जेव्हा काहीच मनासारखं होत नाही, तेव्हा या 7 गोष्टी लक्षात ठेवा आणि मिळवा तुमचं मनःस्वास्थ्य .. (#Monday_Motivation)

एखादा ना दिवसच खराब असतो.. तुम्हाला गजर लावूनही उठायला हमखास उशीर होतो. घाईघाईने आंघोळीला जाता तर बाथरूममध्ये नेमकं त्याच दिवशी पाणी नसतं. मावशीबाई कामावर नेमकी त्याच दिवशी उशीरा येते. कसंबसं आटपून, तोंडहातपाय धुऊन तुम्ही कपडे घालायला जाता आणि जो ड्रेस निवडता तोही नेमका चुरगळलेला असतो.. आणि एक मागून एक तुमच्यासोबत अशा संकटांची मालिका त्या दिवशी सुरूच रहाते..

असा एखादा दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी येतो म्हणजे येतोच, अशा दिवशी काहीच मनासारखं होत नाही, सगळं काही मनाविरूद्ध आणि कल्पनातीत घडत असतं.. अशावेळी निराश व्हायचं नाही, तर या 7 गोष्टी लक्षात ठेवायच्या, मनात घोळवायच्या आणि अशा अडचणीत आणणाऱ्या दिवसानंतरही पुन्हा आयुष्यावर स्वार व्हायचं..

कोणत्या 7 गोष्टी ? तर त्या म्हणजे -

1. तुम्ही अजूनही जिवंत आहात हे लक्षात ठेवा -

जोपर्यंत श्वासात श्वास सुरू आहे, तोपर्यंत हार मानायची नाही हे मनाशी पक्कं करा. तुम्ही आलेल्या संकटावर मात करूच शकता आणि त्यासाठी काही ना काही मार्ग तुम्ही विचार करून काढूच शकता.. तुमच्यावर संकटं ढीग आली असतील पण तुम्ही अद्याप जिवंत आहात नं .. सो मेरे भाई ... लड़ो .. जब तक है दम .. हेच लक्षात ठेवायचं.

2. याहूनही वाईट झालं असतं ही सुद्धा शक्यता मनात आणा आणि मग विचार करा -

समजा, आपल्याबरोबर त्या दिवशी जे झालं त्याहूनही आणखीन काही वाईट झालं असतं मग ..? मग आपण काय केलं असतं ? हा विचार करून पहा, म्हणजे जाणवेल तुमच्याजवळ जे जे होतं तेसुद्धा काही कमी नव्हतं. कधी कधी आपल्याला ज्या गोष्टी नेहमीच सहज मिळतात, विशेषतः अमूर्त गोष्टी.. त्याची आपल्याला किंमतच रहात नाही.. आणि जेव्हा त्या मिळत नाहीत, तेव्हा जाणवतं, अरे आपण काय हरवलंय ते.. त्यामुळेच, वाईटातूनही चांगलं शोधा आणि त्या चांगल्याचा आनंद मनाला घेऊ द्या.

3. तुमची खरी क्षमता तर तुम्हाला या वाईट दिवसानेच दाखवली असा विश्वास मनात बाळगा -

चांगले दिवस असतात तेव्हा माणूस सुखात रहातो, जीवनाचा उपभोग घेतो पण खरं जीवन तर त्याला तेव्हा गवसतं, जेव्हा तो त्या जीवनात खरा संघर्ष करून मग तगतो. हा संघर्षच माणसाला घडवतो. त्यामुळे नेहमी असा विचार करा की वाईट दिवसांनीच तर आपल्याला घडवलं.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

4. उद्याची सकाळ निश्चितच वेगळी असेल -

आज जे झालं ते झालं, पण उद्याची सकाळ निश्चितच आजच्या दिवसापेक्षा वेगळी असेल आणि ती माझ्या मनासारखी, आनंदाचे क्षण भरभरून देणारी असेल. नवा दिवस आनंदाने भारलेला असेल असं स्वतःला समजवा. इतकंच नाही, तर उद्या सकाळी माझ्याकडे इतरांना सांगण्यासाठी माझी स्वतःची आजच्या उदास दिवसाची आणि संघर्षाची एक जबरदस्त कहाणीही असेल याचाही आनंद मनात बाळगा.

5. संकटकाळात तुमच्या पाठीशी कोण उभं होतं त्यांची दखल घ्या, जाण ठेवा -

जेव्हा तुमच्यावर संकट आलं तेव्हा तुमच्याबरोबर कोण उभं राहिलं त्यांची दखल घ्या. कारण, हीच माणसं तुमची खरी कुटुंब आणि मित्र आहेत. हे नसते तर तुम्ही संकटावर एकट्याने मात करू शकलाच नसतात हे लक्षात ठेवा.

6. वाईटातून नेहमी चांगलं होत असतं. -

सगळं काही वाईट घडत असलं, चुकीच्या दिशेने चाललेलं असलं तरीही त्यातूनच पुन्हा काहीतरी चांगलं होणार असतं हा प्रकृतीचा नियम आहे. जिथे घट झाली तिथे भर होतेच.. आणि जिथे भर असते तिथे घट होतेच.

7. तुमच्या कथेचे हिरो तुम्हीच असता -

आपलं जीवन ही एक कहाणी असते. टीव्हीवर किंवा चित्रपटात तुम्ही जशी कथा बघता आणि त्यात कथेचा एक नायक असतो, तसंच.. तुमच्या जीवनाच्या कथेचे नायक तुम्ही स्वतःच आहात. आणि ज्याप्रमाणे नायकाला संपूर्ण चित्रपटात कटूगोड प्रसंगांना सामोरे जावे लागते, त्याप्रमाणे,तुम्हालाही काही कटूगोड प्रसंगांना जीवनात सामोरं जावं लागलं आहे. पण खरा हिरो तोच असतो जो अडचणीतूनही पुन्हा उभा रहातो आणि तुमच्यावर जर अडचणी आल्या असतील तर लक्षात ठेवा, तुम्ही त्यातूनही नायकाप्रमाणे चमकणार आहात.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com