डिजिटल मार्केटींगमधील या चुका तुम्ही टाळायलाच हव्यात ..(भाग 1 )

#Biz_Thirsday

अनेक व्यावसायिक आणि त्याचबरोबर अनेकजण आपल्या वैयक्तिक वापरासाठीही हल्ली डिजिटल मार्केटींग करत असतात. डिजिटल मार्केटींगची कल्पना वरवर पहाता फार सोपी वाटते परंतु ती प्रत्यक्षात उतरवताना अनेक उत्तमोत्तम व्यावसायिकही शेकडो चुका करतात. बरेचदा, या माध्यमांचा नीट अभ्यास आणि मार्केटींगच्या बाबत आवश्यक ते संशोधन न केल्यामुळे ही गोची होते.. म्हणूनच हे टाळण्यासाठी व स्वतःचे वा आपल्या व्यवसायाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी डिजिटल मार्केटींग करताना या चुका टाळायलाच हव्यात -

1. लाईक्स आणि शेअर्सचा फार जास्त विचार करू नका -
हे कितीही खरं असलं की सोशल मीडियावर तुम्ही लोकांचं लक्ष वेधत आहात हे ओळखण्याची सर्वात पहिली आणि प्रभावी खूण म्हणजे तुमच्या कंटेंटला मिळणाऱ्या लाईक्सची आणि शेअर्सची संख्या. ती जितकी जास्त अधिक तितकं तुमचं कंटेंट ( आणि पर्यायाने तुम्हीही ) अधिक आवडतंय हे समीकरण. मात्र, असे अनेक अभ्यासांती लक्षात आलेले आहे, की बरेचदा लाईक्स आणि शेअर्सची संख्या कमी आली तरीही तुमचं कंटेंट लोक वाचत असतात, त्याची दखल ते मनोमनी घेत असतात.

2. व्यावसायिक मदतीशिवाय तयार केलेली तुमच्या व्यवसायाची वेबसाईट -
बरेच ग्राहक एखादी वेबसाईट ही प्रोफेशनल आहे की अमॅच्युअर दिसतेय हे क्षणार्धात ओळखतात. ज्याचा विपरीत परिणाम तुमच्या व्यवसायाच्या प्रतिमेवर होऊ शकतो हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या व्यवसायाची माहिती प्रभावीपणे लोकांपर्यंत व तुमच्या ग्राहकांपर्यंत पोचावी असं तुम्हाला वाटत असेल तर एखाद्या उत्तम वेबडेव्हलपरकडूनच तुमच्या व्यवसायाची वेबसाईट तयार करून घ्या.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

3. तुमच्या मार्केटींग कँपेन्सच्या निकालांवर लक्ष ठेवा -
अनेकजणं डिजिटल मार्केटींग तर मोठ्या झोकात करतात पण त्यानंतर त्याचे परिणाम काय झालेत, त्याचा इफेक्ट काय व कसा आणि कोणाकोणावर झालाय हे सगळं तपासायचं त्यांच्याकडून राहूनच जातं. हे अत्यंत गंभीर असू शकतं. याचं कारण, तुम्ही ज्यासाठी एवढा खर्च करून असं डिजिटल मार्केटींगचं कँपेन केलंत तोच उद्देश तुम्ही विसरून गेलात.. आणि व्यावसायिकांसाठी अशी पैशांची उधळपट्टी बरी नाही.

4. सोशल मीडियावर फक्त ब्रॉडकास्ट करण्यासाठी नव्हे तर लोकांना एंगेज ठेवण्यासाठी कंटेंट बनवायला हवं.
सोशल मीडिया हे केवळ एकतर्फी संवादाचे साधन नाही, तर इथे मास कम्युनिकेशन अर्थात जनसंवाद केला जातो. त्यामुळे तुम्ही केवळ तुमचा कंटेंट क्रिएट करून तो येथे व्हायरल करून त्यापासून अलिप्त राहणं हे योग्य नाही तर त्यापेक्षा तुम्ही तुमचा कंटेंट क्रिएट करून त्यावर आलेल्या लोकांच्या कमेंट्स वाचणं, त्यांना योग्य तिथे रिप्लाय करणं हे फार महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया मार्केटींग करणाऱ्या प्रत्येकाने हा भाग सवयीचा केला पाहिजे. किमान लोकांच्या प्रतिसादावर लाईक्स तरी दिले पाहिजेत.

सोशल मीडियावर डिजिटल मार्केटींग करणाऱ्यांकडून आणखीही बऱ्याच चुका होत असतात, त्याबाबत जाणून घेऊया पुढल्या गुरूवारी ..

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com