भविष्यासाठी पैसे वाचवणं आणि गुंतवणं का महत्त्वाचं आहे, चला जाणून घेऊया त्यामागची ही 8 कारणं... (#Friday_Funda)

तुम्ही भविष्यासाठी पैसे गुंतवायला सुरुवात केली का ? तुम्ही तुमच्या मिळकतीतून दररोज काही ना काही बचत करता का ?

या दोन्हीही प्रश्नांची उत्तरं जर 'अद्याप नाही' किंवा 'नाही' अशी असतील तर मित्रांनो, आम्हाला तुमच्या भविष्यकाळाची चिंता वाटते..

का ? चला जाणून घेऊया अशी 10 कारणं जी वाचल्यानंतर तुम्हालाही जाणवेल की पैशांची बचत व गुंतवणूक करणं किती महत्त्वाचं आहे.

1. तुमच्या वाईट काळात तुमचे सेव्हींग्स तुमच्या कामी येतात -

आपल्याला जीवनाची अशाश्वतता माहितीच आहे. त्यामुळे जीवनात नेहमी चढउतार येतातच, प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. अशा वेळी जर तुमच्याजवळ पुरेसे पैसे असतील तर तुम्ही तुमच्या अडचणींतून मार्ग काढू शकता, मात्र पैसे नसतील तर तुमचीच अडचण होऊ शकते हे लक्षात ठेवा.

2. एक ना एक दिवस तुम्ही कमावणं बंद करणार आहात -

अनेकजण हे वास्तव विसरतात की कधी ना कधी त्यांना काम करणं थांबवावंच लागणार असतं. वृद्धापकाळ हा सगळ्यांनाच येतो. त्यामुळे जीवनाच्या या टप्प्यावर तुम्ही कितीही वाटलं तरीही काम करू शकणार नाही आहात, शरीर थकल्यावर तुमचं आर्थिक उत्पन्नाचं साधनही तुमच्याजवळ असण्याची शक्यता फार कमी.. म्हणूनच, या काळासाठी तुम्ही गुंतवणूक करण्याची लवकरात लवकर सुरुवात करायला हवी. वयाच्या साधारण 55 ते 60 व्या वर्षानंतरच्या जीवनाचं आर्थिक नियोजन तुम्ही आजच करून ठेवायला हवं.

3. मनःशांतीसाठी -

खिशात पुरेसे पैसे असले की आपल्याला दुसऱ्या दिवसाची भ्रांत नसते. त्यामुळेच जेव्हा खिसा गरम असतो तेव्हा सुखाची झोप लागते, अन्यथा केवळ पैशांसाठी अहोरात्र मेहनत करावी लागते आणि तरीही गरजा आणि मिळकत यांचा ताळमेळ बसणं अशक्य होऊन बसतं.. जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा आपोआपच मनःशांती हरवतेच. म्हणूनच मनःशांतीसाठी स्वतःची आर्थिक परिस्थिती कायम नियंत्रणात ठेवा. त्याचबरोबर, अचानक उद्भवणारी परिस्थिती -

जसं की, तुमच्या कुटुंबातील कोणाचं मोठं आजारपण किंवा तुमच्या मुलांच्या शाळेने अचानक वाढवलेली फी.. अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जर तुमच्या जवळ पैसे साठवलेले नसतील तर तुमची मनःस्थिती बिघडू शकते. त्यामुळे असे नियोजन करून ठेवा व मनःशांती टिकवा.

4. आर्थिक स्वातंत्र्यासाठी -

आपल्याजवळ जर आर्थिक स्वातंत्र्य नसेल तर नेहमीच आपल्याला आपला स्वाभिमान हरवून जगावं लागतं ही जीवनाची सत्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुमच्याजवळ असलंच पाहिजे आणि त्यासाठीच तुम्ही आजपासूनच बचत करायला लागा.

================


मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

5. तुम्हाला कधीही कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन जगण्याची वेळ येऊ नये म्हणून -


आपल्याकडे एक म्हण आहे, 'ऋण घेऊन सण करू नका' म्हणजे काय की कर्ज काढून जगण्याची सवय स्वतःला कधीही लावू नका, तशी वेळ स्वतःवर कधीही येऊ देऊ नका. तुम्ही कधी निरिक्षण केलं असेल तर तुम्हाला जाणवेल, की माणसं नेहमी लहानशा, छोट्याशा रकमेच्या कर्जानेच सुरुवात करतात आणि नंतर ती या कर्जाच्या विळख्यात अशी काही अडकतात की सुटता सुटत नाहीत. म्हणजे काय, की एखादा माणूस आधी एखादी गरज भागवण्यासाठी कोणाकडूनतरी फार छोटी रक्कम कर्जाऊ घेतो, त्याला वाटतं, की लहानशीच तर आहे ही रक्कम, आपण परत फेडून देऊ .. पण प्रत्यक्षात कर्ज फेडण्याच्या दिवसापर्यंत कर्ज आणि त्यावरील व्याज याची एकूण रक्कम इतकी प्रचंड झालेली असते की कर्ज घेणाऱ्याच्या नाकी नऊ येतात तरीही त्याला कर्ज फेडणं शक्य होत नाही. म्हणूनच, मुळातच कर्जाच्या विळख्यात अडकवूनच नका स्वतःला.. आणि त्यासाठी सुरुवातीपासूनच बचत करत रहा.

6. जीवनात प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी -

आर्थिक स्थैर्य आणि सुबत्ता असेल तर आपल्याला आपल्या जीवनाविषयी चांगली भावना वाटते. आपल्याला आपली प्रगती होतेय याची नेमकी कल्पना आपल्या आर्थिक परिस्थितीवरून चटकन होते. त्यामुळे, बचत करण्याची सवय जर असेल तर दरवेळी बचतीचा आकडा वाढत गेलेला पहाताना आपल्याला जीवनात आपण प्रगती करतोय हे वेगळं समजण्याची गरज नसते. तसंच, पैसे पुरेसे असतील आणि गरजेपेक्षा जास्त असतील तर आपण आपल्याला हव्या त्या प्रकारे जगण्यासाठी पैसा वापरू शकतो, आपल्या गरजा आपणच पूर्ण करू शकतो.

7. जीवन जगण्यासठी -

हल्ली तर पैशांशिवाय कुठलंच काम होत नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे. शाळेची फी, सुट्ट्यांमधला खर्च, घराचा खर्च, लग्नसमारंभांवर खर्च असा सगळा खर्च जीवन जगताना आपण करत असतोच. त्यापैकी बराच खर्च हा आपल्याला वारंवार करावा लागतो, अशावेळी आपल्या गाठीशी पैसा हवा.

8. बचत यासाठी करा की तुम्ही मनासारखे पैसे खर्च करू शकाल -

जीवनशैली मेंटेन ठेवायची असेल तर बचत करायला शिकलंच पाहिजे. मनासारखे पैसे खर्च करायचे असतील तर आधी तुमच्याजवळ तितके पैसे तर हवेत ना .. मग ते कुठून येतील .. कारण, आपल्याला तर एक विशिष्ट रक्कमच दरमहा मिळते, त्यामुळे आपण त्या रकमेवरच अर्थात पगारावरच अवलंबून असतो. पगारवाढ होईपर्यंत आपलं गाडं कसं चालणार.. मनासारखा खर्च, मुलांच्या हौशी मौजी हे सगळं कसं करणार, त्यासाठीत बचत आणि गुंतवणूक आजपासूनच करायला लागा.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com