कामाबरोबर वाढत असतं तुमचं मूल्य .. वाचा कसं या छोट्या कथेतून !

मित्रांनो, 

तुमच्यापैकी अनेकजण वेळोवेळी तक्रार करत असतील की त्यांना त्यांच्या कामाच्या तूलनेत कंपनीकडून योग्य तितका पगार मिळत नाही. मात्र, तुम्हाला ठाऊक आहे का, तुमचा पगार कसा तोलला जातो किंबहुना पगार आणि काम यांची सांगड कोणतीही कंपनी कशी घालते ते तुम्हाला ठाऊक आहे का ? नसल्यास ही छोटीशी पण फार महत्त्वाची कथा जरूर वाचा-

" मी एकदा माझ्या घरातील गळणारा नळ दुरुस्त करण्यासाठी एका प्लंबरला बोलावलं. त्याने 20 मिनीटात तो दुरुस्त केला आणि मला त्या कामासाठी 200 रुपये चार्ज केले. मी त्याला तत्क्षणी विचारलं, बापरे एवढे आणि माझ्या या प्रश्नावर तो जे उत्तरला त्याने माझे जीवनच बदलून गेले. तो म्हणाला, हे बघा, मी माझ्या वेळेसाठी पैसे आकारत नाही, तर मी तुमच्या नळाची गळती थांबवण्यासाठी पैसे आकारतो. ती गळती कुठून होतेय, ती कशामुळे होतेय आणि ती होऊ नये यासाठी जे काय करावं लागेल ते काम करण्याचं मी शुल्क घेतो. त्याचं हे उत्तर ऐकून मी गोंधळलो, पण जेव्हा शांतपणे मी त्या उत्तरावर विचार केला तेव्हा मला सगळ्या गोष्टी नीट उलगडल्या. पूर्वी मी देखील एका शॉपिंग मॉलमध्ये काम करायचो. तिथल्या शेल्व्हज्पाशी उभं राहून त्यांची देखरेख करण्याचं, तिथे उत्पादनं रचण्याचं काम माझ्याकडे होतं. दररोज तब्बल 8 तासाचं ते काम प्रचंड थकवणारं होतं आणि त्या कामाचे मला अगदी किरकोळ पैसे मिळत. वरकरणी हे अत्यंत जाचक वाटलं, तरीही ते योग्यच होतं... कसं ते सांगतो.. त्या कंपनीत कोणीही मला सहज रिप्लेस करून ते काम करू शकत होतं इतका शून्य ते किरकोळ प्रभाव माझा त्या कंपनीत होता. मी जे काम करत होतो, त्यामुळे कंपनीच्या बाजारपेठेतील प्रभावावर कोणताही ठोस परिणाम होत नव्हता आणि म्हणूनच माझ्या त्या कामापुरतेच पैसे मला पगाराच्या स्वरूपात मिळत होते. याउलट दुसऱ्या कंपनीत जिथे मी नंतर कामाला लागलो, तिथे मात्र मला थोड्याशाच कामाचे भरपूर पैसे मिळायला लागले. हे काम अगदी क्षुल्लक होते ....मला आरामात बसून माझ्या मोबाईलवरून लोकांना सोशल मीडियावर संदेश पाठवावे लागत, आणि या माझ्या लेखी किरकोळ कामाचे मला पूर्वीच्या कंपनीतील मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत तिप्पट अधिक पैसेही मिळत. हे कसं .. याचं कारण हे की मी जे काम करत होतो, त्या कामाला तेव्हा बाजारपेठेत प्रचंड मागणी होती आणि ते काम तितक्या प्रभावीपणे करू शकणारी माणसंही फारशी नव्हती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या माझ्या कामाचा थेट परिणाम कंपनीच्या महसूलावर आणि विक्रीवर होणार होता. मी माझ्या कंपनीसाठी माझ्या कामामुळे एवढा महत्त्वाचा झालो होतो, की माझ्याशिवाय आता त्या कंपनीची विक्री आणि महसूल वाढणं शक्यच नव्हतं. 

तर सांगायचा मुद्दा हा, की तुम्ही जितके अधिक महत्त्वाचे व्यक्ती बनाल, आणि तुमचं स्थान जितकं जास्त बळकट होत जाईल, तितकं तुमचं मूल्य वाढत असतं."