करिअरच्या मधल्या टप्प्यावर एकसुरीपणा टाळण्यासाठी वापरा हे 6 सोपे मार्ग (#Career_Wednesday)

मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करायला मिळणं हे अनेकांचं स्वप्न असतं. आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण अगदी शालेय जीवनापासून झटत असतो. अनेकांना शिक्षण पूर्ण करताच चांगल्या कंपन्यांकडून नोकरीच्या संधी मिळतात. फ्रेशर्स असताना मोठ्या उत्साहाने नोकरी सुरु केलेले अनेकजण दिवसरात्र एक करत नोकरीतील आपलं काम आणि जबाबदाऱ्या पूर्ण करत असतात. त्यामुळेच त्यांना त्यांच्या करिअरचा एक विशिष्ट टप्पा कधी आणि कसा पार पडला हे कळतसुद्धा नाही. मग जेव्हा नोकरीतील रोज रोज तेच ते काम करून मन आणि शरीर कंटाळून जायला लागतं तेव्हा अनेकांना वाटायला लागतं, खरंच, किती दिवस आपण हे असं काम करत रहायचं, आपल्या जीवनातील आपली स्वप्न पूर्ण होतील की नाही, आपल्याला आपल्या जीवनाचा खरा अर्थ कधी सापडेल.. अशा अनेक प्रश्नांनी मन खिन्न व्हायला लागतं आणि अशावेळी लक्षात येतं, की आपला मिडलाईफ करिअर क्रायसेस सुरु झालेला आहे. आजच्याही घडीला अनेक प्रोफेशनल्स या फेजमधून जात असतील पण त्याबद्दल ते कोणीच बोलत नाहीत, कारण हाती असलेली नोकरी जायची भीती. तसंच, या टप्प्यावर मनात ज्या भावना येतात, त्यापेक्षाही हातात काम असण्याला आणि अर्थार्जनाला आपल्याकडे प्राधान्य दिलं जातं. पण म्हणूनच, हा क्रायसिस कसा हाताळायचा याचे हे सहा सोपे मार्ग ...

1. आत्मपरिक्षण -

करिअरच्या एका विशिष्ट टप्प्यावर आल्यावर जर तुम्हाला आता त्या कामात काहीच रस वाटत नसेल तर एकदा नीट आत्मपरिक्षण करा. तुमची स्वप्न, तुमच्या इच्छा, अपेक्षा आणि तुम्ही सध्या करत असलेलं काम यांचा कुठे ताळमेळ बसतोय का याचा विचार नीट काळजीपूर्वक करा. अचानक तुमच्या कामाप्रती तुम्हाला जी उदासिनता आली आहे त्याचीही कारणं शोधा. एका कागदावर ती नीट लिहून काढा आणि मग तुम्हाला तुम्ही जे काम करताय तिथून नेमकं काय मिळतंय आणि तुम्ही ते काम का करत आहात या प्रश्नांची उत्तरं शोधा.

2. स्वतःतील उमेद आणि उत्साह पुन्हा आणा -

नोकरीतील सुरुवातीचे दिवस आठवा, जेव्हा तुम्ही खूप उत्साहाने नोकरीतील कोणतंही काम करायचात. तुमच्यावर तुमचे बॉस जी जबाबदारी देतील ती पेलण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी तुम्ही जिवाचं रान करायचात ते दिवस आठवा. तुमचे सहकारी, तुमचं आणि त्यांचं बाँडींग, त्यांनी तुमची घेतलेली काळजी हे सारं आठवा, त्यामुळे तुमच्यातील उमेद आणि उत्साह काही प्रमाणात परत येईल. किंवा, कामातून जरासा ब्रेक घ्या. काही दिवसांची सुट्टी काढा आणि चक्क मस्त फिरायला जाऊन या. यामुळे तुमचं मन आणि शरीर रिफ्रेश होईल आणि पुन्हा द्विगुणित उत्साहाने तुम्ही परतून कामाला लागाल.

3. तुमच्या कामाला अर्थ द्या -

तुम्ही जरी रोज रोज तेच काम करत असलात, तरीही अल्टीमेटली तुमच्या कामाचा कोणाला उपयोग होतो, कसा होतो, तुमचं काम किती जबाबदारीचं आहे, त्यामुळे किती लोकांच्या जीवनात बदल घडतोय हा विचार करा आणि स्वतःच्या कामाला अर्थ द्या... बघा, तुम्हाला तुमच्या कामातला एकसुरीपणा एकदम निघून गेल्याचं लक्षात येईल.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

4. लहान लहान उद्दीष्ट ठरवा -

नोकरी करताना बरेचवेळा आपण खूप काम करतो, खूप जबाबदारी पेलतो, पण बरेचदा आपण ही सगळी कामं नीट नियोजन न करताच करत असतो, म्हणजे जे समोर येईल, जे आपल्याला सांगितलं जाईल ते काम आपण करायला सज्ज असतो.. याच्यामुळेच नंतर आपल्याला अर्थहीन वाटायला लागतं. म्हणूनच, छोटी छोटी उद्दीष्ट ठरवा आणि ती पूर्ण करायला लागा. अगदी जसं, विशिष्ट रिपोर्ट अमुक एवढ्या वेळेत मी पूर्ण करेन, अशापद्धतीने प्रत्येक कामाला विशिष्ट वेळेत बसवा आणि मग जेव्हा तुमची लहान लहान उद्दीष्ट पूर्ण होतील त्यानंतर तुम्ही स्वतःच मोठी उद्दीष्ट ठरवून ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला लागाल.

5. काहीतरी नवं करा -

जेव्हा तुम्हाला एकसुरीपणा वाटायला लागेल तेव्हा नोकरीतही तुम्ही काहीतरी नवं करू शकता. त्यासाठी तुमच्या वरिष्ठांची, तुमच्या बॉसची मदत घ्या, त्यांच्याकडून तुम्ही तुमच्यायोग्य असं काहीतरी नवीन काम घेऊ शकता.

6. कठोर निर्णय घेण्याची तयारी ठेवा -

आणि, अखेरीस, जर हे सगळं करूनही तुम्हाला तुमच्या नोकरीत, कामात आनंद मिळत नसेल, अर्थहीन वाटत असेल तर चक्क नोकरी बदला, काम बदला किंवा करिअरच्या दृष्टीने नवा मार्ग, नवी वाट चोखाळायला सज्ज व्हा. वयाच्या मधल्या टप्प्यात, जिथे पूर्ण जीवन एका नोकरीच्या आधाराने आपण उभं केलेलं असतं, तिथे अचानक हातातली नोकरी सोडून देणं हा निर्णय फार कठीण असू शकतो, मात्र, हे जीवन तुमचं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. त्यामुळेच, नीट विचार करून, आर्थिक घडी बसवून, करिअरच्या दुसऱ्या टप्प्यात, नव्या वाटेने पुढे जाण्याचा धाडसी निर्णय असू शकतो.. पण नीट विचारपूर्वक जर हा निर्णय घेतलात तर करिअरची नवी संधी तुमच्यासाठीही उभी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि तुमचं जीवन पुन्हा आनंदाने फुलेल.. अर्थपूर्ण होईल यावर विश्वास ठेवा.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com