AI आणि नोकऱ्या: इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करतोय

AI आणि नोकऱ्या: इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करतोय

मी नुकताच एक खूप आश्चर्यकारक चार्ट पहिला. तो ChatGPT च्या वापराबद्दल होता—किती लोक वापरतात आणि किती प्रश्न विचारले जातात, याची माहिती त्यात होती.

त्या चार्टमध्ये गेल्या वर्षातील वापर दाखवला होता आणि जूनच्या आसपास ChatGPT चा वापर एकदम कोसळला होता. थोडाथोडका नाही, तर खूपच खाली आला होता. असे का झाले असावे? जूनच्या सुमारास लोकांनी ChatGPT वापरणे का थांबवले?

याचं उत्तर होतं : जूनमध्येच कॉलेज आणि हायस्कूल संपले, परीक्षा संपल्या, आणि त्यामुळे ChatGPT चा वापर कमी झाला.

याचाच अर्थ आज प्रोफेशनल्स पेक्षा शाळा कॉलेजमधील तरुण मुले AI तंत्रज्ञानाचा जास्त वापर करत आहेत. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमीच हे घडते. तरुण लोक तंत्रज्ञान लवकर स्वीकारतात आणि त्याचा वापर आपल्या जीवनात जास्त करतात.

तरुण लोक जे आपला अभ्यास आणि परीक्षांसाठी AI वापरत आहेत, त्यांनाच सर्वात जास्त चिंता करण्याची गरज आहे. कारण ज्या प्रकारची कामं मिळविण्यासाठी ते शिकत आहेत ती सर्व कामे आता AI मध्ये जवळजवळ फुकटात होऊ शकतात.

दोन वर्षांपूर्वी स्थिर आणि यशस्वी वाटणाऱ्या अनेक नोकऱ्या आणि करिअर मार्ग AI मुळे पुढच्या वर्षी अस्तित्वात नसतील.

जॉन मेनार्ड केन्स यांच्या शब्दात सांगायचे झाले तर "मानवजातीला एका नव्या रोगाने ग्रासले आहे, ज्याचे नाव अनेकांनी अजून ऐकले नसेल, पण येत्या वर्षांमध्ये ते खूप ऐकू येईल, आणि ते म्हणजे तांत्रिक बेरोजगारी (technological unemployment)."

कदाचित हे वाक्य AI बद्दल आहे असे वाटेल पण प्रत्यक्षात हे वाक्य शंभर वर्षे जुनं म्हणजे १९३० सालचे आहे. तेव्हा होत असलेल्या तांत्रिक प्रगतीमुळे पारंपरिक नोकऱ्या लुप्त होण्याची भीती तेव्हाही व्यक्त केली जात होती. आणि आज १०० वर्षांनंतर पण तीच भीती आपल्यासमोर आहे.

१९०० च्या दशकाच्या सुरुवातीला, हेन्री फोर्ड, थॉमस एडिसन आणि हार्वे फायरस्टोन एकदा एकत्र कॅम्पिंगला गेले असताना, फोर्डने एका घोड्याने ओढलेल्या नांगराकडे बोट दाखवून म्हटले होते, "ती घोड्याची नांगरणी एके दिवशी यंत्राने (mechanized) होईल; भविष्यात तो घोडा, शेतीसाठी उपयुक्त नसेल."

१९६४ मध्ये, काही व्यावसायिकांनी राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांना पत्र लिहून अशा एका प्रणालीबद्दल (system) इशारा दिला होता, ज्यात अमर्याद उत्पादन क्षमता असेल आणि मानवी श्रमाची गरज हळूहळू कमी होत जाईल. म्हणजेच, तंत्रज्ञान नोकऱ्या घेईल या भीतीचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे.

केन्सने १९३० मध्ये भविष्याबद्दल आणखी एक भाकीत केले होते. त्यांनी पुढील १०० वर्षांचे, म्हणजे सुमारे २०३० पर्यंतचे चित्र रेखाटले होते.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी

https://chat.whatsapp.com/Ip4ab5E7gGU52GQS3uC7pq

येथे क्लिक करा.

================

त्यांच्या अंदाजानुसार, नवीन तंत्रज्ञानामुळे आपण खूप कार्यक्षम आणि उत्पादक बनू आणि २०३० पर्यंत अमेरिकेतील सरासरी कुटुंब आजच्यापेक्षा ४ ते ८ पट श्रीमंत होईल. हे त्यांचे भाकीत अगदी बरोबर ठरले.

परंतु केन्स यांचा दुसरा अंदाज चुकला. त्यांच्या मते, अमेरिकेतील लोक इतके श्रीमंत होतील की सरासरी कामगार फक्त आठवड्यातून १५ तास काम करेल, कारण मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तेवढे पुरेसे असेल. उर्वरित आयुष्य लोक विश्रांती आणि कला यासाठी देतील.

अर्थात, तसे काहीच झाले नाही.

याउलट लोकांनी नवीन तंत्रज्ञान वापरून काम कमी करण्याऐवजी, आपले राहणीमान उंचावले आणि नवीन कामे शोधली. १९३० मध्ये, नवीन तंत्रज्ञानामुळे फॅक्टरीतील कामे संपतील, तेव्हा लोक काय करतील, हे कोणालाही सांगता आले नसते. पण नवीन कामे तयार झाली. आता ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यापैकी ६ ० % नोकऱ्या १ ९ ३ ० मध्ये अस्तित्वातच नव्हत्या. ॲप डेव्हलपर, सोशल मीडिया मॅनेजर किंवा सायबर सुरक्षा विश्लेषक यांसारख्या नोकऱ्यांची कल्पना करणे देखील १९४० मध्ये अशक्य होते.

केन्सला नवीन तंत्रज्ञान दिसले, पण दोन महत्त्वाच्या गोष्टी दिसल्या नाहीत: १. आपण नवीन उद्योग आणि नवीन नोकऱ्या निर्माण करू. २. लोक काम कमी करून आराम करण्याऐवजी जास्त पैसे कमवण्याचा आणि श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतील.

आज २०२५ मध्ये, जे तरुण ChatGPT वर अवलंबून होते आणि आता त्यांच्या करिअरबद्दल चिंतेत आहेत, त्यांनी इतिहास बघितला तर हेच लक्षात येईल की: नवीन संधी अशा उद्योगांमध्ये निर्माण होतील, ज्यांची आपण आज कल्पनाही करू शकत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे, आज अनेक कामे उपलब्ध आहेत जी AI मुळे सहज सहजी स्वयंचलित होऊ शकत नाहीत. आणि ज्यांना हातानेच करावे लागते: सुतार, प्लंबर, नर्स, शिक्षक इ. ही कामे न संपणारी आहेत. पण गेल्या तीन दशकांतील IT क्रांतीमुळे ही पारंपरिक कामे आकर्षक वाटत नाहीत. परिणामी तरुण अशा कामांकडे वळत नाहीत.

AI मुळे जग बदलेल तेव्हा नवीन उद्योग काय असतील हे आपल्याला माहीत नाही, पण काम भरपूर असेल हे नक्की. फक्त आजच्या अपेक्षांनुसार ती 'प्रतिष्ठित' कामे नसतील.

तंत्रज्ञानामुळे लाखो नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांना मी कमी लेखत नाहीये. पण इतिहासाकडे बघून एवढं सांगता येईल की तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.

आपण या परिस्थितीतून यापूर्वीही गेलो आहोत.

तपशील वेगळे आहेत, तंत्रज्ञान वेगळे आहे, पण नवीन काम शोधून काढण्याची जिद्दी मानवी वृत्ती तीच आहे.

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

What would you like to learn today?