य - आरोग्याविषयी जागरूक रहा आणि दररोज आरोग्याच्या उत्तम सवयींची कास धरा.

4. कुटुंब - तुमच्या कुटुंबाला दररोज हे जाणवू द्या की तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, आणि तुम्ही त्यांची किती काळजी करता.

5. विचार - आपल्या मनाला चांगला विचार करण्याची सवयच लावा आणि दररोज चांगला विचार करा.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

6. वचनपूर्ती - तुम्ही दिलेला शब्द पाळा, दररोज आपला शब्द पाळण्यासाठी मेहनत करा.

7. अर्थ - तुमच्या पैशाचं दररोज योग्य व्यवस्थापन करा.

8. विश्वास - दर दिवशी तुमचा विश्वास प्रदीर्घ करत रहा आणि तुमच्या विश्वासावर तुमचं जीवन घडवा.

9. नातेसंबंध - दररोज उत्तम नाती जोपासा आणि त्या नात्यांना घडवण्यासाठी त्यात गुंतवणूक करा .. कशाची तर प्रेमाची, विश्वासाची, वेळेची, सहकार्याची ..

10. औदार्य - औदार्य दाखवण्यासाठी दररोज संधी शोधा, औदार्य कुठे दाखवता येईल त्याचं नियोजन करा.

11. नीतीमूल्य - तुमच्या चांगल्या नीतीमूल्यांची जपणूक करत रहा, दररोज त्या नीतीमूल्यांसह जगण्याचा सराव करत रहा.

12. विकास - तुमचा विकास कसा व कोणकोणत्या बाबतीत करता येऊ शकेल याच्या संधी शोधा आणि दररोज स्वतःला घडवण्याचा अनुभव घेत रहा.

या पुस्तकातील प्रत्येक विभागात वरील घटकांचं सविस्तर विवेचन केलेलं आहे, जे वाचून तुम्ही स्वतः यावर विचार करावा आणि स्वतःच्या दैनंदिन जीवनाकडे निराळ्या दृष्टीकोनातून बघत तुमचं जीवन उभारावं हे या पुस्तकाचं उद्दीष्ट आहे. त्याचबरोबर पुस्तकात अनेक प्रेरणादायक गोष्टी आणि रंजक सत्य दिलेली आहेत, ज्यामुळे पुस्तक अधिक परिणामकारक तर होतंच तसंच रसपूर्णही होतं. मुख्य म्हणजे या सगळ्याची सांगड वास्तवाशी घातलेली आहे.

जर तुमचं तुमच्या दैनंदिन जीवनाबद्दल निश्चित असं कोणतंच स्वरूप ठरलेलं नसेल तर मग तुम्ही वर दिलेल्या कोणत्याही मूल्यांनी सुरुवात करू शकता.

लक्षात ठेवा,

जेव्हा तुम्ही तुमचा आज सर्वोत्तम घडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न कराल तेव्हा तुमचं जीवनही सर्वोत्तमच घडेल, कारण, जर तुम्ही तुमच्या वर्तमानाची काळजी घेतलीत तर तुमचा भविष्यकाळ स्वतःच स्वतःची काळजी घेईल..

हे पुस्तक मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - https://salil.pro/todaymatters

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com