कोणती जॉब ऑफर स्वीकारावी ? कसं ठरवाल तुमच्यासाठी बेस्ट जॉब कोणता आहे ते .. चला पाहूया .. (#Career_Wednesday)

कँपस सिलेक्शन झालं आणि राजवीरला त्याच्या परिक्षेतील गुणांवरूनच काही नामांकीत कंपन्यांकडून ऑफर आली. त्यातील दोन ऑफर्समध्ये राजवीर चांगलाच कन्फ्यूझ झाला. त्याला हे ठरवताच येईना की त्याच्यासाठी या दोन ऑफर्सपैकी कोणती ऑफर सर्वोत्तम ठरेल. याचं कारण, दोन्हीही कंपन्या बाजारपेठेत साधारण एकाच लेव्हलवर होत्या. त्यांनी जे पॅकेज राजवीरला ऑफर केलं, तेही तसं साधारणच साऱखच होतं.. शिवाय दोन्हीतील अडव्हान्टेजेस आणि पर्क्सचा विचार करता दोन्हीही ऑफर तुलनेने सारख्याच होत्या.आता नेमकी कोणती ऑफर स्वीकारावी हे ठरवणं काहीसं अवघड झालं नसतं तरच नवल..

मित्रांनो, राजवीरसारखी अनेक मुलंमुली आहेत, जी हुशार, कर्तबगार आहेत. त्यांच्या नोकरीत त्यांना सतत नवनवीन कंपन्यांकडून हेरलं जात असतं आणि त्यांना नवनवीन ऑफर्स मिळत असतात. अशावेळी योग्य ती संधी स्वतःला निवडता आली पाहिजे. नोकरीत तुमची प्रगती जिथे होईल अशा ठिकाणी तुम्ही पुढे गेलं पाहिजे आणि अशा नोकरीतील पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे.

आपल्या राजवीरनंही हेच केलं. दोन्ही जॉब्सबद्दल आधी सविस्तर, पूर्ण माहिती काढली. पगार, आरोग्य वीमा, इतर बेनिफिट्स, कामाचे तास, त्या पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्याच्या अपेक्षा, कंपनीचे भविष्यातील प्लॅन्स काय आहेत या साऱ्याची सविस्तर विचारणा त्याने आपल्या एचआर मॅनेजरला केली.. ती ही न घाबरता.. पूर्ण आत्मविश्वासाने..

राजवीरने जेव्हा असं केलं, तेव्हा त्याच्या एचआर मॅनेजरलाही त्याच्याविषयी मनातून नाराजी वगैरे वाटली नाही, याचं कारण, राजवीर कोणताही निर्णय किती विचारपूर्वक घेतोय याची थेट कल्पना त्याच क्षणी एचआर मॅनेजरलाही आली.

याउलट, त्याच कँपस इंटरव्ह्यूमध्ये ऋतिकालाही त्याच दोन कंपन्यांनी ऑफर दिली होती. ऋतिका एक चुणचुणीत मुलगी, एक अतिशय हुशार मुलगी होती. पण तिची गडबड कुठे झाली माहितीये.. तर तिने जी कंपनी आधी बोलावील तिथे जॉईन व्हायचं असा विचार करून आपला प्रश्न सोपा केला असं तिला वाटलं. प्रत्यक्षात मात्र, ऋतिकाने नोकरीच्या संधीविषयी कोणताही विचार केला नाही आणि झटकन निर्णय घेऊन मोकळी झाली. यामुळेच जेव्हा ऋतिकाने प्रत्यक्ष कामावर जायला सुरुवात केली तेव्हा तिच्या लक्षात आलं की कामाचं स्वरूप, अपेक्षा, पगार याबाबत तिने कोणतीही स्पष्टता करून घेतली नव्हती आणि आता तिने कंपनीशी करार केलेला असल्याने तिला फारशी तक्रारीला आणि तिच्या अपेक्षा पूर्ण करायलाही जागा उरली नव्हती.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

इकडे राजवीरने मात्र वेळ घेतला, नीट विचार केला. दोन्हीही कंपनीतील वरिष्ठांशी खुद्द जाऊन भेटला, थोडेसे मनातले प्रश्न न घाबरता परंतु नम्रपणे विचारले.

आपल्याला या कंपनीत काम करून कुठवर पोचायचं आहे, आणि प्रत्यक्षात त्या कंपनीत काम करून, तिथलं वातावरण, अंतर्गत राजकारण या सगळ्याचा विचार करून आपण कुठवर झेपावू शकतो याची गणित स्वतःशी त्याने मांडली.

कंपनीला आपण काय देणार आणि कंपनीकडून आपल्याला काय मिळणार हा सर्वात व्यवहार्य निर्णय घेताना त्याने सर्वबाजूने विचार केला. कामाचे तास, कामाची फ्लेक्झिबिलीटी, पगार, पगाराखेरीज मिळणारे अलाऊन्सेस आणि बेनिफिट्स, रिवार्ड्स याबरोबरच कंपनीच्या प्रगतीच्या आलेखावरून कंपनीचे भविष्य व त्या कंपनीत आपले भविष्य कसे असेल याचे आडाखे त्याने बांधले. तो चर्चा करताना लाजला नाही, घाबरला नाही तसंच उद्धटही झाला नाही.. आणि त्यानंतरच त्याने दोनपैकी एक कंपनी निवडली.

जॉब ऑफर्समधील तुलना करताना राजवीरने जो विचार केला तसाच विचार तुम्ही करून यापूर्वी कधी निर्णय घेतलाय का ?

तुमचा निर्णय योग्य ठरला का ?

कमेंटबॉक्समध्ये तुमचा अनुभव जरूर शेअर करा

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com