तुमचा मित्र हा तुमचा फायनान्शिअल अडव्हायझर तेव्हाच असू शकतो जेव्हा त्याच्याकडे ते ज्ञान असेल .. (#Finance_tuesday)

एकदा एका आर्थिक सल्लागाराकडे दोन मित्र गेले. त्या दोघांनाही आपल्या गुंतवणुकीबाबत आणि आर्थिक निर्णयांबाबतच्या आजवरच्या आपल्या कामगिरीविषयी या आर्थिक सल्लागारांशी बोलायचं होतं.

दोघंजणं त्यांच्या पुढ्यात बसले नि बोलण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना कळलं, की यांच्यातील एकाने इक्विटी, म्युच्युअल फंड्स आणि डायरेक्ट स्टॉक्समध्ये गुंतवणुक करून ठेवलेली आहे. एवढी गुंतवणुक करण्यासाठी तुम्ही कोणाचा सल्ला घेतलात असा प्रश्न अर्थातच त्या आर्थिक सल्लागारांनी त्याला विचारताच तो उत्तरला, सर, हा माझा मित्र आहे नं, त्यानेच मला सांगितले. मी त्याच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करतो. या उत्तरानंतर आर्थिक सल्लागारांनी त्या दुसऱ्या मित्राची चौकशी केली. त्यांनी त्याला त्याच्या शिक्षणाविषयी आणि आर्थिक बाबतीतील त्याच्या अभ्यासाविषयी विचारले, तेव्हा त्यांना मध्येच अडवत त्या पहिल्या मित्राने सांगितले, अहो सर, हा तर सेल्स बॅकग्राऊंडचा आहे. पण याने स्वतः म्युच्युअल फंड्समध्ये आणि स्टॉक्समध्ये भरपूर गुंतवणुक केलीये. याची इतकी गुंतवणुक आहे, म्हणूनच मला वाटतं की हा माझ्यापेक्षा जास्त नॉलेजेबल आहे आणि म्हणूनच मी हा जे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि गुंतवणूक करत जातो.

आता या उत्तरानंतर तर आर्थिक सल्लागाराला अक्षरशः कपाळावर हात मारण्याची वेळ आली. कारण, ज्याला काहीच कळत नाही अशा व्यक्तिवरही असे भाबडे लोक सहज विश्वास ठेवतात आणि पैशाबाबतचे अयोग्य निर्णय घेऊन स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करतात हेच त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर धडधडीत दिसत होते.

थोड्या दिवसांनी त्या मित्राने यांना फोन केला आणि सांगू लागला, की त्याच्या पोर्टफोलिओमध्ये भरपूर इक्विटी फंड्स आणि स्टॉक्स आता आहेत. तेव्हा पुन्हा त्या सल्लागारांनी त्याला विचारलं, अरे पण तू कशाच्या भरवशावर ही गुंतवणुक करतो आहेस .. तेव्हा तो उत्तरला, सर मी एका स्टॉक रेकमेंड करणाऱ्या ग्रुपला सबस्क्राईब केलंय आणि मी त्यांचा ग्रुपही जॉईन केलाय. त्यात जे जे रेकमेंडेशन्स ते देतात मी ते ते स्टॉक खरेदी करतो.. आता हे ऐकून तर ते सल्लागार प्रचंड अस्वस्थ झाले.. आणि त्यांनी या दोन्ही मित्रांची चांगलीच कानउघडणी केली. त्यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हीही लक्षात ठेवा आणि आचरणात आणा.

- तुमचं अर्थजीवन हे युनिक असतं. म्हणजे प्रत्येकाचं आर्थिक जीवन हे स्वतंत्र असतं. तुमच्या गरजांनुसार तुमच्या उत्पन्नाचं नियोजन करण्यासाठी केवळ तुम्ही स्वतःच सर्वाधिक योग्य व्यक्ती असता, कायमच.. हे लक्षात ठेवा.

- काही लाखांचं नुकसान हे कदाचित तुमच्या मित्रासाठी काहीच नसेल पण तुमच्यासाठी मात्र कदाचित काही हजारांचं नुकसानही खूप मोठं ठरू शकेल. कारण, हे पूर्णपणे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतं.

- तुमची वाढ कशाप्रकारे झालेली आहे आणि आर्थिक बाबतीत तुम्ही रिस्क कशी मॅनेज करता हे दोन्हीही मुद्दे पूर्णतः स्वतंत्र आहेत.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

- केवळ तुमचा मित्र वा मैत्रिणी वा कोणीही ओळखीची व्यक्ति एखाद्या ठिकाणी वा एखाद्या उत्पादनात गुंतवणूक करीत आहे याचा अर्थ ती त्यातली तज्ज्ञ आहे असा अजिबातच नसतो. बहुसंख्य गुंतवणूकदार मात्र इथेच चूक करतात, आपल्या ओळखीच्याने जिथे पैसे गुंतवले, तिथेच तेही पैसे गुंतवतात आणि बरेचदा नंतर फसगत होते.

- तुमचे मित्र, शेजारी, नातेवाईक, ओळखीचे यांपैकी कोणीही तुमचे फायनान्शिअल प्लॅनर्स नसतात, किंबहुना तुम्ही जर आंधळेपणाने त्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन गुंतवणूक करत गेलात तर तुम्ही कधी ना कधी गोत्यात येऊ शकता हे लक्षात ठेवा.

- तुमच्या मित्राला कदाचित एखाद्या गुंतवणुकीतून 20 - 30 टक्के नफा होत असेल, पण जरूरी नाहीये की तुम्हालाही तितकाच नफा त्याच गुंतवणुकीतून होईल. किंबहुना त्या मित्रालाही पुन्हा जेव्हा तो तीच गुंतवणूक करेल तेव्हा तितका नफा मिळेलच याची शाश्वती नसते.

- तुम्ही स्वतः वाचा, भरपूर वाचन करा, समजून घ्या, अभ्यास करा आणि त्यानंतरच कोणत्याही गुंतवणुकीत पैसे गुंतवा. आणि जर वाचूनही काही कळत नसेल तर अशा गुंतवणुकीत पैसे लावण्यापेक्षा सरळ बँकांच्या एफडीमध्ये तुमचे पैसे ठेऊन द्या.. किमान तिथे तरी ते सुरक्षित रहातील.. पण पैशांच्या बाबतीत कोणावरही अंधविश्वास ठेऊ नका.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com