नोकरी आणि जीवन यामधील संतुलन राखण्याचा सर्वोत्तम मार्ग ! (#Monday_Motivation)

ख्यातनाम अमेरिकन लेखिका टोनी मॉरिसन यांच्या जीवनातील एक सत्यप्रसंग...
एकदा त्यांच्या वडिलांबरोबर गप्पा मारताना त्यांनी सहज वडिलांना स्वतःच्या नोकरीतील काही अडचणींविषयी काही गोष्टी गप्पांच्या ओघात सांगितल्या. कामाच्या ठिकाणी नेमकं काय होतंय, त्यांना कसा आणि कसला कसला तिथे त्रास होतोय हे सगळं त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं. वडीलही ते सगळं लक्ष्यपूर्वक ऐकत होते पण त्यांच्या डोळ्यात मात्र हे सगळं ऐकूनही टोनीविषयी जराशीही सहानुभूती दिसली नाही, त्यांनी साधे दोन शब्दही प्रेमाचे तिच्याविषयी तेव्हा उद्गारले नाहीत, अरेरे.. बिचारी माझी मुलगी.. किती कष्ट पडत आहेत तिला नोकरीत .. असलं काहीसुद्धा ते म्हणाले नाहीत. किंबहुना, त्यांच्या लक्षात आलं की टोनीला नोकरी सोडायची नाहीये तर तिला तिच्या समस्यांवर समाधानकारक उत्तरं हवी आहेत.

त्यांनी आपल्या हातातला कॉफीचा मग बाजूला ठेवला आणि म्हणाले, 'ऐक .. तुला त्या नोकरीत अडकायची अजिबात गरज नाहीये. तू इथे रहातेस, तू या कुटुंबाचा भाग आहेस, त्यामुळे नोकरीवर जा, तुझा पगार घे आणि घरी परत ये..!'

त्यांच्या सांगण्याचा मथितार्थ असा होता -

1. काम कोणतंही असू देत .. ते नीट, मन लावून कर, तुझा बॉस तुला रागवेल किंवा त्याला बरं वाटेल म्हणून नाही, तर तुझ्या स्वतःकरता तू तुझं काम उत्तमरित्या कर.

2. 'तू आहेस म्हणून तुझं काम आहे; काम आहे म्हणून तू नाहीयेस', हा फरक समजून घे.

3. तुझं खरं जीवन हे आम्ही आहोत, तुझं कुटुंब हे तुझं खरं जीवन आहे.

4. तुमची ओळख म्हणजे तुमचं काम नाही, तुम्ही स्वतः व्यक्ती म्हणून जे आहात तीच तुमची खरी ओळख असते.

वडिलांच्या त्या सल्ल्यानंतर मी असंख्य प्रकारच्या लोकांबरोबर काम केलं. अत्यंत बुद्धिमान, अत्यंत मूर्ख, चतुर, निरूत्साही, मोठ्या मनाचे आणि कोत्या मनाचे .. सगळ्या प्रकारचे लोक मी स्वतः पाहिले, त्यांच्याबरोबर काम केले. मी हरतऱ्हेच्या नोकऱ्यासुद्धा केल्या. पण, वडिलांनी दिलेल्या त्या महत्त्वाच्या जीवनोपयोगी सल्ल्यानंतर मला कोणत्याही नोकरीच्या ठिकाणी कधीच फार त्रास झाला नाही. याचं कारण, मी माझं काम मन लावून करायला लागले आणि माझ्या कुटुंबापेक्षा अधिक महत्त्व मी कधीच अन्य कशाला दिले नाही, खासकरून जॉब सिक्यॉरिटीला मी कुटुंबाच्या तुलनेत फार महत्त्व दिले नाही आणि माझ्या जीवनातील अमूल्य वेळ मी माझ्या आवडीच्या कामांवर खर्च करून आनंदाने जगू लागले.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com